''आम्ही मागासलेले आहोत, गरीब आहोत ही ओरड आम्ही आता किती दिवस करीत राहणार? आपला महाराष्ट्र खेड्यापाड्यांतून पसरलेला आहे. जनता अजूनही पुष्कळ प्रमाणात अशिक्षित आहे हे सारे मान्य., पण एवढी साधने हाताशी असताना परिस्थितीच्या ह्या कोंडीतून आम्हाला बाहेर पडता येणारच नाही का? तशी इच्छा निर्माण होणे, निश्चय करून आपले दारिद्रय नष्ट करणे हे आज तरी महाराष्ट्रात नागरिकाला अशक्य नसावे. तसा निश्चय मात्र झाला पाहिजे.''

''सार्वत्रिक शिक्षण, काम करून स्वत:ची उन्नती करून घेण्याची इच्छा, कष्ट करण्याची तयारी आणि सामुदायिक कार्यात परस्पर सहकार्याने काम करीत राहण्याची तयारी या चार गुणांवर औद्योगिक महाराष्ट्राची उभारणी होणार आहे.''

''शहाणा उद्योगप्रिय नागरिकच महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती करू शकेल. पण ही प्रगती करताना भारतरूपी कुटुंबाचे जास्तीत जास्त कल्याण साधेल अशाच रीतीने आपण आपले सर्व व्यवहार आखले पाहिजेत.''

महाराष्ट्रातल्या सर्व भागात-खेडयापाडयातही छोटया-मोठया उद्योगधंद्याची वाढ होऊन गरिबी नष्ट करण्यासाठी जनता शहाणी व समजूतदार झाल्याशिवाय महाराष्ट्रात औद्योगिक प्रगतीचा पाया पक्का होणार नाही. महाराष्ट्रातील कारखानदारी पक्की करण्यासाठी शिक्षण आणि सतत कष्ट करण्याची आवड ही प्रथम आवश्यक आहेत. आपली प्रगती करण्याची तळमळ जनतेतच असावयाला पाहिजे. 'मी पुढे जाणार!' हा एकच निर्धार महाराष्ट्राने केला पाहिजे.

यशवंतरावांनी याप्रमाणे प्रसंगानुसार श्रमिकांच्या बाबतीत आपले प्रभावी विचार मांडले. त्या विचारांना अनुभूतीचे अधिष्ठान होते. सार्वकालिक ठरणारे विचार हेच मानवी जीवनाच्या प्रगतीचे अखंड पाथेय असते. यासाठी नवतरुणांनी यशवंतरावांच्या विचाराने अंतर्मुख होऊन आपली प्रगतीची वाट चोखाळण्यातच खरा पुरुषार्थ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.