पं. पंत यांच्या निवासस्थानीं त्या दिवशीं जी चर्चा झाली तिच्यांत कोणत्याहि प्रकारे एकमत होऊं शकलं नाही. नेत्यांच्या मतांचा अंदाज घेऊन अखेर आपण आपल्या मागणीशीं घट्ट रहायचं असाच निर्णय महाराष्ट्रांतील नेत्यांना करावा लागला; याबाबत कोणताहि पर्याय स्वीकारूं नये, असं त्यांनी ठरवलं. देव यांच्या मनांत मात्र विशाल देवाभाषिकाचा पर्याय घोळतच होता. दुस-या दिवशीं म्हणजे १९ ऑक्टोबरला त्यांनी या संदर्भांत डॉ. गाडगीळ यांच्याशीं पुन्हा एकदा चर्चा केली. काकासाहेब गाडगीळ यांचंहि मत अजमावलं. काकासाहेबांची अनुकूलता मिळतांच त्यांनी मग हिरे यांना निरोप पाठवून एक तातडीची बैठक बोलावली. देव यांच्या निरोपानुसार हिरे आणि नानासाहेब कुंटे येतांच देव यांनी त्या दोघांना, आपली नवी कल्पना सांगितली. विशाल द्वैभाषिकाच्या योजनेचं टिपण डॉ. गाडगीळ यांच्याकडून घेऊ तें त्यांनी हिरे व कुंटे यांना दाखवलं.
या चौघांच्या बैठकींत बरीच चर्चा झाली. वरिष्ठ काँग्रेस-नेत्यांकडे आपण न्याय मागायला आलों असतांना, आपल्याला वेगळा पर्याय सुचवण्याचं कारण नाही, असं हिरे व कुंटे यांचं मत होतं. पण उलटसुलट चर्चेनंतर हिरे हे अनुकूल बनले. कुंटे यांना हा पर्याय मान्य नव्हता. डॉ. गाडगीळ यांच्याकडून देव यांनी कागद घेतल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे त्यांचं असं मत बनलं की, विशाल द्वैभाषिकाच्या पर्याय हा मूळचा डॉ. गाडगीळ यांनीच पुढे केला असला पाहिजे. आदल्या दिवशीं रात्रीपर्यंत सुंयक्त महाराष्ट्राच्या मागणीवरच सारे घट्ट बसलेले असतांना रात्रींतून हा नवीन पर्यांय पुढे आल्याचं पाहून कुंटे अस्वस्थ बनले. नव्या पर्यायासंबंधांत इतरांना विश्वासांत न घेतां केवळ आपण निर्णय करणं योग्य ठरणार नाही असंहि त्यांनी सांगितलं. अखेर विशाल दैभाषिकाचा विचार करण्यासाठी सर्वांनाच पाचारण करावं असं ठरलं.
हरिभाऊ पाटसकर यांच्या निवासस्थानीं त्यानुसार शिष्टमंडळाची ही बैठक झाली. चिंतामणराव देशमुख हेहि बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकींत शंकरराव देव यांनी साध्या कागदावर लिहिलेला, विशाल द्वैभाषिकाच्या पर्यायाचा मजकूर हळूच पुढे केला. अचानकपणें हा नवा पर्याय पुढे आलेला पाहून देवगिरीकर आणि यशवंतराव चव्हाण गोंधळून गेले. काय चाललं आहे हेंच मुळी त्यांना उमजेना. यशवंतरावांनी तर तुम्ही आमचा विश्वासघात करत आहांत, असं देव यांना तिथेच सुनावलं. सर्वांना विश्वासांत न घेतां, देव यांनी अशा प्रकारे, मूळ मागणी बाजूस ठेवून, नवा पर्याय सुचवावा याबद्दल यशवंतरावांनी कडक शब्दांत तिथे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली; हें असंच चालू रहाणार असेल, तर शिष्टमंडळाबरोबर न रहातां मुंबईस परत जाण्याचं त्यांनी सांगून टाकलं.
दिल्लीच्या मुक्कामांतील या तिस-या दिवशीं शिष्टमंडळानं मौलाना आझाद यांच्या निवासस्थानीं वरिष्ठ काँग्रेस-नेत्यांशीं चर्चा करण्याचं ठरलं होतं. या चर्चेसाठी आपण उपस्थित रहाणार नाही असं चव्हाण यांनी स्पष्ट करतांच बैठकीला वेगळंच वळण लागलं. देवगिरीकर, काकासाहेब गाडगीळ यांनी तेव्हा चव्हाणांना समजावण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या नेत्यांमध्येच फूट पडली आहे ही वस्तुस्थिति वरिष्ठ काँग्रेस-नेत्यांपर्यंत पोंचणं योग्य नव्हतं. शेवटीं विशाल द्वैभाषिकाचा पर्याय आपण स्वत: वरिष्ठ नेत्यांना सादर करणार नाही, असं देव यांनी आश्वासन दिलं तेव्हा वातावरण निवळलं.
विशाल द्वैभाषिकाचा पर्याय आपण स्वत: वरिष्ठांना सादर करणार नाही असं आश्वासन जरी देव यांनी दिलं होतं, तरी त्यांनी पुढे तें पाळलं नाही; परंतु या त्यांच्या दुटप्पीपणामुळे यशवंतरावांना स्वत:चे निष्कर्ष काढावे लागले. संयम राखून तेंच त्यांनी पुढच्या काळांत केलं.
आझाद यांच्या निवासस्थानीं शिष्टमंडळानं प्रदीर्घ चर्चा केली. पण सारे शब्दांचे खेळ होत राहिले. वरिष्ठ नेत्यांची समजूत घालण्यांत किंवा त्यांचं मन वळवण्यांत शिष्टमंडळाला यश मिळालं नाही. ही कोंडी फोडण्यासाठी म्हणून देव यांनी याच बैठकींत विशाल द्वैभाषिकाची योजना पुढे केली. द्वैभाषिक आम्हांला मान्य आहे; पांच वर्षांनंतर गुजरातनं हवं तर बाजूला निघावं, असं देव यांनी सुचवलं होतं. चर्चेच्या अखेरच्या टप्प्यांत देव यांनी हा पर्याय जेव्हा उशिरा सुचवला तेव्हा पं. नेहरू बैठकींत उपस्थित नव्हते. अन्य कांही महत्त्वाच्या कामासाठी ते अगोदरच निघून गेले होते. काँग्रेस-कार्यकारिणीच्या उपसमितीनंच या संदर्भात चर्चा केली. पण स्वत: वचनबद्ध होण्याचं टाळलं. तिस-या दिवशींची बैठकहि अशी निष्फळ ठरली. महराष्टाच्या शिष्टमंडळाची दिल्लींत अशा प्रकारे बोळवण झाल्यानं, महाराष्ट्रांत परतल्यानंतर लोकांच्या प्रश्नांना उत्तरं काय द्यायचीं या विवंचनेनं त्यांना घेरलं. नाराज मन:स्थितींतच सारेजण महाराष्ट्रांत परतले होते.