यशवंतरावांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान

यशवंतरावांचा देशभक्तीचा जन्म त्यांच्या लहानपणीच भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतून झाला. तिचा परिपोष महात्मा ज्योतिराव फुले, कार्ल मार्क्स, रॉय, महात्मा गांधी व पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या तत्त्व प्रणालीमधून झाला आहे. माध्यमिक शिक्षण घेत असतांना “माझी जन्मठेप” या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकाचा त्यांच्या तरूणमनावर मोठा प्रभाव पडला. त्यांच्या या क्रांतीकारक विचार सरणीच्या प्रेरणेने यशवंतराव आपले तरूणपणचे मित्र राघूआण्णा लिमये यांच्यासह सावकरांना भेटण्यासाठी कर्‍हाडहून रत्‍नागिरीस पायी चालत गेले होते. सावकरांच्याजवळ क्रांतिकारक नेतृत्त्वाचा प्रदीप असला तरी तो लोकशाही समाजवादास पोषक नाही, असे थोड्याच कालावधीत त्यांचे मत झाले. इतिहासाकडे केवळ मार्गदर्शक म्हणून पाहिले पाहिजे, या महत्त्वकांक्षेने प्रेरित होऊन ते कार्यास लागले.

यशवंतराव सोळा वर्षाचे झाले होते तेव्हा १९२९ साल संपत आलं होतं. त्यावेळी देशामध्ये राष्ट्रीय चळवळीने आक्रमक स्वरूप घेतले होते. ‘लाहोरच्या रावी नदीच्या तीरावर राष्ट्रीय कॉंग्रेसचे अधिवेशन होते, पंडित जवाहरलाल नेरहू हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्या अधिवेशनात झालेली कॉंग्रेस नेत्यांची भाषणे वृत्तपत्रातून वाचल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहू लागले’ असे यशवंतराव ‘कृष्णाकाठ’ या आपल्या आत्मचरित्रात सांगतात. ते पुढे लिहितात “रावीच्या तीरावर जमलेल्या या राष्ट्रभक्तांनी काही अखेरचे निर्णय घेतले होते आणि संपूर्ण स्वातंत्र्य हीच आमच्या देशाची एकमेव मागणी ठरली होती, हे वाचून आम्हा सर्वांची मने उल्हासित झाली. त्या अधिवेशनात २६ जानेवारी १९३० रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे ठरले आणि तसे जाहीरही केले होते” या सर्व घडोमोडींचा यशवंतराव व त्यांच्या मित्रांवर परिणाम होत होता. यशवंतराव म्हणतात “कृष्णेच्या काठच्या त्या २६ जानेवारीची ती सुंदर सकाळ मी कधीच विसरू शकणार नाही. मनात दाटलेली भावना आता प्रकट स्वरूपात व्यक्त झाली होती.राष्ट्रीय कॉंग्रेसच्या तिरंगी झेंड्याखाली आज आपण प्रतिज्ञावाचन केल्यामुळे मनाची शांती वाढली होती. माझे राजकीय जीवन खर्‍या अर्थाने सुरू झाले होते.

संपूर्ण देश कायदेभंगाच्या चळवळीने भारून गेला होता राष्ट्रीय आंदोलनातील ह्या टप्प्याने इंग्रजी सत्तेला फार मोठा हादरा बसला होता. या १९३० सालच्या चळवळीचे वैशिष्ट्य असे की, या चळवळीत ग्रामीण समाजाचा प्रतिनिधी वर्ग मोठ्या प्रमाणात जेलमध्ये गेला होता. हे साधे जेलमध्ये जाणे नव्हते, तर स्वातंत्र्याच्या चळवळीचे व्रत स्वीकारणे होते. ग्रामीण समाजाला जागविण्याचे श्रेय बर्‍याच अंशी विठ्ठलरामजी शिंदे आणि केशवराव जेधे यांना दिले पाहिजे. या काळातील या दोघांचे कायदेभंगाच्या चळवळीतील कार्य ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. असे यशवंतरावांचे मत आहे.

१९३० सालच्या सुमारास म. गांधींच्या असहकार चळवळीने सबंध भारत दणाणून टाकला. अनेक भारतीय क्रांतिकारक तरूणांनी ब्रिटिशांच्या पाशवी सत्तेविरूद्ध सशस्त्र क्रांतीचे रणशिंग फुंकिले. इंग्रज सरकारने हजारो सत्याग्रहींना तुरूंगात डांबून ठेवले होते देशांत सर्वत्र ब्रिटीशांच्या शोषणवृत्तीमुळे असंतोष पसरला होता. म. फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे पडसादही महाराष्ट्रात सर्वत्र उमटात होते. सत्यशोधक चळवळ ही सामाजिक विषमतेविरूद्ध वैचारिक क्रांती होती. यशवंतरावांचे बंधू गणपतराव हे कट्टर सत्य शोधक होते. त्यांच्या चळवळ्या जीवनाचा बाल यशवंतरावावर परिणाम होणे अगदी स्वाभाविक होते. कारण भोवतालच्या सर्व घटनांची नोंद घेण्याइतके त्यांचे मन संवेदनक्षम बनले होते. कृष्णेच्या पाण्याचे आणि कर्‍हाडच्या मातीचे गुण यशवंतरावांच्या ठिकाणी वाढत्या वयाबरोबर विकसित झाले. त्यांचे थोरले बंधू ज्ञानोबा यांनी त्यांच्या हृदयमंदिरात ज्ञान-ज्योत प्रज्वलित केली. यशवंतरावांच्या ज्ञानप्राप्तीच्या यशात ज्ञानोबांचा फार मोठा वाटा आहे.

कायदेभंगाच्या चळवळीने जोर धरला. हा स्वातंत्र्य संग्राम अधिकाधिक जनताभिमुख होऊ लागला. तेव्हा सत्ताधारी ब्रिटीश अस्वस्थ झाले. या संग्रामाविरूद्ध लोकांतून काही संघटना उभी रहावी यासाठी यशवंतराव प्रयत्‍न करू लागले, नवे नवे मार्ग शोधू लागले. तरूण पिढी बदललेले वातावरण समजू शकत होती पण सरंजामी पद्धतीचे प्रतिनिधित्त्व करणारी, जुनी मातबर घराणी मात्र नव्या लोकशाहीचे वारे न ओळखता जुन्या सरकार निष्ठेला चिकटून कायम राहिली होती.