याच घाई-गडबडीच्या काळात यशवंतराव २ जून रोजी विवाहबद्ध झाले. यशवंतरावांच्या विवाहाप्रसंगी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने जमले होते. यशवंतराव म्हणतात “एक दृष्टीने जन आंदोलनाचा जो वादळी संसार मला पुढे पहायचा होता, त्यासाठी आवश्यक ती जोडीदारीम मला मिळाली होती.”

आपल्या कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीसाठी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. एक वर्षभर चालला. पण त्यांचे मन या व्यवसायात रमले नाही. भारताचे राजकारण वेगाने पुढे जात होते आणि त्यावेगाच्या प्रवाहात सापडून यशवंतरावही तिकडे खेचले जात होते. त्यांनी ठामपणे निर्णय घेतला होता की, “आमच्या जीवनात राजकारणाला प्राधान्य आहे, कारण राजकारण हे स्वातंत्र्याचे राजकारण आहे आणि आम्ही त्याला मनाने वाहून घेतले आहे.”

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीची ७ ऑगस्टला गवालिया टॅंकवरील बैठकीत पंडितजींनी “आम्ही ब्रिटीशांचे गुलाम म्हणून लढू इच्छित नाही, फॅसिझमचा पराभव करण्यामध्ये भाग घेऊ इच्छितो. परंतु स्वतंत्र देशाचे सैनिक म्हणून” असे स्पष्टपणे सांगितले. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीपुढे बोलतांना गांधीजींनीही आपली भूमिका मांडून स्पष्टपणे सांगितले, “हा शेवटचा लढा आहे आणि या लढ्याचा मंत्र “करू किंवा मरू” असा आहे.”

९ ऑगस्टची सकाळ क्रांतीचे रूप घेऊनच उजाडली मुंबईतील सारी जनता रस्त्यावर आली. सगळीकडे हरताळ व घोषणा असे ते चित्र होते. प्रसिद्ध कार्यकर्त्यांना अटक झाल्याच्या बातम्याही येऊ लागल्या. आणि सावधगिरीने काम करणे गरजेचे बनले. भविष्यात कोणत्या पद्धतीने काम करावयाचे आहे, त्याविषयी कार्यकर्त्यांना कल्पना द्यावयाची होती. या कामासाठी यशवंतरावांनी भूमिगत जीवनाचा श्रीगणेशा केला. ब्रिटीश सत्तेची प्रतिकात्मक सत्तास्थाने असतील त्यांच्या विरूद्ध उठाव, मोर्चा, निदर्शने, झेंडे लावणे असे प्रयत्‍न सुरू होते. ब्रिटीश सत्तेचा पाडाव झाला अशी भावना लोकांत निर्माण करणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे याची गरज होती. मोर्चाची जी चळवळ होती ती त्या भूमिगत चळवळीचे पहिले पाऊल होते. मोर्चाचा पहिला प्रयत्‍न २४ ऑगस्टला मामलेदार कचेरीवर झाला आणि तो यशस्वी झाला.

हळूहळू सातारा, किर्लोस्करवाडी, पलूस, तासगांव, इस्लामपू येथेही मोर्चे झाले. कराड, पाटण, तासगांव, वडूज व इस्लामपूर याठिकाणी झालेले मोर्चे म्हणजे १९४२ च्या चळवळीच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. जनआंदोलनाने उग्र स्वरूप घेतल्या नंतर लोक कुठल्याही स्वार्थत्यागाला कसे तयार होतात याचे दर्शन या परिस्थितीत झाले. यावेळी यशवंतराव फार सावधगिरीने वावरत होते. कारण सरकारने त्यांना पकडण्यासाठी एक हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पण या काळात चांगले कार्यकर्ते व सहकारी मिळाल्याने भूमिगत चळवळ चांगल्या प्रकारे कार्य करू शकली. रोज कुठे ना कुठे चळवळीतील लोकांना पकडण्यासाठी ते धाडी घालत आणि त्यात अयशस्वी झाल्यामुळे चिडून लोकांचा छळ करीत. यशवंतरावांनी या वातावरणापासून दूर असावे असे त्यांच्या मित्रांनी सांगितल्यावरून यशवंतराव मुंबईला आले. तेथे श्री. एस्. एम्. जोशी, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या भेटी होऊन त्यांचे मार्गदर्शनही त्यांना लाभले. इकडे भूमिगत कार्यकर्ते सापडत नसल्यामुळे पोलिसांनी यशवंतरावांच्या कुटुंबियांकडे मोर्चो वळविला. यशवंतरावांच्या थोरल्या बंधूना अटक केली. पण काहीही होवो आपण आपले काम करीत राहिले पाहिजे, हा यशवंतरावांचा निश्चय होता. नंतर सौ. वेणूताईंनाही अटक केली. गणपतरावांना पकडल्यापासून त्यांच्या कुटुंबातील सर्वचजण अस्वस्थ होते. आवाळूच्या ऑपरेशनच्या निमित्ताने यशवंतरावांच्या बंधूंची सुटका झाली. पण जखमेत सेप्टिक होऊन त्यातच न्यूमोनियाचा ताप भरून त्यांचा अंत झाला.