बाहेर मुंबई अशांत बनलेली असता कायदेमंडळात बसून चर्चा करणं साहेब, बाळासाहेब देसाई, देवगिरीकर आणि हिरे यांना चांगलं वाटलं नाही. त्यांनी मोरारजींना विनंती केली की, दिल्लीहून चर्चेला तहकुबी मिळवा. मोरारजींनी लगेच दिल्लीला मुंबईच्या परिस्थितीची कल्पना दिली. दिल्लीनं चर्चा तहकुबीला मान्यता दिली. २२ नोव्हेंबरला २४२ विरुद्ध २८ या फरकानं चर्चा तहकुबी मंजूर झाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १० जणांचा बळी घेतला. ३०० च्या वर लोक जखमी झाले. बंदुकीच्या ८० फैरी झाडण्यात आल्या. या घटनेचं आयतं कोलीत विरोधकांच्या हाती पडलं. त्यांनी जनतेला या अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याचं आवाहन केलं. चिथावणीखोर भाषा वापरून जनतेच्या भावनेला आव्हान दिलं.
द्विधा मनःस्थितीत काँग्रेसजन हिरे यांच्या निवासस्थानी एकत्र आले. श्रेष्ठींवर दबावतंत्राचा वापर कसा करावा याचा विचार करू लागले. कुंटे सभापती असूनही त्यांनी सर्व संकेत झुगारून या चर्चेत भाग घेतला. आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशाप्रमाणे चालायचे की वगि कमिटीच्या आज्ञा पाळायच्या याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. हिरे यांनी आपल्याकडे ११६ राजीनामे आल्याची माहिती दिली. कुंटे यांनी हे राजीनामे सभापतींकडे पाठविण्याची सूचना मांडली. या सूचनेला देव आणि हिरे यांनी विरोध केला. 'सभापती आपल्याकडे आलेले राजीनामे स्वीकारून मंजूर कूर शकतो' या सर्व वांझोट्या चर्चेचा सर्वांना उबग आला. त्यात साहेबांनी आपलं मत व्यक्त केलं.
म्हणाजे, ''मी राजीनामा देण्याच्या विरोधात आहे. आपण राजीनामे दिले तरी आपला उद्देश साध्य होऊ शकत नाही. कारण आपल्या बाजूनं बहुमत नाही. संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्यांची संख्या अधिक आहे. राजीनामा देऊन हात दाखवत अवलक्षण कारून घेऊ नये. मी असं ठरविलं आहे की, यापुढे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या काही पदाधिकार्यांच्या मताप्रमाणे मला वागता येणार नाही. मी वगि कमिटीच्या निर्णयाश बांधील राहण्याचं ठरविलं आहे.''
साहेबांच्या या भूमिकेनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली. काहींनी साहेबांच्या वक्तव्याचं भांडवल करून आपल्या मनात साहेबांबद्दल जी असूया होती त्यांनी गरळ ओकण्यास सुरुवात केली. देवांचा स्वतःवरील ताबा सुटला. ते खासगीत साहेबांच्या विरोधात तिरस्कारानं बोलू लागले. तोल गेल्यानं तुच्छतापूर्वक वक्तव्ये करू लागले. देवगिरीकरांकडून ही माहिती साहेबांना समजताच साहेबांनी देवांना यापुढे कुठल्याच चर्चेच्या वेळी बोलवायचं नाही असं ठरवून टाकलं. देव आणि साहेब यांच्यात तेढ वाढत गेली. काँग्रेस अध्यक्षांचा लेखी आदेश नसताना केवळ भावनेच्या आहारी जाऊन राजीनामा देणे साहेबांना पटत नव्हते. साहेबांच्या या विचाराचा एक गट तयार झाला व भावनेच्या लाटेवर स्वार होऊन राजीनामा देणारा एक गट असं चित्र काँग्रेस पक्षात निर्माण झालं.
देवांनी आत्मशुद्धीसाठी केलेले ५ दिवसांचे उपोषण संपवून ते पंत यांच्याशी चर्चा करावयास हिरेंसोबत दिल्लीला गेले. सातारा जिल्हा काँग्रेस समितीची बैठक फलटण येथील नाईक-निंबाळकर यांच्या मनमोहन राजवाड्यात १ डिसेंबरला आयोजित करण्यात आली. या बैठकीला साहेब, नाईक-निंबाळकर आणि तपासे हे मोरारजींच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्री हजर होते. राजीनामा न देण्यामागची आपली भूमिका साहेब या बैठकीत मांडणार होते. झाडून सातारा जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्ते या बैठकीस हजर होते. या बैठकीतील साहेबांचं भाषण साहेबांच्या भावी वाटचालीला दिशा देणारं ठरलं. त्यांनी या सभेत केलेल्या वक्तव्यामुळं हितसंबंधी लोकांनी साहेबांच्या विरोधात टीकेचं मोहोळ उठविलं. साहेबांच्या बोलण्याचा अर्थ आपल्या सोयीचा काढून साहेबांना टीकेचं लक्ष्य बनविलं.