कै. यशवंतराव चव्हाण यांचे काही मौलिक विचार या पुस्तिकेद्वारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे प्रकाशित करताना आम्हाला आनंद वाटतो. कै यशवंतराव चव्हाणांनी आपल्या आचार-विचार-उच्चाराने आणि कार्याने केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर अवघ्या देशाच्या पातळीवर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक विशिष्ट ठसा उमटविला आहे.
यशवंत विचार
कै. यशवंतराव चव्हाणांनी प्रसंगानुरूप केलेली व्याख्याने आणि लिहिलेले लेख बहुतांशी ग्रंथबध्द झालेले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्तवाचा आणि विचारांचा ज्यांना खोलवर अभ्यास करावयाचा असेल त्यांनी मुळात त्यांचे ग्रंथ वाचणे श्रेयस्कर ठरेल. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषयांसंबधी यशवंतरावांनी वेळोवेळी प्रगट केलेल्या विचारंच्या अथांग सागरातून मौलिक मोती शोधण्याचे अवघड काम श्री. ना. धों. महानोर यांनी आस्थेने केले आहे; ते अधिकाधिक सर्वस्पर्शी होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला आहे. प्रतिष्ठान त्यांचे आभारी आहे.
सर्वसामान्य वाचकाला आणि कार्यकर्त्याला, ही पुस्तिका सहज उपलब्ध व्हावी आणि संग्रही ठेवता यावी या हेतूने, पुस्तिकेचे स्वरूप लहान आणि किंमत कमी ठेवलेली आहे. वाचक आणि कार्यकर्ते या पुस्तिकेचे आवडीने स्वागत करतील अशी आशा वाटते.
तख्त कोणा एका व्यक्तिचे नाही, कोणा एका धर्माचे नाही, कोणा एका वर्गाचे नाही, ते या देशातल्या चाळीस-पंचेचाळी कोटी लोकांचे आहे; आणि त्याचे रक्षण करणे तुमचे आमचे कर्तव्य आहे. तुमचे-आमचे हे तख्त जोपर्यंत चंद्रसूर्य उगवत राहतील तोपर्यंत कायम राहिले पाहिजे. कारण ते आमच्या स्वातंत्र्याचे व लोकशाहीचे प्रतीक आहे, अशा त-हेची देशभक्तीची भावना आपल्या मनात फुलली पाहिजे.
लोकशाही यंत्रणा तयार करणा-या तज्ज्ञ मंडळींनी राजकीय सत्तेवर कायद्याची आणि इतर बंधने घालून ती सत्ता समतोल करून ठेवली आहे; परंतु आर्थिक सत्ता ही राजकीय सत्तेपेक्षाही अधिक शक्तिमान आहे. सत्ता हे शेवटी सर्वात मोठे सामर्थ्य आहे. मग ती सत्ता राजकीय असो अगर आर्थिक असो; आणि म्हणून सत्तेचे स्थान हे लोकांच्या कल्याणासाठी उभारलेली एक वेदी आहे, एक यंत्रणा आहे. ते एक मोठे जोखमीचे काम आहे,
आपल्याकडे निवडणुकी आल्या की आपण जागे होतो. मग कोण कोण कार्यकर्ते आहेत, कोणाकोणाच्या मनात बाशिंग बांधावयाचे आहे याचा शोध सुरू होतो; परंतु अशी परिस्थिती असणे उपयोगाचे नाही. ग्रामीण पध्दतीने सांगावयाचे झाले तर पहिलवान असा तयार असला पाहिजे; की सांगेल तेव्हा तो कुस्तीला उभा राहिला पाहिजे. अगोदर करार करून आणि मग
खुराक खाऊन अमक्या अमक्या तारखेला कुस्ती लढवतो असे म्हणणे ही कुस्ती नव्हे. बोलणे झाल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत तो मैदानात आला पाहिजे; आणि कुस्ती झाली पाहिजे. कोणाही कार्यकर्त्याने आंधळे असू नये. आंधळा दुनियेत हिंडू शकेल; पण आंधळ्याच्या मागे दुनिया जाऊ शकणार नाही.
खुराक खाऊन अमक्या अमक्या तारखेला कुस्ती लढवतो असे म्हणणे ही कुस्ती नव्हे. बोलणे झाल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत तो मैदानात आला पाहिजे; आणि कुस्ती झाली पाहिजे. कोणाही कार्यकर्त्याने आंधळे असू नये. आंधळा दुनियेत हिंडू शकेल; पण आंधळ्याच्या मागे दुनिया जाऊ शकणार नाही.
राज्ये जी चालतात ती, राज्ये चालविणा-या माणसांपेक्षा राज्यशक्तीच्या बाहेर जी माणसे असतात त्यांच्या पुण्याईने चालतात. ती माणसे ज्या परंपरा आणि ज्या शक्ती निर्माण करतात त्याच्या सहाय्याने ती चालतात.
धर्म हा व्यक्ती आणि परमेश्वर यांच्यामधला संबंध आहे. हिंदू आपल्या मंदिरात परमेश्वराला आळविण्याचा प्रयत्न करतो, तर मुसलमान आपल्या मशिदीत अल्लाशी संभाषण करण्याचा प्रयत्न करतो. ख्रिस्ती आपल्या चर्चमध्ये परमेश्वराला हाक मारतो, तर शीख गुरूद्वारामध्ये परमेश्वराची प्रार्थना करतो; परंतु हे सर्व संपल्यानंतर मंदिरातून, मशिदीतून, गुरूव्दारातून किंवा चर्चमधून जो माणूस बाहेर पडतो तो हिंदू नाही, मुसलमान नाही, शीख नाही आणि ख्रिस्ती नाही; तो फक्त भारतीय आहे ही भावना आपल्या मनात रूजली पाहिजे.
अगदी साध्या प्रतीकाच्या भाषेत बोलावयाचे झाल्यास मला हिंदुस्थानचे हे चित्र दिसते आहे; की रस्ता डोंगराळ आहे, वेळ उन्हातान्हाची आहे, जवळपास पाणी मिळेलच याची खात्री नाही, साथीला माणसे असतीलच असा भरवसा नाही; परंतु खांद्यावर हे दोन्ही बोजे घेऊन वाटचाल ही केलीच पाहिजे. हिंदुस्थानाची जी सफर चालू आहे त्या सफरीतला आजचा जो मुक्काम आहे त्याचे हे चित्र आहे.
मला अभिप्रेत असलेला ‘समाजवाद’ हा केवळ एक आर्थिक सिध्दान्त नाही. तो मूल्यावरही आधारलेला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा आपल्या विचाराची व आचाराची आधारशिळा असली पाहिजे. पिढयानपिढया हरिजन आणि गिरिजन यांची अवहेलना होत आहे, त्यांच्यावर अन्याय होत आहेत, सामाजिक दृष्टया नि आर्थिक दृष्टया त्यांचे शोषण चालू आहे. राष्ट्रीय जीवनाच्या मंजधारेपासून त्यांना अलग करण्यात आले आहे.
आपल्याला लोकांच्या जीवनातील दैन्य व दारिद्य् नाहीसे करायचे आहे. त्यासाठी आपण विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे; पण विकासाच्या कार्यक्रमात आपण गुंतलो असताना आपले राजकीय विचारांचे ज्ञान ताजे ठेवले पाहिजे. आपण कशासाठी व कोणासाठी विकासयोजना राबवीत आहोत याचे भान दिलदिमागामध्ये असले पाहिजे.
पक्ष चालतात ते निष्ठेने चालतात हे जरी खरे असले, तरी लोकशाही पक्ष हे विचारांच्या निष्ठेने चालले पाहिजेत असा तुमचा-आमचा आग्रह असला पाहिजे. व्यक्तीवरच्या निष्ठा चुकीच्या आहेत. त्या निष्ठा काम देत नाहीत; कारण व्यक्ती शेवटी चूक करू शकते. मनुष्य कितीही मोठा असला तरी त्याच्या हातून चूक होणार नाही असे विधान कोणीही करू शकणार नाही.
जनतेला सांगितले पाहिजे; की तू राजा आहेस. अविकसित, दुष्काळी अशा कडेकपारीच्या बनलेल्या सह्याद्रीचा तू राजा आहेस. दु:खात असलेल्या जनतेच्या जीवनावर सुखाची सावली निर्माण करणे हे राजाचे कार्य प्रत्येक मराठी माणसाने केले पाहिजे. एकेक माणूस, एकेक लहान मूल हे सावली देणारे झाड आहे असे मानून खतपाणी घातले पाहिजे.
देशाच्या आर्थिक प्रगतीचे जे तत्त्व आपण स्वीकारले आहे, त्या तत्त्वाचा आपल्याला त्याग करता येणार नाही. ज्या दिवशी ह्या तत्त्वाचा आपण त्याग करू, त्या दिवशी देशाच्या संरक्षणाच्या प्रश्नांची धुळधाण होईल हे आपण नक्की समजा. माझ्या या सगळया म्हणण्याचा सारांश असा की, देशाची अंतर्गत नीती,
सहकार चळवळीत आर्थिक सत्ता आहे याचीही जाणीव लोकांत आणि त्याचप्रमाणे सहकारी कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे. ही चळवळ एका अर्थाने सत्तेचे एक केंद्र आहे; आणि सत्तेचे केंद्र म्हटले म्हणजे लोकशाहीचा अंकुश त्यावर ठेवलाच पाहिजे. तसे न केल्यास, अनियंत्रित सत्तेमुळे विकासाचे हे शस्त्र दुधारी ठरेल अशी मला साधार भीती वाटते.
ग्रामीण विरूध्द नागरीकरण हे प्रश्न एकमेकांत इतके गुंतलेले आहेत; की एकाच्या सुखाचा दुस-याच्या दु:खाशिवाय आपणाला विचारच करता येत नाही. खेडे आणि शहर यांची सुखदु:खे ही अशी परस्परांशी भिडलेली, परस्परांत मिसळलेली आहेत.
शेतीच्या प्रश्नांशी लढावयाचे म्हणजे शंभर तोंडे असलेल्या रावणाशी आपणाला लढावे लागणार आहे. आपल्या शेतीचे प्रश्न अनेकविध आहेत. लहान मुदतीच्या कर्जाचा प्रश्न आहे, दीर्घ मुदतीच्या कर्जाचा प्रश्न आहे, बागायतीचा प्रश्न आहे, बियाणांचा प्रश्न आहे, खतांचा प्रश्न आहे, तुकडेबंदीचा प्रश्न आहे, असे अनेकविध शेतीचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्नही नेहमी बदलत राहणार आहेत.
शेतीच्या शास्त्रीय शिक्षणाचा दृष्टिकोन लोकांमध्ये वाढविला पाहिजे. यासाठी येथे शिकणारे शेतीचे सगळे स्नातक निव्वळ शेतकी खात्याचे अधिकारी होऊन जाणार असले अणि जावयाच्या शर्यतीमध्ये त्या निमित्ताने पुढे सरकणार असले; तर मी असे म्हणेन की, ती दुसरी शोकपर्यवसायी गोष्ट होईल. येथे शिकलेला मनुष्य शेतकरीही होऊ शकला पाहिजे. तसे त्याने झाले पाहिजे.
तुमची शेती हा निव्वळ तुमचा विचार राहिलेला नाही. तुमची राहिलेला नाही. शेती हा देशाचा विषय झाला आहे. आम्ही आमची शेती पिकवली नाही तर आम्ही आमच्या घरामध्ये उपाशी राहू असे म्हणून तुम्हाला आता चालणार नाही. तुमची शेती तुमची आहे; पण तशीच ती देशाचीही आहे. तुमची शेती पिकली नाही तर तुमचे नशीब पिकणार नाही एवढाच त्याचा अर्थ नाही, तर त्याचबरोबर देशाचेही नशीब पिकणार नाही.