प्रस्तावनेतील यशवंतराव

समाजिक तत्वज्ञान व समाजाचे मौलिक अध्ययन-मनन केलेले जाणते नेतृत्व म्हणून यशवंतरावांचा उल्लेख प्रामुख्याने होत असला तरी कला, साहित्य, विज्ञान, संगीत, संस्कृती, सहकार, शेती, इत्यादी विविध विषयांच्या गूढगर्भगृहामध्येही त्यांनी समर्थपणे संचार केला होता, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. समाजकारण व राजकारण हे प्रांत सोडून त्यांनी आपली प्रज्ञा-प्रतिज्ञा केवळ साहित्य क्षेत्राला समर्पित केली असती, तर त्यायोगे मराठीतला एक सच्चा साहित्यिक लाभला असता, हे विद्वान मंडळींनी सुद्धा मान्य केले आहे. राजकारणाच्या धकाधकीतून थोडीबहुत फुरसत काढून यशवंतरावांनी जे लेखन केले आहे. ते त्यांच्या अस्सल अक्षरभक्तीची साक्ष म्हणता येईल.

यशवंतरावांना जीवनाची विविध अंगे, समस्या किंवा विषय एखाद्या लोलकाप्रमाणे फिरवून पाहण्याची उपजत अशी ओढ नि आवड होती. खरे तर ते साध्य कलावंताचे ब्रीद. त्यामुळेच राजकाणाच्या जीवघेण्या प्रवासात त्यांनी आपली व्यासंगी वृत्त्ती आणि चिकित्सक दृष्टी शेवटपर्यंत जोपासली. साहित्यसक्तीचा झराही सतत वाहात ठेवला. अनेक साहित्यिक आणि विद्वान त्यांचे मित्र होते. त्यांना ग्रंथाचा लोभ होता, शब्दांवर त्यांचे प्रेम होते. त्यांच्या अनेक मुलाखती, लेख, भाषणे, प्रासंगिक टिपणे त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या साहित्यकृतींचे वाचन, निवांतपणे व विचारपूर्वक मनन करुन कितीतरी विविध विषयावरील पुस्तकांना त्यांनी आटोपशीर, विस्तृत आणि विचारांचा वारसा घेणार्‍या अशा मौलिक प्रस्तावना लिहून दिलेल्या आहेत, अनेकदा चपखळ असा शब्दपयोग करीत की त्या प्रस्तावना वाचून प्रथितयश साहित्यिकालाही त्यांचा हेवा वाटावा. उत्त्तम शब्दरचनेला ते रसिकतेने दाद देत.

यशवंतराव चव्हाण यांनी आपल्यातील 'माणूस' जपला होता हेही राजकारणाचा भाग म्हणून नव्हे. राजकारण्यांना 'बहुतांची अंतरे' जपावी लागतात आणि म्हणून एरवी साहित्याशी गंध नसणार्‍या लोकप्रिय नेत्याला छोट्या-मोठ्या साहित्यिकांच्या ग्रंथांना आणि पुस्तिकांना पुरस्कार द्यावा लागतो, 'दोन शब्द' लिहावे लागतात. पण त्याचे स्वरुप 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' असे असत नाही.

यशवंतरावांच्या प्रस्तावना त्याला अपवाद ठरतात. कारण त्यामध्ये केवळ तोंडदेखलेपणा नाही. साहित्याची आवड हा त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाचा एक असाधारण अविभक्त घटक आहे. त्यांची अभिरुची ही बहुविध आणि सखोल आहे. ती राजकारणाच्या धबडग्यात एकारलेली नाही किंवा माणसांच्या गर्दीत हरवलेली अगर मलीन झालेली नाही.

यशवंतरावांची ज्ञानाच्या क्षेत्रातली जिज्ञासा किती सर्वागीण, चौफेर व चिकित्सक होती हे दिसून येते. पुस्तक पंडित नेहरुंसारख्या त्यांच्या श्रद्धेय आदर्शाविषयी असो., लता मंगेशकरासारख्या गानसम्राज्ञीविषयी असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्यासारख्या युगपुरुषावर असो अगर स्वा. सावरकरांसारख्या विरोधी विचारसरणीच्या राष्ट्रनेत्याविषयी असो, त्या पुस्तकाला पुरस्कार देताना यशवंतराव निरपेक्ष व नि:पक्षपाती दृष्टिकोन स्वीकारीत असत.

राजकारणापासून कीडाक्षेत्रापर्यंत आणि साहित्यापासून युद्धशास्त्रापर्यत विविध ज्ञानशाखातील लिहिल्या गेलेल्या पुस्तकांना सारख्याच आत्मीयतेने त्यांनी प्रस्तावना दिलेल्या आहेत. यशवंतराव हे काही वि.स. खांडेकर, नरहर कुरुंदकर, पु.ल.देशपांडे व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारखे प्रसिद्ध व्यावसायिक प्रस्तावनाकार नव्हते. त्यामुळे त्यांचा पुरस्कार मागणार्‍या ग्रंथकाराचा हेतू नेहमीच निरपेक्ष होता असे म्हणता येत नाही. साहित्याचा यशवंतरावांचा गाढा व्यासंग यापैकी सर्वानाच माहिती असेल असेही नाही. तरीही सार्वजनिक क्षेत्रातील एका भारतीय पातळीवरच्या थोर नेत्याचे दोन शब्द पाठराखणी म्हणून आपल्या पुस्तकाला मिहावेत असे त्यांना वाटले. यामागे त्यांचा व्यावहारिक हेतू असेल, प्रत्यक्षात मात्र या छोट्या-मोठ्या प्रस्तावना वाचताना एक रसिक, मर्मज्ञ व जीवनातील विविध अंगांचा विनम्र उपासक अशी त्यांची प्रतिमा या प्रस्तावनांच्या ओळी-ओळीतून साकार होते.

त्यांनी लिहून दिलेल्या प्रस्तावनांपैकी काही निवडक प्रस्तावना सारांशरुपाने देत आहे. त्यांतून यशवंतरावांच्या भावस्पर्शी आणि मार्मिक विधायक समीक्षादृष्टीने रसडोळस दर्शन सुजाण रसिकांना भावेल, अशी अपेक्षा आहे.