यशवंतराव संस्कार संपन्न विचार व्यक्तिमत्त्व

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या मृत्युनंतर महाराष्ट्रीय नेत्यांनी यशवंतरावांच्या जीवनकार्यापासून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ मुंबई ही संस्था निर्माण केली. तिच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, शेती, कृषी औद्योगिकता आणि समाजवादी समाजरचनेच्या त्यांच्या विचारांचा मराठी माणसांना परिचय करून देण्याचे काम सुरू केले आहे. यशवंतरावांच्या मानवतावादी जीवननिष्ठेचा आदर्श विचार आज भारतीय समाजजीवनाला अत्यावश्यक ठरला आहे.

मानवतावादावरील जीवननिष्ठा हा मानवी मनाच्या विशालतेचा शिखर बिंदू ठरतो. अखिल मानव जातीवर प्रेम करण्या इतपत झालेला मानवी मनाचा विकास म्हणजे मानवतावादी मनोधारणा. एखाद्या व्यक्तिच्या मनाचा असा विकास होणे हे त्याच्या बालपणापासून मनावर होणार्‍या संस्कारावर अवलंबून असतो. संस्कार म्हणजेच मानवी मनाचा विकास. संस्कार द्विविध स्वरूपाचे असतात. चांगले संस्कार जसे असतात तसेच वाईटही संस्कार होतात. सुसंस्काराचे महत्त्व यामुळेच वाढते. सुसंस्कार, माणसाला मानवतावादापर्यंत घेऊन जातात. शिक्षण हे या सुसंस्कारासाठी आवश्यक असते. व्यक्तिच्या मनावर सुसंस्काराचे ठसे उमटवून तिला सर्व प्राणी मात्रावर प्रेम करायला शिकविणे हा मराठी साधुसंतानी दिलेला वारसा याचेच प्रत्यंतर देता.

अशा मराठी सुपुत्रात यशवंतरावजी चव्हाण यांचे नांव घ्यावे लागते. यशवंतरावांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण होई पर्यंत ते दर दिवाळीच्या-उन्हाळ्याच्या सुट्टीत देवराष्ट्राला जात असत. याच काळात त्यांच्या असे लक्षात आले की, गावातील माणसे वेगवेगळ्या जातीची असली तरी गरीबीतही आपली माणुसकी टिकविणारी होती. एकमेकांशी माणुसकीच्या नात्याची बांधिलकी होती पण त्याच बरोबर गावाबाहेर राहणार्‍या महार, मांग, चांभार यांच्याशी मात्र इतरांचा व्यवहार माणुसकीचा निश्चित नव्हता ही बोच ही त्यांना त्याकाळात होती. त्यांच्या निरीक्षणातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या लक्षात आली ती अशी की, “शेतीशी संबंध असलेला माणूस नजीकच्या राजकीय सत्तेला फार वरीष्ठ मानतो.” यशवंतराव म्हणतात, “देवराष्ट्रयाच्या या अनुभवाची शिदोरी माझ्या मनाला एक प्रकारचे शिक्षण देत होती. कार्यकर्ता म्हणून कार्य करण्यास लागणारी जी मनाची तयारी असावी लागते आणि सामाजिक जाणिवांची माहिती असणे आवश्यक असते ती यातून मिळत गेली.”

यशवंतरावांची आई साधी भोळी, श्रद्धाळू, धार्मिक आणि वृत्तीने सरळ असलेली माता, संपत्तीने नसल्यातरी संस्काराने श्रीमंत, हीच श्रीमंती त्यांनी यशवंतरावांना दिली. ईश्वर आपल्या पाठीशी आहे ही मातेची निष्ठा. या निष्ठेने त्यांनी जीवनभर संकटाशी सामना केला. हिंमत सोडू नये, असा मुलांना उपदेश करताना आई एक ओवी म्हणत असे.

“नका बाळानो डगमगू | चंद्र सूर्यावरील जाईल ढगू” आईचा हा संदेश यशवंतरावांच्या मनी मानसी चांगलाच रूजला. संकटं आली तरी ज्या वाटेने ती येतात त्याच वाटेनं ती निघून जातात हा धडा आईच्या सान्निध्यात लहानपणापासूनच गिरवला गेलेला असल्यानं यशवंतराव पुढे कोणत्याही संकटात डगमगले नाहीत.

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारक्षम व्यक्तिमत्त्वाचा जो विकास झालेला दिसतो त्यातून अशी एक वैचारिक बैठकही प्रत्ययाला येते. प्रतिष्ठानचे काम करीत असतांना यशवंतरावांच्या संस्कारक्षम व्यक्तित्वाचा बैठकीतून प्रत्ययाला येणार्‍या वैचारिकतेची जाणीव मला प्रकर्शाने झाली. आजच्या भारतीय राजकीय आणि सामाजिक गोंधळलेला समाज माणसाला यशवंतरावाजींचे या संबंधीचे विचार पथदर्शक ठरतील असे वाटते.