यशवंतरावांचे सांस्कृतिक भावबळ
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयीही असे म्हटले जाते की, जरी ते पंतप्रधान झाले नसते तरी ते साहित्यिक झाले असते. यशवंतरावांच्या बाबतही काही अंशी असेच म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. राजकारणात न पडता त्यांनी साहित्य - साधना केली असती तरी ते मराठी सारस्वतात अग्रणीच राहिले असते, किंवा बालपणीच्या कला, प्रेरणा व जाणिवा त्यांनी कलामंचावरील प्रत्यक्ष सहभागाने जाग्या ठेवल्या असत्या., तर जगाच्या रंगभूमीवर ठसा उमटविणारा हा महापुरुष महाराष्ट्राला एक कलावंत म्हणूनही लाभला असता.
नाटकाचे आकर्षण लहानपणापासूनच यशवंतरावांना असल्याचे दिसते. कर्हाडला नाटकाचे उत्साही वातावरण होते. गणेशोत्सवातील पौराणिक - ऐतिहासिक नाटके सतत तीन-चार वर्षे पाहिल्यामुळे नाटकातील बरेवाईट त्यांना हळूहळू समजायला लागले. एखाद्या दुसर्या प्रयोगात त्यांनी चेहर्याला रंग फासून कामही केले. लांब कोल्हापूरला जाऊन प्रेमसंन्यास पाहण्याइतपत नाटकाची गोडी त्यांना बालपणीच लागली होती. याबाबत यशवंतराव 'कृष्णाकाठ' या आपल्या चरित्रग्रंथात म्हणतात, ''मी नाटक कंपनीची नाटके हौसेने पाहात असे. आनंद विलास नाटक मंडळी ही कर्हाडला वर्ष-दीड वर्षाने भेट देत असे. मास्टर दीनानाथ मंगेशकर, रघुवीर सावकार या प्रसिद्ध नटांच्या कंपन्यांची नाटकेही कर्हाडला होत. पिटातल्या स्वस्त तिकिटांच्या जागेत बसून मी ती सगळी नाटके मनमुराद पाहिली. शाळेतील संमेलनातील 'माईसाहेब' या नाटकात किर्लोस्करवाडीला एका प्रयोगात काम केल्याचे आठवते.'' ते पुढे म्हणतात ''मनमुराद संगीत ऐकण्याच्या ओढीने मी भजनी मंडळात जात असे. संगीत भजनासाठी रात्री जागलो, हिंडलो, टाळ वाजविले, भजन म्हटले, नाचलो. शिवजन्मोत्सवासाठी म्हणून सातारा, कोल्हापूर, सांगली येथील भजनाचे फड कर्हाडात भरविले.'' अशा प्रकारे यशवंतरावांना बालपणापासूनच सात्त्विक आणि प्रासादिक ओढ निर्माण झाली व नंतरच्या धकधकीच्या काळात जरी त्यांना स्वत:ला संगीताची उपासना करता आली नाही, तरी संगीताशी जडलेले नाते मात्र जीवनाच्या अखेरीपर्यंत त्यांना विरंगुळा होते.
नाटकांची गोडी त्यांना बालपणीच लागली असल्यामुळे पुढे नाटयाचार्य खाडिलकरांच्या नाटकांच्या निमित्ताने लिहिताना त्यांच्या नाटयकृतीचे मार्मिक रसग्रहण करून जुन्या व नव्या नाटकांतील तफावत ते अचूक दाखवू शकले. खाडिलकरांनी 'स्वयंवर', 'भाऊबंदकी' किंवा 'सवाई माधवरावांचा मृत्यू' असे विषय नाटकासाठी निवडण्याची कारणमीमांसा यशवंतराव करतात. त्यांच्या मते 'महाभारताप्रमाणेच मराठयांच्या इतिहासातही सर्व व्यक्तिरेखांना युध्दाची पार्श्वभूमी आहे. त्यातील शृंगार हा वीरांचा शृंगार आहे. कारुण्यही युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घटनांचे आहे. युध्दामुळेच मानवी जीवनात निर्माण झालेल्या तणावांचे चित्रण करण्याचे युयुत्स व प्रतिभाशाली नाटककाराला वाटलेले आकर्षणच अशा नाटय विषयांची निवड करण्यामागे असू शकते?' हे यशवंतरावांचे स्पष्टीकरण मर्मग्राही नाही असे कोण म्हणेल?
जुन्या आणि नव्या नाटकातील समाजजीवनाचे चित्रण त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. जुन्या नाटकांची मांडणी स्थूल आणि ढोबळ असायची, पण नवीन नाटकाची सामाजिक जीवनाची जाणीव अधिक खोल असल्याने त्यामध्ये क्लिष्टता आणि नाटय विषयाची गुंतागुंत वाढत असल्याने ही आधुनिक नाटके समाजवास्तवांचा सूक्ष्म वेध घेऊ पाहात आहेत, याचे त्यांना जरूर कौतुक होते. पण नाटय एक कलानंद देणारी कृती आहे, त्यात प्रेक्षकांना व श्रोत्यांना आनंदाचे डोही डुलता आले पाहिजे. जर समस्या शोधनाच्या कर्कश गदारोळात नाटयगीतातील गायनरस नष्ट होणार असेल तर वेळीच नाटककारांनी, नटांनी जागे होण्याची गरज आहे. असे त्यांनी प्रतिपादले. उस्फूर्त नाटयाविष्काराबरोबरच नाटय शिक्षण संस्था असलीच पाहिजे हे त्यांचे प्रतिपादन आजही संयुक्तिक आहे असे आपणास दिसून येईल. आणि म्हणूनच नाटय शिक्षण संस्था महाराष्ट्रात ज्या पूर्वी काम करीत होत्या त्या पुन्हा सुरू झाल्या पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणतात ''साहित्यिकांचा व नटांचा सहवास घडल्यानंतर नटांची नाटकाविषयीची समज वाढते, त्यामुळे अभिनयाचा दर्जा वाढतो. मराठी साहित्यिकांनी व नव्या नाटककारांनी ही परंपरा पुन्हा चालू करण्यासारखी आहे.'' या दृष्टीने जर एखादी नाटय शिक्षण संस्था महाराष्ट्रात उभी राहिली तर यशवंतरावांच्या स्मृतीस ते अभिवादनच ठरेल.