यशवंतराव: दलितांचा दिलासा

यशवंतराव चव्हाणांचे नेतेपण हे सर्वसामान्य थरातील जनतेतूनच निर्माण झालेले होते, म्हणूनच ते सर्वसामान्य जनतेची विशेषत: खालच्या थरातील जनतेची दु:खे काय आहेत हे जाणू शकले. जनतेच्या दु:खाशी समरस होऊन आणि जनतेची दु:खे निवारण्याच्या दिशेने निश्चित अशी पावले त्यांनी टाकलेली होती. त्यांच्या कार्याला पुरोगामी व शास्त्रीय विचारांची बैठक होती. यशवंतरावांचा मूळ पिंडच लोकशाही समाजवादाचा असल्याने समाजवादी समाजरचनेचे ध्येय त्यांनी साध्य केले. आपल्या ध्येयवादी दृष्टीकोनातून पण पक्षीय बंधनाच्या चाकोरीतून कार्य करीत असतानाच त्यांनी महाराष्ट्रातील पददलित अस्पृश्यांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य दिशेने पावले टाकलेली दिसून येतात. त्यात त्यांचे धैर्य व दूरदृष्टी होती. समाजाचं सर्वांगीण परिवर्तन यशवंतरावांना अभिप्रेत होतं. पददलितांच्या समस्या सोडविण्याची मूळ दृष्टी व त्यामागील प्रामाणिक तळमळ व शुद्ध हेतू दिसून येतो. तसेच त्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कामाला तर्कशुद्ध आणि तात्त्विक बैठकही होती.

अस्पृश्यता ही भारतीय हिंदू समाजाला शतकानुशतके लागलेली समाजघातकी, राष्ट्रघातकी कीड आहे. अस्पृश्यतेच्या भयंकर गुलामगिरीमुळे अस्पृश्यवर्ग सामाजिकदृष्टया हीन, आर्थिक दरिद्री, राजकीयदृष्टया वरिष्ठांचा सेवक-चाकर बनला होता. आणि शिक्षण संस्कृतीपासून कायमचा दूर फेकला गेला होता.

अस्पृश्यतेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी व त्यांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारप्रणालीने व प्रत्यक्ष कार्याने अस्पृश्यता वर्गात स्वाभिमान, महत्त्वाकांक्षा व जागृती निर्माण केली. ''स्वत:चा उद्धार केला पाहिजे, आपण स्वयंप्रकाशित झाले पाहिजे'' याची पूर्ण शिकवण त्यांनी दलित वर्गाला दिली.

महाराष्ट्रात विचारी समाज निर्माण व्हावा, तो सुसंस्कृत असावा, त्याच्या मध्ये ज्ञान-विज्ञानाची आस्था निर्माण व्हावी आणि त्या समाजानं स्वकष्टानं जीवन समृद्ध बनवावं यासाठी ते सतत व्यग्र राहिले. जातीपातीवर आधारलेली खेड्यातील समाजरचना नाहिशी करून समता, बंधुता, स्वतंत्रता, न्याय अशी नव्या मूल्यावर आधारलेली नवी ग्रामीण जीवन पद्धती महाराष्ट्रात रुजविण्याचे विचार यशवंतरावजी प्रथमपासूनच मनात बाळगून होते. जातिभेदाच्या भिंती मोडून त्यांना मानवता मुक्त करावयाची होती.

ज्या गुणांमुळे यशवंतरावांना जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले ते गुण म्हणजे शासनाचे धोरण ठरवितांना जे मागास आहेत त्यांचा विसर त्यांना कधी होत नाही आणि विविध क्षेत्रातील गुणांचे चीज करतांना जातीची आठवण कधी होत नाही ! महाराष्ट्रात गुणांची जातीनिरपेक्ष नि:संकोच प्रशंसा त्यांचे इतकी कुणीहि केली नाही. विचारांची व्यापकता आणि बुद्धीची कुशाग्रता यामुळेच त्यांना ते शक्य झाले. आजच्या नव्या अभ्यासक्रामामुळे मागासवर्गीयांची पहिल्या पिढीत शिक्षण घेणारी मुले बरबाद होणार आहेत. या प्रश्नावर यशवंतराव अद्याप सविस्तर बोललेले आढळून येत नाही. तथापि अलिकडे एकदाच त्यांनी या प्रश्नाला ओझरता स्पर्श केला व मर्मभेद साधला ! ते म्हणाले की, “शिक्षणाचा विचार सामाजिक पार्श्वभूमी विसरून करता येणार नाही !” सारा आशय एका वाक्यातून प्रगट व्हावा असे हे वाक्य फक्त यशवंतरावच बोलू शकतात !.

योगायोग पहा कसा आहे की, नेमकी या विचारांना आचरणात आणण्याची संधी यशवंतरावांना मिळाली तीही चौदा एप्रिलला पार्लमेंटरी सेक्रेटरीपदाची सूत्रे स्वीकारून! म्हणजे यशवंतरावांच्या कार्याची सुरुवात आणि डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांचा जन्मदिन एका दिवशी एकाच तारखेला येणे हा कपिलाषष्ठीचा योगच मानला पाहिजे.

स्वातंत्र्याच्या काळात आपल्या भारतीय राज्यघटनेने सतराव्या कलमाने अस्पृश्यता नष्ट करून ती मानणे हा गुन्हा ठरविला. भारत सरकारने १९५५ साली अस्पृश्यता नष्ट करणारा भारतव्यापी असा कायदा केला. भारत सरकारचा हा कायदा अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने योग्य दिशा दाखविणारा आहे.