कर्‍हाडच्या म्युनिसिपल कचेरीवर राष्ट्रीय झेंडा लावण्याचा आणि गावात चळवळीची पत्रके चिकटवायची योजना ठरली आणि यशस्वीपणे पार ही पडली. हे घडताच गांवात खळबळ उडाली. चळवळीचा जोर सर्वत्र वाढलेला असल्यानं ब्रिटीश सरकार होतं सर्वत्र धरपकड करण्यात आली ( प्रारंभ झाला ) त्यामध्ये तरूण यशवंतरावांचाही क्रमांक लागला आणि परिणामी शिक्षा ही ठोठावण्यात आली. इतरांना दहशत बसावी म्हणून यशवंतरावांना अठरा महिने सक्त मजुरीची शिक्षा फर्मावली गेली.

संपूर्ण एक वर्ष यशवंतराव येरवड्याच्या कॅंपजेल मध्ये राहिले. या वास्तव्याबद्दल यशवंतराव म्हणतात, “जेलमध्ये पंधरा महिन्याचे माझे जीवन म्हणजे माझ्या जीवनातला एक अत्यंत उत्तम काळ होता. असे आज ही मला वाटते. माझ्या जीवनात भावनाशीलता कमी होऊन विचारांची खोली वाढविण्याची प्रक्रिया या जेलमध्येच सुरू झाली.”

आचार्य भागवत, रावसाहेब पटवर्धन, वि. म. भुस्कुटे, एस. एम. जोशी या सारख्या मोठमोठ्या लोकांचा सहवास त्यांना लाभला. विविध विषयावरील पुस्तके वाचली ‘मेघदूत’ ‘शाकुंतल’ सारख्या आनंद घेतला. असा यशवंतरावांचा जेलमधील दिनक्रम होता, “जेलच्या संपूर्ण मुक्कामात पुढच्या विद्यार्थीजीवनात जितके वाचले नसेल तितके मी येथे वाचून घेतले” असे यशवंतराव ‘कृष्णाकांठ’ मध्ये सांगतात. जेलमध्ये यशवंतरावांचे विचारविश्व या पार्श्वभूमीवर बनत होते. विचाराच्या क्षेत्रातील निर्णय आपणच घेतला पाहिजे आणि त्यासाठी वाचन केले पाहिजे, चिंतनही आवश्यक आहे असे त्यांच्या मनाने घेतले आणि नंतर भरपूर वाचन, चिंतन, मनन केले. स्वातंत्र्याचा प्रश्न केवळ हिंदुस्थानापुरताच मर्यादित नसून सर्वमानवजातीमध्येच या प्रकारच्या विचाराने खळबळ माजविली होती, त्याची ही कल्पना त्यांना आलेली होती. त्यादृष्टीने ते विचार करू लागले. महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती संबंधाने पुढारी मंडळी जेलमध्ये चर्चा करीत. त्यावरून या शहरी पुढार्‍यांचा ग्रामीण समाजाबद्दल केवढा गैरसमज आहे, याचीही त्यांना कल्पना आली. १९३२ साली गांधीजींनी ‘कम्युनल अ‍ॅ्वॉर्ड’ संबंधीचा आमरण उपवास केला. या उपवासाचाही त्यांच्यावर परिणाम झाला. शेड्यूल्ड कास्टना स्वतंत्र मतदार संघ देण्याची योजना ब्रिटीश सरकारने जाहीर केली. या मंडळींच्या मते, हा एक ब्रिटिश सत्तेचा डावच होता. म. गांधींच्या सूचना मान्य करून डॉ. आंबेडकरांनी पुणे करारावर सही केली. आणि हिंदू समाजाची व राष्ट्रीय जीवनाचीही फाळणी वाचविली. म. गांधींचे प्राण डॉ. आंबेडकरांनी वाचवले. त्यामुळे त्यांच्याबद्दलची आदराची भावना दुणावली.

जेलची पंधरा महिन्यांची शिक्षा झाली, त्यामुळे यशवंतरावांची शाळेची दोन वर्षे फुकट गेली होती. यशवंतरावांचा ठाम निश्चय होता की, स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीत काम करायचे पण शिक्षणक्रम पुरा केल्यावाचून राहायचे नाही. स्वातंत्र्य संग्रामामध्येही शिक्षण, ज्ञान, विचारशक्ती यांची किती आवश्यकता आहे. याचा अनुभव त्यांनी नुकताच जेलमध्ये घेतला होता.

शाळा व अभ्यास या बरोबरच दलित सेवा, दलितांसाठी नाईट हाईस्कूल चालविणे, जनसंपर्क वाढविणे यासारखी कामे करणे चालूच होते. उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरला जाण्याचे ठरवून मित्रांच्या सहकार्याच्या आश्वासनाने निश्चित मनाने यशवंतराव मार्गस्थ झाले. यशवंतराव कोल्हापूरला आले त्यावेळी तिथलं वातावरण शैक्षणिकदृष्ट्या भारलेलं होतं. राजर्षि शाहू महाराज यांची शिक्षणाविषयी विशिष्ट दृष्टी होती. त्यामुळे हे शहर गोरगरिबांसाठी एक अतिशय महत्त्वाचे शिक्षण केंद्र बनले होते. यशवंतरावांचे अनेक स्नेही इथे होतेच. त्यामुळे इथे आल्यानंतर ही सार्वजनिक कामाचा धागा अतूट राहिला शिक्षणासाठी यशवंतराव शरीराने कोल्हापूरात राहिले. तरी मनाने सातारा जिल्ह्यांतच वावरत होते. सातारा जिल्हा राजकीय दृष्ट्या अतिशय जागृत बनला होता. १९३० सालच्या चळवळीपासून स्वातंत्र्य चळवळीचं लोण शेतकर्‍यांच्या झोपड्यांपर्यंत पोहोचल्यानंतर बहुजन समाजातील तरूण कॉंग्रेसच्या राजकीय प्रवाहात येऊन सामील होऊ लागले. हा प्रवाह वाढून विधायक कामासाठी त्याचा उपयोग व्हावा यासाठी नव्या पिढीतल्या नव्या पिढीतल्या तरूणांनी यशवंतरावांच्या नेतृत्त्वाखाली सातारा जिल्हा कॉंग्रेसची आखणी सुरू केली. यशवंतराव शिक्षण घेत असतांनाच आठवड्यातले तीन दिवस सातारा जिल्ह्यांतील संघटनेच्या कामासाठी खर्च करीत राहीले. एक विचारवंतर कार्यकर्ता म्हणून सातारा जिल्ह्याने त्यांना मानलं होतं स्वीकारलंही होतं. संघटना मजबूत करण्याचे काम यशवंतरावांच्या नेतृत्त्वाखाली गती घेत होतं. लहान मोठ्या गावातून हिंडतांना अनेकांचे परिचय झाले. माणसं पारखण्याचे शिक्षण त्यांना या भ्रमंतीतून मिळत राहण्याचा फार मोठा फायदा झाला. कॉलेजच्या वर्षांतील सात-आठ महिने राजकीय जागृतीचे काम खेड्यापाड्यातून बहुजन समाजात हिंडून करायचं आणि परिक्षेच्या अगोदरचे दोन महिने अभ्यास करून परिक्षा द्यायची अशा क्रमानंच १९३८ मध्ये त्यांनी बी. ए. ची पदवी संपादन केली.