''आयुष्यातील बरीच वर्षे दु:खाशी सोबत करूनही दिलाचा दिलदारपणा राहणे हे देणे देवाचे असावे लागते. माझ्या आईचे जीवन दीपज्योतीसारखे मला नेहमीच वाटले. दिवा जळत असतो. त्याच्या प्रकाशात माणसे वावरत असतात. पण आपण लोकांच्या उपयोगी पडत आहोत, हे त्या ज्योतीला, त्या प्रकाशाला माहिती नसते. ते दीपज्योतीचे जळणे आईचे होते,'' जीवनाच्या अपयशासंबंधी यशवंतराव सांगून जातात, ''जीवनाच्या कितीतरी परीक्षांमध्ये आपल्याला अपयश येते. पण केवळ अपयश आले म्हणून आपण धीर सोडता कामा नये. हिम्मत धरून आणि आपल्या अपयशाची कारणे समजावून घेऊन योग्य दिशेने आत्मविश्वासपूर्वक व जोमाने आपण प्रयत्‍न केले तर आपले ईप्सित साध्य होण्याच्या मार्गात कोणतेच अडथळे येणार नाहीत. ज्ञान संपादनाची आपली आवड व यशाची ईर्षा आपण कायम राखली तर अपयशामुळे आपण अधिक कार्यक्षम व कार्यप्रवण बनू शकतो, असाच आपल्याला अनुभव येईल.''

महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दलचे स्वप्न रंगविताना यशवंतराव म्हणतात, ''शिवाजीच्या परंपरेने शोभायमान झालेला महाराष्ट्राचा इतिहास अडून बसणार नाही, तो पुढे पुढे जाणार आहे. तो महाराष्ट्राचे जीवन उज्ज्वल करील., एवढेच नव्हे, तर जी मानवी मूल्ये आम्हाला आमच्या परंपरेतून मिळाली आहेत, त्याच्या बळावर मानवी जीवनाची सेवा करण्यातही तो मागे हटणार नाही.''

देशाच्या समृद्ध व संपन्न परंपरेचा विकास करण्यासाठी तरुणांनी सदैव तत्पर असले पाहिजे, यावर यशवंतरावांचा विशेष भर होता. त्या दृष्टीने त्यांनी युवापिढीशी सुसंवाद साधून त्यांचा विश्वास प्राप्त केला होता. त्यांनी आपल्या आयुष्याचा संघर्षग्रंथ त्यांच्या पुढे ठेवून त्यांना एक प्रकारे आवाहनच केले आहे. आपली स्वत:ची माणूस म्हणून जी जडण-घडण झाली, ती त्यांनी मोठया तन्मयतेने रेखाटली, रंगविली., तीही आपल्या स्वप्नातील सच्चादिल, सुसंस्कृत व समर्थ माणूस कसा असावा, हे दर्शविण्यासाठीच. माणसाच्या माणूसपणाचे यशवंतरावांना मोठे अप्रूप होते.

असे व्यक्तिमत्त्व आता काळाच्या पडद्याआड गेले आहे., पण त्यांचे विचार मात्र चिरंतर राहिले आहेत. त्यातून त्यांचे 'माणसा' विषयीचे खरे निरीक्षण कसे होते याचा उलगडा सहजपणे होत राहतो.