एखाद्या व्यक्तित्त्वाचा परमोच्च विकास हा त्याच्या संस्काराचा परिपाक असतो. संस्कार ही संकल्पना स्थल काल सापेक्ष असते. मानवी जीवनाच्या विकासास त्याची नवनवीन मूल्ये उदयाला येत असतात. भारतीय समाज जीवनाचा इतिहास पाहता स्वातंत्र्य, समता आणि बंधूता याचे युग आधुनिक महाराष्ट्रात सुरू झाले असे आपण मानतो. स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी या देशातल्या सर्व जाती धर्माच्या आणि वयोगटाच्या लोकांनी असीम त्याग केला. यातून स्वराज्याची प्राप्ती झाली. स्वराज्यातील समाज जीवनाच्या विकासाची नवी दिशा या देशाच्या घटनाकारांनी निश्चित केली आहे. तिच्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा., येथील नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्यायाची संधी प्राप्त करून देणे. विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य देणे., प्रत्येकाला यासाठी दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देणे., यातून प्रत्येक व्यक्तिची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता विकसित करणे हे सुसंस्काराचे निकष सांगितले आहेत. या योगे लोकशाही समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचे प्रयत्‍न भारतात सुरू झाले होते. हे सुसंस्कार, दुर्लक्षित झाल्यामुळे आज समाजाचे भयावह चित्र दिसत आहे. म्हणून या मूल्यांसाठी यशवंतराव चव्हाणांनी जीवनभर जी जपणूक केली त्याला त्यांना जी शक्ती मिळाली ती त्यांना लाभलेल्या संस्कारातून. त्या संस्काराचे विविधांगी दर्शन त्यांनी स्वत:च घडविले आहे.

या पार्श्वभूमीवर स्व. यशवंतरावजी चव्हाणांच्या जीवनांत डोकावल्यानंतर प्रथम दर्शनीच त्यांच्या संस्कारक्षम मनाचा प्रत्यय येतो. लहानपणापासूनच परिस्थितीचे अवलोकन करीत तिच्याशी जुळते घेऊन सतत पुढे जाणेचा प्रयत्‍न त्यांनी जाणीवपूर्वक केलेला दिसतो. त्यात कौटुंबिक व्यक्तिंकडून विशेषत: आई विठाई आणि बंधू गणपतराव यांच्याकडून लाभलेल्या संस्कारांना अनन्य साधारण महत्त्व आहे. बालपणीच्या व्यक्ति सहवासातून लाभलेल्या करूणेने त्यांना विशाल मानवतावादी विचारांची शिदोरी मिळालेली आहे. तिला व्यापक राष्ट्रीय अधिष्ठान बंगाली क्रांतिकारक जतिंद्रनाथानी देशासाठी प्राण दिला. या घटनेनं सारा देश बेचैन झाल. या एका घटनेने त्यांच्या चित्तवृत्तीत कायमचा बदल झाला. त्या बरोबरच शैक्षणिक आणि राजकीय वाटचाल करतांना गांधी-नेहरूंच्या प्रमाणे अनेक विद्वान आणि राजकारणींचा सहवास त्यांना लाभला. त्यातूनच यशवंतरावांचा राजकीय पिंड साकारला. या राजकीय पिंडातून त्यांनी चलेजावच्या चळवळीत उडी घेऊन सातारच्या प्रतिसरकाररूप स्वराज्याचा मंत्र दिला. या स्वातंत्र्याच्या लढ्यातूनच यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा तो एक विशेष जाणवतो तो म्हणजे विशाल मनाचा मानवतावादी सामाजिक हितचिंतकाचा बालपणीच्या संस्काराला मिळालेले हे मानवतावादाचे रूप प्रत्यक्ष त्यांच्या एकद्देविषयक लेखनातून प्रत्ययाला येते व त्यातूनच त्यांची संस्कारक्षम वाटचाल जाणवते.

बाल वयात यशवंतरावांना कुणा द्रष्टा मार्गदर्शक भेटला आणि त्याने त्यांचा मार्ग अचूकपणे आखून दिला असे ही नाही. यशवंतराव अंगच्या वाढीने वाढले. देशकाल परिस्थिती घडवील तसे ते घडले गेले. स्वत:च्या पायांनी चालू लागले मागे उमटलेल्या पदचिन्हांच्या पाऊलवाटा झाल्या. त्यांच्या चालणार्‍या पायातूनच जणू त्या वाटांचे उगम झाले त्या अनुसरत चालणारे असंख्य अनुयायी त्यांना लाभले.

यशवंतरावांच्या या राजकीय विचाराला प्रत्यक्ष काम करण्याची संधी १९४६ सालच्या विधिमंडळाच्या निवडणूकीने मिळाली. मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी त्यांच्या विचाराची कृष्णाकांठच्या समाजाप्रमाणे अवघ्या महाराष्ट्रालाही गरज आहे हे ओळखले. पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून राजकीय वाटचाल सुरू झाली. या वाटचालीची घोडदौड म्हणजे यशवंतनीतिच्या राजकारणाचा विजय होय. महाराष्ट्रातील समाज नवी दिशा देत असतांना त्यांनी लोकशाही समाजवाद व नियोजन या त्रिसूत्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी नियोजनबद्ध समाजाची आर्थिक कुवत वाढावी म्हणून कृषि औद्योगिक क्रांतीला महत्त्व दिले. संयुक्त महाराष्ट्राला पर्याय म्हणून मराठी माणसात क्रयशक्ती निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्‍न होता. लोकेच्छा ही प्रमाण मानणार्‍या यशवंतरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवितांना सर्व जाति-धर्म भाषेच्या समाजाच्या भावना पंडितजींना विषद केल्या आणि महाराष्ट्र राज्याचा ‘मंगल कलश’ आणला. मराठी राज्याचे स्वप्न साकार झाले. कृष्णाकांठच्या प्रदक्षणेचे हे नवे राजकीय चित्र १ मे १९६० रोजी ( साली ) सर्व भारतीयांना दिसले. कृष्णाकांठच्या माणसाने सागरतटावर उभे राहून तरूण तडफदार मुख्यमंत्र्यांचे आदर्श चित्र भरतीयापुढे निर्माण केले.