''तुम्हा दोघांच्या भांडणामुळे संगीताचं आणि मराठी साहित्याचं नुकसान होतंय. मतभेद असेल तर मी मध्यस्थी करतो, असे यशवंतराव म्हणाले, पुढे काही वर्षानंतर फडके - माडगूळकर पुन्हा बर्‍या संबंधात आले, त्याचा त्यांना आनंद झाला.

कलावंताला यशवंतराव किती मान देत असत याविषयी पं. भीमसेन जोशी व श्री. सुधीर फडके यांनी सांगितलेल्या आणखी दोन हृद्य आठवणी आहेत. ''कलकत्ता विमानतळ. सकाळची दहाची वेळ. संरक्षणमंत्री उपस्थित असल्याने कडक बंदोबस्त. यशवंतरावांनी मला दुरून पाहून ते स्वत:च कंपाउंडपर्यंत आले. त्यांच्याबरोबर मी अलगद विमानतळावर गेलो. माझी सर्वांशी ओळख करून दिली. आस्थेने चौकशी केली. माझ्या गाण्याच्या बैठकींना यशवंतरावांची आणि वेणूताई यांची अनेकदा उपस्थिती असायची. मुंबईत किंवा दिल्लीत 'संतवाणी' चा कार्यक्रम असेल आणि यशवंतराव कुठे अन्यत्र दौर्‍यावर असले, कामात व्यग्र असले तरी सौ. वेणूताईंची उपस्थिती निश्चित असायची. स्वत: येणार असले आणि अन्य कारणामुळे त्यांना वेळेवर येता आले नाही तर संयोजकाकडे भीमसेनच गाणं मी पोहोचल्याशिवाय सुरू करू नका असे निरोप यायचे. अशीच एक मनाला चटका लावणारी आठवण श्री. सुधीर फडके यांची, ''सौ. वेणूताईंना माझी गाणी खूप आवडायची. वेणूताई गेल्यानंतर यशवंतरावांच्या एकाकी जीवनात साहित्य संगीत यांनी बराच विरंगुळा दिला. वेणूताईंच्या पहिल्या वर्ष-श्राद्धाला (१ जून १९८४ या दिवशी) त्यांनी पं. भीमसेन जोशी यांचे गायन ठेवले व त्याच वेळी त्यांनी निकटवर्तीयांजवळ सांगितलं की 'पुढच्या वर्षश्राद्धाला सुधीर फडक्यांना बोलावून त्यांच्या गीत रामायणाचा कार्यक्रम करायचा.' वेणूताईंचे दुसरे श्राद्ध व्हायच्या आतच यशवंतराव गेले. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' या सत्याची विदारक प्रचीती अशी मला आली. पण हे सत्य सांगणारे गीत रामायण मी कर्‍हाडला १ जून १९८५ ला गायलो., परंतु त्यावेळी माझ्या कार्यक्रमाला नेहमी दाद देणारे सौ. वेणूताई व यशवंतराव चव्हाण या दोघांचीही आसने रिकामी होती.

नाटय व सिनेसृष्टीतील कलाकारांच्या स्मृतीही बर्‍याच बोलक्या वाटतात. 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकाच्या शतकमहोत्सवी प्रयोगाला मा. यशवंतरावजी चव्हाण उपस्थित होते. नाटक संपल्यावर रंगपटात जाऊन त्यांनी संभाजीची भूमिका करणारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांना 'वा! शंभूराजे' म्हणत मिठीत घेतले. डॉ. घाणेकर याबाबत लिहितात की, 'शब्दाची गरज भासू नये इतकी ती कृती बोलकी होती.'

यशवंतराव आपुलकीची सलगी कशी देतात याचे एक उदाहरण बाळ कोल्हटकरांचे पहिले नाटक यशवंतरावांनी पाहिले तेव्हा ते रंगपटात लेखकाला शाबासकी द्यायला गेले. बाळ कोल्हटकरांचे त्यांनी कौतुक केले. मग विचारले, ''तुम्ही कोणत्या गावचे!'' ''मी सातार्‍याचा'' बाळ कोल्हटकर उत्तरले. त्यावर यशवंतराव चटकन उदगारले. ''तू सातार्‍याचा? मग ल्येका हिकडं ये की असा गुमान!'' यशवंतरावांनी बाळ कोल्हटकरला 'हिकडं' ओढलं आणि पाठीत पहेलवानी थाप मारली! सातार्‍याच्या वाटेवर सांडलेली बुगडी एकवेळ बाळ कोल्हटकर विसरले असतील, पण ती पाठीवरची थाप कधी विसरणार नाहीत!.