१८ नोव्हेंबरच्या घटनेनं मुंबईचं वातावरण तापलेलं होतं. सेनापती बापट, अत्रे, मिरजकर यांना झालेली अटक याचा निषेध म्हणून एस. एम. जोशी यांनी २१ नोव्हेंबरला संपूर्ण हरताळ पाळण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. संयुक्त महाराष्ट्र परिषदेनं जनतेच्या मनावर अधिराज्य निर्माण केलं होतं. काँग्रेसमध्ये एकवाक्यता आढळून येत नव्हती. जनतेचं समाधान करणारी उत्तरं काँग्रेसकडे नव्हती. हिरे, देव यांची मुंबई, दिल्ली वारी निष्फळ ठरत होती. देवगिरीकर-गाडगीळ जोडी दिल्लीत श्रेष्ठींचं मतपरिवर्तन करण्यात गढून गेली होती. मोरारजी आणि स. का. पाटील यांची चौपाटीवरील सभा २० नोव्हेंबरला झाली. या सभेत मुंबईतील व मुंबईवर जीवापाड प्रेम करणारी जनता बहुसंख्येनं हजर होती. जनतेतून अनेक जिव्हाळ्याच्य प्रश्नांचा मारा होऊ लागला. या प्रश्नांच्या मार्यांनी मोरारजी हैराण झाले. जनतेच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देण्यास हे दोन्ही नेते कमी पडू लागले. सभेचं वातावरण तापू लागलं. सभेत गडबड-गोंधळास सुरुवात झाली तरीही मोरारजींनी आपलं भाषण सुरूच ठेवलं.
म्हणाले, ''सभेत धुडगूस घालून व गुंडगिरी करून तुम्ही माझं भाषण बंद करू शकाल; पण गुंडगिरीच्या दबावाला मी बळी पडणार नाही. या मार्गानं मी तुम्हाला मुंबई मिळू देणार नाही.''
यावरून सभेत दगडफेक सुरू झाली. एका दगडानं मोरारजींचा कपाळमोक्ष केला. स. का. पाटील यांनी सभेत आगीत तेल ओतण्याचं काम केलं. त्यांनी 'मुंबई ५ हजार वर्षे महाराष्ट्राला मिळणार नाही.' अशी मोहम्मद तुघलकी घोषणा आपल्या भाषणात केली. जनता पेटून उठली. आक्रमक होऊन व्यासपीठाच्या दिशेने धावली. पोलिसांच्या सुरक्षा कवचाच्या साहाय्यानं दोघांना मोटारीत बसविण्यात आलं. जनतेनं या दोघांच्या गाड्यांवर दगड, चपला व बुटांचा मारा केला.
संयुक्त महाराष्ट्र कृती समितीनं २१ नोव्हेंबरला हरताळ पाळण्याचा आदेश दिला होता. आदल्या दिवशीच्या सभेत मोरारजी देसाई व स. का. पाटील यांनी महाराष्ट्र जनतेच्या स्वाभिमानाला डिवचलं होतं. मुंबईतील स्वाभिमानी जनतेनं स्वयंस्फूर्तीनं हरताळ पाळण्याचं ठरविलं. सकाळी हजारो लोकांच्या झुंडीच्या झुंडी असेंब्लीच्या दिशेनं निघाल्या. कुणी मार्गदर्शक नाही, कुणी नेता नाही. या जनसमुदायानं 'फ्लोराफाऊंटन' इथं जनसागराचं रूप धारणप केलं. मोरारजी आणि स. का. पाटील यांनी काल केलेल्या वक्तव्याचा राग मनात होता. मोरारजींनी पोलिसांना मोर्चेकर्यांना अडविण्याचे व सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. शांततेचा भंग करणार्यांना सक्तीनं निपटून काढा, असे अधिकारही पोलिसांना दिले.
पोलिस मोठ्या संख्येने फ्लोराफाऊंटन येथे हजर होते. त्यांच्या मदतीला होमगार्डची नेमणूक केली होती. जनतेचा रेटा वाढतच गेला. पोलिसांनी त्यांना थोपविण्याचा प्रयत्न केला. जनतेचा असंतोष, क्रोध अनावर झाला. त्यांनी पोलिसांवर चाल केली. पोलिसांना अश्रुधूर, लाठीचार्ज इत्यादी मार्गांचा अवलंब करावा लागला. गोळीबारानं एकएकाला टिपलं जाऊ लागलं. गोळीबारानं जनतेचे बळी घेतले जात आहेत अशी वार्ता असेंब्लीमध्ये पोहोचली. एस. एम. जोशी, नौशेद भरुचा, अमुल देसाई हे जनतेला सामोरे गेले. त्यांनी जनतेला थोपवलं. त्यांनी जनतेला 'तुम्ही चौपाटीवर चला, आम्ही तिथे येऊन सभा घेतो' असं आवाहन केलं. जनता चौपाटीकडं वळली. सभा शांततेत पार पडली. संयुक्त महाराष्ट्राचे नेते बनलेले देव किंवा हिरे जनतेला सामोरे जाऊ शकले नाहीत.