साहेबांनी या ठरावाला पाठिंबा देण्यामागची आपली प्रांजळ भूमिका समोर मांडली. संयुक्त महाराष्ट्राबद्दलची तळमळ साहेबांच्या भाषणातून व्यतीत होत होती. हे भाषण करतेवेळी साहेब मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात एक जबाबदार मंत्रीही होते. सत्तेची लालसा बाळगणार्यांपैकी साहेब नव्हते. साहेबांनी प्रथम तोफ डागली ती गुजराथी मनोवृत्तीवर.
म्हणाले, ''मुंबईवरचा हक्क गुजरात सोडत नसेल तर तो त्यांचा स्वातंत्र्यावरील नवा वसाहतवाद ठरेल. ब्रिटिशांचा वसाहतवाद आम्ही मोडून काढला. गुजरातच्या दबावाला आम्ही बळी पडलो तर हा नवीन वसाहतवाद आम्ही स्वीकारला असा अर्थ आमची भावी पिढी काढेल. ती आम्हाला माफ करणार नाही. आम्हाला हा वसाहतवाद झुगारून द्यावयाचा आहे; पण शांततेच्या मार्गानं, समजुतीच्या मार्गानं. नेहरूजींचं मनपरिवर्तन करून आम्ही संयुक्त महाराष्ट्र मिळविणार आहोत.''
साहेबांच्या या घणाघाती भाषणानं सभेतील साहेबांचे पाठीराखे आणि छुपे विरोधक अचंबित झाले. साहेबांवर करण्यात येत असलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचार साहेब शब्दास्त्राने घेत होते. साहेबांनी सत्तेला चिकटून न राहता राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे असा मानभावी सल्ला रँ. परांजपे यांनी दिला. त्यांचं नाव न घेता साहेबांनी मर्मभेदक शब्दास्त्रांनी त्यांना घायाळ केले.
म्हणाले, ''महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीनं सदसदविवेकबुद्धीला अनुसरून मला राजीनामा देण्याचा आदेश द्यावा. मी क्षणाचाही उशीर करणार नाही. कारण मी काँग्रेसचा शिपाई आहे. माझा काही त्याग यापाठीमागे आहे. पण कुणाच्या सांगण्यावरून जर मला राजीनाम्याचा आदेश देत असतील तर मी या आदेशाला कचर्याच्या टोपलीचा रस्ता दाखवील. आम्ही छातीवर गोळ्या झेलून इथपर्यंत आलो आहोत. घरावर तुळशीपत्र ठेवून रानोमाळ भटकलो, उपाशीतापाशी रात्र-रात्र जागून काढल्या, जनतेच्या संकटकाळी जीवाची पर्वा न करता त्यांच्या मदतीला धावून गेलो. घरात बसलो नाही. विरोध सत्तेशी लागेबांधे असलेल्यांनी तरी आम्हाला असा सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये व तसा त्यांना अधिकर नाही.''
रँ. परांजपेंच्या पिलावळीत चुळबूळ सुरू झाली. काहींनी सभेतून काढता पाय घेतला. साहेब भाषण संपवून आपल्या जागेवर बसले. साहेबांच्या विचारानं भावरलेल्या तरुण मंडळीनं साहेबांच्या भोवती गर्दी केली. साहेब सर्वांना भेटू लागले. त्यांची ख्यालीखुशाली विचारू लागले. आठ तासांच्या चर्चेनंतर सभेनं द्वैभाषिक राज्याचा ठराव संमत केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं जरी द्वैभाषिक राज्याच्या मान्यतेचा ठराव घेतला असला तरी गुजरात प्रदेश काँग्रेसनं मुंबई राज्यातील गुजराती भाग, कच्छ, सौराष्ट्र यांचं मिळून एक राज्य करावं असा ठराव पास केला. आंध्र राज्य झाल्यानं मराठवाड्यातील जनतेनं महाराष्ट्रसोबत राहण्याचा ठराव पास केला. नागपूर प्रदेश काँग्रेसनं महाविदर्भाचं स्वागत केलं. उलट मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश महाविदर्भात करावा असा ठराव पास केला. मुंबई प्रदेश आणि कॉर्पोरेशनच्या बाबतीत स. का. पाटील यांनी वेगळीच भूमिका घेतली. महाराष्ट्र काँग्रेसचा ठराव लोकशाहीविरोधी आहे, असे आपल्या अकलेचे तारे त्यांनी तोडले. मुंबई महानगरपालिकेत संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या बाजूचं बहुमत होतं. महानगरपालिकेनं संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ठराव पास करून घेतला. स. का पाटील यांची बोलती बंद केली. अशा तर्हेनं महाराष्ट्राचे लचके तोडण्यात येत होते.