''कुठली जबाबदारी म्हणतेस तू ?'' साहेब.
''अहो, माझा भाऊ बाबासाहेब. त्याचं लग्नाचं वय झालंय. त्याचं लग्न नको का करायला ? तुम्ही लक्ष नको का घालायला ?'' मी.
''वेणू, तू, चंद्रिकाताई आणि दादसाहेब जगताप यांनी बाबासाहेबच्या लग्नाबद्दल काय निर्णय घ्यायचा तो घ्या. माझी संमती राहील.'' साहेब.
''हे झालं बाबासाहेबांच्या बाबतीत. आपल्याही लेकी आता उपवर झाल्या म्हटलं... त्यांचं नको का बघायला ? आई सारख्या निरोप पाठवताहेत मला - एकदाचं या मुलींना उजवून टाका म्हणून.'' मी.
''अरे हो, माझ्या लक्षातच नाही. बरं झालं तू आठवण करून दिली. तू असं कर, फलटणला जाऊन बाबासाहेबांचं लग्न जमवून ते पार पडलं की, लगेच कराडला जा. आईच्या मनासारखी स्थळं बघ. तुला व आईला मुलं पसंत पडल्यानंतर माझ्या पसंतीचा प्रश्न येतोय कुठे ? दोघींचंही लग्न करून टाकू.'' साहेब.
साहेबांची परवानगी घेऊन मी फलटणला पोहोचले. आम्ही चौघी बहिणी, चंद्रिकाताईचे यजमान दादासाहेब जगताप एकत्र बसून चार-पाच स्थळांच्या बाबतीत विचारविनिमय केला. त्यापैकी एक मुलगी बाबासाहेबला पसंत पडली. कराडहून आई, सोनूताई आणि सर्व पुतण्या-पुतणे लग्नाला आले. चव्हाण आणि मोरे कुटुंबांनी घर कसं भरल्यासारखं वाटत होतं. आम्ही लग्नाची काढलेली तारीख साहेबांना सोयीची नव्हती. बाबासाहेबाचं लग्न मोरे घराण्याच्या इभ्रतीला शोभेल असं पारं पडलं. आई, सोनूताई व मुलं चार दिवस फलटणला राहून कराडला परतली. मी आल्यागेल्या सर्व पाहुण्यांचा पाहुणचार पार पाडून त्यांना वाटी लावत होते. सर्वांचे मानपान येथोचित केले.
चंद्रिकाताई व दादासाहेब यांचा निरोप घेऊन मी कराडला आले. कराडला पोहोचल्यावर घाटगे आणि कामेरीचे जाधव यांना निरोप पाठवून बोलावून घेतले. त्यांच्या साहाय्यानं वर संशोधन सुरू केलं. आई सांगायच्या - अमुक अमुक गावचे पाहुणे सोईरपणासाठी चांगले आहेत. तिथे वर असेल तर त्या ठिकाणी मुलगी द्यावयास हरकत नाही. सुधा आणि लीला सारख्या माझ्या आजूबाजूला काकी... काकी... करत घुटमळत. मी, आई व मुलींच्या मामांनी मिळून ज्ञानोबा व गणपतरावांच्या लेकी सुधा आणि लीला यांचे विवाह जमविले. दोघी लेकींचं कन्यादान साहेबांनी केलं. दोन्ही लेकींचे विवाह पार पाडल्यानंतर शामराव पवार व दिनकरराव कोतवाल यांच्या विवाहासंबंधी घरात चर्चा सरू झाली. साहेबांनी या दोघांच्या विवाहाबाबत एक-दोन ठिकाणी बोलणी केली. साहेबांच्या प्रयत्नाला यश आलं.
चार-पाच महिन्यांच्या अंतरानं या दोघांचे विवाह पार पडले. दादा आणि राजाला सोबत घेऊन साहेब पुण्याला गेले. त्यांची पुणे येथे मॉडर्न हायस्कूलच्या वसतिगृहात राहण्याची व्यवस्था केली. दोघंही या शाळेत मजेत शिक्षण घेऊ लागले. अशोकला मात्र साहेबांनी ठाण्यातील आचार्य भिसे यांच्या शारदा आश्रमात दाखल केलं. मुलांची शिक्षणाची व्यवस्था झाल्यानंतर मी चार-सहा दिवस कराडला राहिले. आईला मुंबईला घेऊन जावं असा मी विचार केला; पण आईच्या मनाची तयारी होत नव्हती. सोनूताईही आईला पाठवावयास तयार नव्हत्या. माझ्यापेक्षा त्यांचा अधिकार आईवर जास्त होता. सोनूताई या आईची भाची. साहेबांवरील जबाबदारी त्यांच्या सहकार्यानं पार पाडून मी मुंबईला परतले.