* पदानाम कोश ( इंग्रजी-मराठी), प्रकाशक- भाषा संचालनालय मुंबई, प्रका. १९६२.

लोकशाहीत जनतेची भाषा हीच राजभाषा म्हणून सर्वमान्य ठरती तर आजचे सचिवालयीन कारभाराचे केंद्रीभूत स्वरुप नष्ट होऊन ग्रामीण स्तरावरील लोकामध्ये राज्यकारभाराविषयी, आत्मियतेची व विश्वासाची भावना निर्माण होऊ शकेल, ही जाणीव ठेवूनच शासनाने महाराष्ट्राच्या राज्यकारभारात शक्य तितक्या लौकर मराठीचा वापर करण्याचे आपले धोरण ठरविले. ते कृतीत उतरविण्याच्या दृष्टीनेच ‘ पदनाम कोश ’ तयार  करण्यात आलेला आहे. या कोशात दिलेले मराठी पर्याय वापरात आल्यानंतर मराठीच्या व्यवहाराला अनुकूल आणि पोषक असे वातावरण निर्माण  होण्यास निश्चित मदत होईल. हा आशावाद अजूनही खर्‍या अर्थाने मूर्त स्वरुपात येऊ शकलेला नाही. या दृष्टीने ही प्रस्तावना आजही चिंतनीय ठरते.

* भूमिका, लेखकः यशवंतराव चव्हाण, प्रका. १९७९.

राजकारणातल्या दगदगीच्या आणि धावपळीच्या जीवनात कुठेतरी निवांत बसून आपले विचार कागदावर उतरविण्यास आवश्यक ती उसंत मिळत नाही.तेव्हा प्रसिद्ध झालेले भाषणांचे वृत्तांत, इतर टिपणे व सहजपणे उपलब्ध झालेली भाषणांची टेप-मुद्रिते यांच्या मदतीने हे लेखन तयार केले आहे.

पुरोगामी आर्थिक धोरण, काँग्रेस अधिवेशनातील भाषणे, परराष्ट्रनीति व आंतरराष्ट्रीय आर्थिक पुनर्ररचना यांचा विचार करणारी, तसेच अर्थमंत्री व परराष्ट्रमंत्री त्या काळच्या समस्यांचे चित्रण या भाषणात दिसून येते.

* सारंग, लेखकः कुमार धनवडे, प्रका. १९८४.

सारंग नावाच्या बैलाची ही कहाणी, कादंबरीतील प्रेमाची कहाणी रंगेल व रंगेलपणाची आहे. उत्तम निवेदन कौशल्य, व्यक्तिचित्रे रंगविण्याचे सामर्थ्य व ग्रामीण  जीवनाचा पुरा अनुभव याची प्रचीती या कांदबरीत येते. ग्रामीण जीवनातील दारीद्रयाच्या पारर्श्वभूमीवर श्री. धनावडे यांनी कथा-कादंबरी लेखन केले तर ते अधिक  वास्तववादी व अर्थवादी राहील असे यशवंतरावांनी या कादंबरीचे स्वागत केलेले दिसते.

*प्राचीन भारतीय स्थल कोश, लेखकः म. महोपाध्याय डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्रका. १९६९.

प्राचीन भूगोलासारख्या सकृतदर्शनी रुक्ष आणि कालबाह्य वाटणार्‍या विषयामध्ये भारताचा सांस्कृतिक व प्रादेशिक एकात्मतेच्या दृष्टीने अखंड इतिहासातील महत्वाच्या घङामोङीचे स्थलज्ञान असल्याच्या भावनेतून प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती झाली आहे. ग्रंथातील माहिती आणि विचार परंपरा वाचकांना प्रेरक आणि उदबोधक ठरेल.

कोणत्याही ग्रंथाची प्रस्तावना ही लेखकाच्या सर्वांगीण जाणकारीची उत्स्फूर्त दाद आहे, असे म्हटले तर यशवंतरावांच्या या सार्‍या प्रस्तावनांनी ही मूलभूत अपेक्षा पुरी केली आहे असे म्हणावे लागेल. ग्रंथाचा विषय, लेखकाचा अभ्यास आणि शैली याबरोबरच ग्रंथातील विचारांच्या प्रस्तुतच्या कालखंडाशी संबंध जोडण्यात यशवंतरावांचे भाव-तरल पारदर्शी मन गुंतून जाताना दिसते. ‘ लोकसाहित्याचा अजूनही अनादर केला जातो, ’ असे डॉ. सरोजिनी बाबर यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत यशवंतराव म्हणतात, तेव्हा या पुस्तकाने ही अनादाराची भावना दूर व्हावी अशी नकळत अपेक्षाही व्यक्त करतात.

‘ संघर्ष ’
ला लिहिलेली प्रस्तावनाही अशीच लक्षणीय आहे. एखाद्या व्यक्तीचे जीवन एका शब्दात मांडणे अवघड आहे, हे त्यांनाही मान्य आहे., पण लेखिकेने ‘ संघर्ष ’ या एकाच शब्दात इंदिरा गांधींचे जीवन चितारले आहे, याबद्दलची रसिकदादही यशवंतराव निःसंकोचपणे देतात.