या काळात सातारा जिल्ह्यात भूमिगत चळवळ ही गनिमी काव्याची सशस्त्र चळवळ होण्याच्या मार्गाला लागली होती. याच चळवळीला पुढे “पत्री सरकार” असे नांव मिळाले. सरकारबरोबर आणि सरकारधार्जिण्या समाजकंटकांशी लढणे हे त्यांनी आपले एक महत्त्वाचे काम मानले होते. याच काळात सौ. वेणूताईंची तब्येतही बिघडली. निश्चित निदान होईना म्हणून व्यवस्थित देखभाल व्हावी यासाठी त्यांना माहेरी फलटणला पाठवून दिले. नंतर त्यांची तब्येत खूपच बिघडल्याचे कळताच त्यांना भेटण्यासाठी यशवंतराव फलटणला गेले. तेथे दोन दिवस थांबले असता फलटण संस्थानच्या पोलिसांनी यशवंतरावांच्या सासुरवाडीच्या घराला वेढा घातला. वेणूताईंची समजूत घालून यशवंतराव अखेर पोलिसांच्या स्वाधीन झाले. दहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. येरवड्याच्या या तुरूंगातील वास्तव्यात राज्यक्रांतीसंबंधीचे सारे वाङ्‌मय यशवंतरावांनी वाचून काढले. बरोबररीच्या मंडळीसोबत जिल्ह्याच्या परिस्थितीसंबंधाने खूप तपशीलवार चर्चा होत असे. नंतर सुटका होऊन दोन-तीन आठवडे झाले तेव्हा पन्हा सौ. वेणूबाईंना भेटण्यासाठी यशवंतराव फलटणला गेले आणि फलटणमध्ये असतानाच सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांनी प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याने वॉरंट यशवंतरावांच्यावर बजावले आणि यशवंतरावांना पुन्हा पकडण्यात आले. येरवड्याचा प्रवास पुन्हा सुरू झाला. हे सारे करीत असतांना “सौ. वेणूबाईंची कुठलीच अपेक्षा आपण पुरी करू शकलो नाही. याचे शल्य माझ्या मनात होते” असे यशवंतराव म्हणतात.

इकडे भूमिगत चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांचा दबदबा वाढत जात होता. १९४५ च्या सुमारास ब्रिटीशांच्या अंतर्गत राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली. ज्या राष्ट्रीय सरकाने जर्मनीचा पराभव करीतोपर्यंत युद्धाचे नेतृत्व केले होते. ते राष्ट्रीय सरकार संपुष्टात आले. १९४५ साली चर्चिल आणि अ‍ॅटली या दोहोत निवडणूक होऊन चर्चिल, युद्धकाळचा हा इंग्लंडचा परमश्रेष्ठ नेता, एका पराभूत पक्षाचा नेता ठरला आणि हिंदुस्थानातील सत्तांतराच्या राजकीय हालचालीनी ह्या हालचालीनी ह्या क्षणी जन्म घेतला.

१९४२ च्या आंदोलनानुसार १९४६ साली होत असलेली ही पहिली निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीचा प्रचार हा चळवळीच्या यशाचा प्रचार होता. सातारा जिल्हा दक्षिण मतदार संघातून निवडणुकीला यशवंतराव चव्हाण, बाबूराव गोखले, व्यंकटराव पवार आणि के. डी. पाटील हे चार उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले. कराड, पाटण, वाळवे, शिराळा, खानापूर, तासगांव असा यशवंतरावांचा मतदार संघ होता. त्या काळात निवडणुकीसाठी अवघे दिडशे रूपये खर्च आला. त्यावेळी ते मिळवते होते, थोडीफार वकिली सुरू होती. त्या मिळकतीतूनच स्वत:साठी त्यांनी हा खर्च केला. सातारा जिल्ह्यातील त्यांचं नेतृत्व मुंबईत पोचलं.

निवडणुका संपल्या आणि पुन्हा कॉंग्रेसची मंत्रीमंडळे देशात अधिकारावर आली. बाळासाहेब खेर हे मुंबई राज्याचे त्यावेळी नेते होते. त्यांनी आपले मंत्रीमंडळ तयार केले. त्यात मोरारजी देसाई, जीवराज मेहता अशांसारख्या ज्येष्ठांचा समावेश होता. यशवंतरावांना मंत्रीमंडळात मंत्री म्हणून स्थान मिळावं अशी सार्‍यांचीच अपेक्षा होती. पण बाळासाहेब खेरांनी त्यांना बोलावून ‘पार्लमेंटरी सेक्रेटरी’ म्हणून त्यांची निवड केल्याचे सांगितले. यशंतराव म्हणतात “माझे काम आणि माझी जाण यांच्या तुलनेने हे किरकोळ काम आहे. अशी माझी भावना झाली” “पण सर्व मित्रांच्या आणि कुटुंबियांच्या आग्रहाने त्यांनी हे पद स्वीकारले. आयुष्यात एका मोहक वळणावर ते आता उभे होते.” यशवंतराव पुढे म्हणतात “गाडीत निवांत बसल्यावर माझ्या मनात विचारांचे काहूर उठले. भूतकाळातील सुखदु:खांची धुसर क्षणचित्रे डोळ्यापुढे येऊ लागली. त्याच प्रमाणे अनोळखी पण रंगतदार भविष्याची बोटेही आपल्याला पालवताहेत, असे वाटले. माझ्या मनात येऊन गेले, की माझ्या जीवनात मोठा बदल झाला आहे. कृष्णाकांठी वाढलो, हिंडलो, फिरलो, झगडलो, अनेक नवी कामे केली, मैत्री केली, माणसे जोडली, मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा काळ होता. आता मी कृष्णाकांठ सोडून नव्या क्षितीजाकडे चाललो आहे. आता ती क्षितिजे रंगीबेरंगी दिसत आहेत. परंतु प्रत्यक्षात तेथे पोहोचेपर्यंत. ती तशीच राहतील का? कोण जाणे.”

इथे यशवंतराव चव्हाणांच्या आयुष्यातील एक पर्व संपले.