त्याच दिवशीं मुंबईच्या चौपाटीवर कामगारांची एक सभा झाली. या सभेंत शंकरराव देव यांनी, या प्रस्नांत पंतप्रधानांचा लवाद मान्य करावा, असं आवाहन केलं आणि एकूण द्वैभाषिक योजनेचं विवेचन केलं. विरोधी पक्ष आणि शंकरराव देव यांच्यातील अंतर आता वाढूं लागलं होतं. परिषदेला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत होता. महाराष्ट्र मागमी-दिन लोकांनी यशस्वी केला होता. परिषदा, जाहीर सभा यांतून संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा व्यक्त होऊं लागला असतांनाच, मुंबई प्रदेश-काँग्रेसनं केलेल्या ठरावाला विरोध दर्शवण्यासाठी, काँग्रेसचेच डॉ. नरवणे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार काँग्रेस-जनांनी मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान दिल्लीला प्रदेश-काँग्रेसच्या अध्यक्षांची व त्याला जोडूनच वर्किंग कमिटीची बैठक ७ व ८ नोव्हेंबरला झाली. प्रदेश-अध्यक्षांच्या बैठकींत देवगिरीकर विरूद्ध स. का. पाटील असा सामना झडला. महाराष्ट्राच्या विरूद्ध पाटलांनी बरंच गरळ ओकलं. तें ऐकून पंडितजींनी संतापाच्या भरांत सांगितलं की, महाराष्ट्रांतील लोकांच्या माथेफिरूपणाविरूद्ध मी चौका-चोकांत, प्रत्येक रस्त्यांत, गावांत आणि शहरांत विरोध करीन. ही सभा वादळांतच संपली. दुस-या दिवशीं वर्किंग कमिटीच्या बैठकींत, देवगिरीकरांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा कांही उपयोग झाला नाही. वर्किंग कमिटीनं त्रिराज्याचा ठरावच अखेर संमत केला. देवगिरीकरांची संमती नव्हती, पण त्यांना गप्प रहाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. कारण वर्कीग कमिटींत विरोधी मत नोंदतां येत नाही. तशी प्रथा नसते.
वर्कींग कमिटीनं त्रिराज्य योजनेला मान्याता देतांच महाराष्ट्रांत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. संयुक्त महाराष्ट्र परिषदेंतील विरोधी पक्षांनी या निर्णयाचे वाभाडे काढले. मुंबईत मिरवणुकांवर पोलीसांनी बंदी घातल्यानं या बंदी हुकमाचा भंग करण्याची तयारी सुरु झाली होती. परिषदेनं हे करूं नये यासाठी शंकरराव देव अयशस्वी प्रयत्न करत असतांनाच एस.एम.जोशी, मिरजकर, एस.जी. सरदेसाई यांनी १२ नोव्हेंबरला त्यांना सांगितलं की, बंदी हुकमाचा भंग करूं नका हें आम्हाला सांगण्याऐवजी मोरारजी देसाई यांनाच सांगा आणि बंदी हुकूम मागे घेणं कां आवश्यक आहें हें त्यांनाच पटवून द्या. बंदी हुकूम उठवला नाही तर तो मोडला जाईल, असंहि निर्वाणीचं सांगून ते मोकळे झाले.
सर्वंसामान्य जनता आणि राजकीय कार्यकर्ते हे आपल्यापासून दूर गेले आहेत हें देव यांना आता उमजलं. वर्कींग कमिटीच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्राची भावना व्यक्त होण्याच्या दृष्टीनं हरताळ पुकारला जाण्याची शक्यता होती. पण त्या संदर्भांत झालेल्या चर्चेनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना हरताळाच्या विचारापासूनपरावृत्त करण्यास देव यांना यश आलं होतं. लोकांनी मिरवणुका काढल्या तर त्यांना रोखता येणार नाही अशी या नेत्यांनी देव यांना कल्पना दिली होती. मुंबईच्या नरे-पार्कवर देव यांनी मुंबईतल्या कामगारांशीं जें हितगुज केलं त्या वेळीं प्रचंड संख्येनं कामगार उपस्थित होते. पण देव यांच्या राजकीय आयुष्यांतील तीच अखेरची सभा ठरली. कारण त्यापुढल्या काळांत संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नासंबंधी ते दिल्लींतील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या भेटी गाठी घेत होते आणि चर्चा करत होते, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणांत देवांच्या शक्तीची आणि सामर्थ्याची मोजदाद पुढच्या काळांत क्वचितच झाली.