यशवंतरावांचे श्रमसूक्त

श्रम म्हणजे सृजनाचे सर्वोत्तम सूक्त. श्रमाशिवाय सृजनांचा संभव नाही. सृजन म्हणजे आनंदाचा अक्षय ठेवा, सुखाचा स्त्रोत.
घाम हा जीवनाचा मूलमंत्र, संस्कृतीचे सर्व सौंदर्य विभ्रम श्रमा-घामातूनच साकारतात, हे सर्व स्वीकृत असे आदिम सत्य. जे नवे नि जे हवे ते ते श्रमाशिवाय गवसत नाही. श्रमशक्ती हीच श्रमाच्या कारंजातून उदित होतात.

प्रामाणिक प्रयत्‍न व परिश्रम हाच जीवनाचा कायदा! ही गोष्ट यशवंतरावांच्या सौंदर्यदृष्टीतून निसटणे शक्यच नव्हते. श्रमिकांविषयी म्हणूनच त्यांना फार मोठा जिव्हाळा व जवळीक वाटत होती. उद्योगधंदे, रोजगार, कारखानदारी, बेकारी यांविषयी त्यांनी वेळोवेळी मांडलेल्या विचारामध्ये राबणारा कष्टकरी वर्ग व त्यांच्या विविधांगी समस्यांबद्दल जी सक्रिय सहानुभूती दिसते ती हार्दिक आणि उत्स्फूर्त होती. घाम गाळणार्‍या हातावरील रेषामध्येच त्यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे सोनेरी स्वप्न पाहिले आणि विकासाच्या बिकट वाटावरची अवघड वळणेही पार केली. कामगारवर्गालाही त्यामुळे यशवंतराव आपले वाटत.

यशवंतरावांच्या रोमारोमात भिनलेले हे तत्त्वज्ञान त्यांच्या शब्दाशब्दातून तरलपणे अवतरले आहे. शेतकर्‍याचा मुलगा श्रमदेवीचे स्तवन न करता तरच नवल!

''एका बाजूला शहरांची खूप भरभराट व्हावी व दुसर्‍या बाजूला खेड्यापाड्यातील जनतेची उपासमार व्हावी असे घडून चालणार नाही. त्यामुळे सामाजिक विषमता नष्ट करण्याच्या भारतीय घटनेच्या तत्त्वावरच घाला पडेल. लोकशाही टिकवायची असेल व तिचा फायदा समाजाच्या सर्व थरांना मिळावयाचा असेल, तर संपत्तीची व उत्पादन करणार्‍या साधनांच्या मालकीची वाटणी समाजातल्या अधिकाधिक लोकांत झाली पाहिजे. मुंबईचा कामगार उद्या मोटार वापरू लागला व कोकणातील शेतकरी उपाशीच राहू लागला, तर त्याला मी सामाजिक प्रगती म्हणणार नाही. आपली प्रगती करून घ्यायची तळमळ खुद्द जनतेतच असायला हवी. आपली गरिबी आपण नाहीशी करावी, आपले जीवन समृद्ध व्हावे, आपल्या मुलाबाळांना जीवनात स्थैर्य मिळावे ही तळमळ प्रत्येक व्यक्तीस निर्माण झाल्याशिवाय तिची प्रगती होणार नाही.''

''जनतेत सतत उद्योगाची आवड निर्माण झाल्याशिवाय महाराष्ट्र पुढे जाणार नाही. शहाणा उद्योगप्रिय नागरिकच महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती करू शकेल, ही वृत्ती प्रत्येक नागरिकात तयार झाली पाहिजे. थोडे सरकारी अधिकारी, समाजकार्य करणारे मूठभर कार्यकर्ते एवढ्या मर्यादित लोकांऐवजी प्रत्येक नागरिकच गरिबी नष्ट करण्याच्या निश्चयाने श्रम करू लागला पाहिजे. शहाण्या माणसाचे कष्टच यापुढे संपत्ती निर्माण करू शकतील.''

''उद्योगधंदे चालविण्यासाठी लागणारी बुध्दी ही कोण्या एका जमातीचीच मक्तेदारी असू शकते अथवा एखाद्या जमातीत तिचा अभाव असतो असे समजण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रातील लोकांनी त्या त्या काळातील आवाहनास नेहमीच साथ दिली आहे, असे आपणास दिसून येते.

सोळाव्या आणि सतराव्या शतकामध्ये त्यांनी रणांगणावर पराक्रम गाजविले. आता उद्योगधंद्याची निकडीची गरज लक्षात घेता विज्ञान व तांत्रिक क्षेत्रातील कौशल्य हस्तगत करून उद्योगधंद्यासंबंधीची आपली जबाबदारी पार पाडण्यास महाराष्ट्रीय लोक तयार राहतील याबद्दल मला मुळीच शंका नाही. इतर अनेक क्षेत्राप्रमाणे उद्योगधंद्याच्या क्षेत्रातही कोणा एका विशिष्ट जमातीची मक्तेदारी असू शकत नाही.'' पुढे यशवंतराव म्हणतात, ''समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सार्‍यांनी एकत्र यावे, आपली जातभाषा विसरावी, आपले जुने भेद विसरावेत, भांडणे गाडून टाकावीत, आपली प्रगती रोखणारी सारी बंधने आपण झुगारून द्यावीत. त्या बंधनांनी आपले जखडलेले मन मोकळे करावे, त्यात कष्टाचे प्रेम निर्माण व्हावे अन् त्या प्रेमाच्या आधारावर त्याने आपले पाऊल झपझप उचलावे. त्याला गरिबीची घृणा, रिकामटेकडेपणाची लाज वाटावी, आळसांचे बुरखे पांघरून बसण्याचा मोह त्याला होऊ नये. त्याने एकच निर्धार करावा-मी पुढे जाणार! हा निश्चय ज्या माणसाच्या हृदयात पक्का होईल तोच महाराष्ट्राची प्रगती करू शकेल.''