* पुस्तकाचे नाव कर्मवीर भाऊराव पाटील लेखक मा. भि. काटकर प्रकाशन वर्ष १९८२

खर्‍या अर्थाने म. ज्योतिराव फुले यांचा वारसा विसाव्या शतकात चालविणार्‍या ज्या चार-दोन थोर व्यक्तींनी निष्ठापूर्वक प्रयत्‍न केला त्यांच्यापैकी कर्मवीर भाऊराव हे एक आहेत. हा काही सामान्य वारसा नाही. हा कांतिकारक वारसा आहे. आणि हा वारसा घेऊन भाऊरावांनी सामाजिक विषमतेविरुद्ध व अज्ञानाविरुद्ध जो घनघोर लढा दिला त्याचा प्रत्यय या पुस्तकाच्या पानापानांत दिसून येतो कर्मवीरांचे हे चरित्र वाचून एका सामान्य थरातील एक सामान्य बुद्धिमत्त्तेचा पण भावनाशील, संस्कारक्षम व तडफदार असा तरुण एका सामाजिक कांतीचा सेनापती बनतो, ही एक गोष्ट सर्वांना उमगली तरच त्याला काही अर्थ आहे. असे विचार या चरित्रग्रंथाच्या प्रस्तावनेत मांडले आहेत.

* स्वर (काव्यसंग्रह) लेखक ह.न. जोशी (कवी सुधांशु) प्रका. १९७०. कल्पनाशक्ती शाप आहे आणि वरही आहे. अशा तरल कल्पनाशक्ती असल्याशिवाय सरस-साहित्य निर्मिती होणे कठीणच., परंतु हा शाप जीवनातल्या अनंत वेदना शब्दरूप देऊन निर्भेळ आनंदायी निर्मिती करणारा असा हा शाप एखाद्या भाग्यवंतालाच पूर्वपुण्याईने लाभतो. कवी 'सुधांशु' कल्पनाशक्तीचे हे असेच वरदान घेऊन वाचकापुढे या 'स्वर' रुपात आले आहेत.

* भारतीय मल्लविद्या :उदय आणि विकास लेखक कृ. गो. सूर्यवंशी. प्रकाशन १९६५

जीवनात भरती आणि ओहोटी ही सर्वत्रच असते. मल्लविद्येच्या बाबतीतही हा निसर्गनियम चुकला नाही. मध्यंतरीचा हा काळ या विद्येला आपला मार्ग अडीअडचणींना तोंड देऊन आक्रमण करावा लागला. इंग्रजी अमदानी येण्यापूर्वीच काही शतकापासून आपल्या सर्व विद्यांना खुरटून टाकणारे एक अंध:कार युग भारतात वावरत होते. इंग्रजी राजवटीनेही आमच्या विद्यांच्या प्रगतीसाठी काहीच प्रयत्‍न केले नाहीत. त्याच काळात जगातील इतर देशांत विज्ञान युगाची वाढ होउफ्न अनेक क्षेत्रात ते देश प्रगती करत होते. आम्ही व परंपरेने चालत आलेल्या आमच्या विद्या मात्र खुरटल्या अवस्थेत आपले जीवन जगत होत्या. या सर्व परिस्थितीचा परिणाम जीवनाच्या इतर क्षेत्रात जसा झाला तसा तो मल्लविद्येवरही झाला. परंपरेने चालत आलेली मल्लविद्या काही शौकीन लोकांच्या व राजेराजवाड्यांच्या पाठिंब्यावर, मदतीवर कशीतरी टिकून राहिली होती. स्वातंत्र्यकाळानंतर या क्षेत्रात नव्या दृष्टीचा उदय झाला. या विद्येची वाढ करण्याच्या प्रयत्‍नास सुरुवात झाली.

* अठराशे सत्त्तावन्नचा महाराष्ट्र लेखक पुरुषोत्त्तम पांडुरंग गोखले. प्रका. १९५७

१८५७ च्या क्रांतियुद्धासंबंधीचे जे अनेक गैरसमज प्रचलित आहेत, त्यापैकी एक असा की, या क्रांतियुद्धाचा वणवा फक्त उत्त्तर हिंदुस्थानापुरताच मर्यादित होता. दक्षिणेकडच्या श्री. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, रंगो बापूजी वगैरे क्रांतियुद्धातील नेत्यांचे कार्यक्षेत्र उत्त्तर हिंदुस्थानापुरतेच मर्यादित होते., परंतु गोखले यांनी या गैरसमजुतीचे साधार निराकरण करुन दक्षिणेत आणि बृहन्महाराष्ट्रातही त्यावेळी कसा उठाव झाला होता आणि तो अखिल भारतीय क्रांतियुद्धाचाच भाग कसा होता, हे ऐतिहासिक कागदपत्रावरुन, संशोधक बुद्धिने गॅझिटिअरसारख्या सरकारी प्रकाशनांचे, भारतीय व परदेशी पंडितांच्या ग्रंथांचे परिशीलन करुन संशोधनाने मिळालेली माहिती मराठी भाषते जनतेपुढे मांडून महाराष्ट्राच्या क्रांतियुद्धाच्या इतिहासावर पुष्कळच प्रकाश टाकल आहे.

* युगकर्ता (लोकमान्य टिळक चरित्र) लेखिका सविता भावे, प्रका. १९८४.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी व विसाव्या शतकाच्या प्रारंभी ज्या धैर्याने आणि सम्यकवृत्त्तीने बंदीवास स्वीकारण्याचे धैर्य टिळकांनी दाखविले ते विशेष आहे. मी जेव्हा लो. टिळकांच्या जीवनाचा विचार करतो तेव्हा त्यांच्या निर्धाराचे मला अधिक महत्व वाटते. असे निर्धारी पुरुष इतिहासात क्वचितच तयार होतात. स्वातंत्र्य हवे, पण त्या स्वातंत्र्याचे सामाजिक स्वरुप कसे असावे याची त्यांची कल्पना अधिक व्यापक असती तर हिंदुस्थानातील व महाराष्ट्रातील आजची परिस्थिती कदाचित वेगळी झाली असती. असा विचार प्रस्तावनेत मांडलेला आहे.