'संरक्षणसिद्धतेची संहिता' या मुलाखतीत ''देशाच्या संरक्षणासाठी सैनिकी सिद्धतेला जेवढे महत्त्व आहे तितकेच सामाजिक मनोधारणेला आहे. ही मनोधारणा विशुद्ध व समर्थ असली पाहिजे हा धोक्याचा इशारा आजच्या गोंधळाच्या परिस्थितीत तर अत्यंत मननीय असाच वाटतो.

'औद्योगिक महाराष्ट्राचे स्वप्न' महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून पाहताना ते म्हणतात, ''शिक्षणाशिवाय औद्योगिक प्रगती नाही. त्याचप्रमाणे सतत काम करण्याची आवड निर्माण झाली पाहिजे, समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्राने एकच निर्धार करावा 'मी पुढे जाणार!'

'तुमच्या प्रश्नाबद्दल मला असं वाटतं' या मुलाखतीत ''नव्या पिढीला प्रेरणा देण्याचं कार्य लेखक, कलावंत, प्राध्यापक, विचारवंत यांनीच करायला हवं. त्यांचाच प्रभाव विद्यार्थ्यांवर अधिक पडू शकेल. जातीयवादी प्रवृत्ती नष्ट करण्याच्या बाबतीत अधीर अगर उतावीळ होण्यानं हा प्रश्न सुटणार नाही' असं ते कळकळीने म्हणाले होते. या क्षेत्रातले आजचे अपयश पाहिले तर महाराष्ट्रातल्या प्राध्यापक, कलावंत, साहित्यिक आणि विचारवंत या सर्वांनाच अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे असे वाटते.

आज काँग्रेस पक्षाने एक राष्ट्रीय धोरण म्हणून मुक्त व खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. पण आजच्या संदर्भातही 'समाजवादासाठी काँग्रेस पाहिजे' या मुलाखतीतील 'सत्ता आणि संपत्ती यांचे केंद्रीकरण शासनाने करून टाकले पाहिजे....सहकार क्षेत्रात जेथे सुबत्ता आहे त्यांनी इतरत्र विकासाचे लोण पोहोचविण्यासाठी दक्ष राहिले पाहिजे' हे त्यांचे विचार महत्त्वाचे वाटतात.

१९८१ नंतर त्यांचे 'स्वगृही परत जाणे' हा एक वादग्रस्त विषय ठरला आहे. या संदर्भात यशवंतरावांची भूमिका समजावून घेताना गांधी-नेहरू यांच्या काँग्रेसशी त्यांचे जडलेले अव्यक्त नाते समजून घ्यावे लागेल. काँग्रेस पक्षाचे दुसरे विघटन झाल्यावर काही काळ श्रीमती इंदिरा गांधींच्या विरोधात जाऊन लोकशाहीवादी इतरांनी काहीशी कठोर अशी जी भूमिका घेतली त्यामागेही हीच पार्श्वभूमी असावी. यशवंतराव तर आता आपल्यात नाहीत., परंतु त्यांच्या या अक्षरबद्ध मुलाखती आजच्या परिस्थितीत दीपस्तंभासारख्या मार्गदर्शक ठरण्यासारख्या आहेत.

या वेगवेगळ्या मुलाखती वेगवेगळया संदर्भात दिल्या असल्यामुळे त्या प्रत्येक वेळची यशवंतरावांची मुलाखत देत असतानाची मन:स्थिती वेगळी असणार हे स्वाभाविक आहे. विषयाच्या भिन्नतेनुसार आपले विचार मांडण्याची शैली व ढबही निराळी असणार हेही स्पष्ट झाले. कोठे कोठे स्वर उंच व चढा लागलेलाही दिसतो., पण या सर्व जवळजवळ ३०-३५ मुलाखतींचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोठेही मुद्दा टाळण्याचा प्रयत्‍न त्यांनी केलेला नाही किंवा त्याला बगल दिलेली नाही. प्रतिपादनात जशी वैचारिक स्पष्टता आहे तशी सुसूत्रताही आहे. या व्यक्तिमत्त्वाचीच छाया त्यांच्या कोणत्याही मुलाखतीवर ठायीठायी उमटलेली दिसते.

या मुलाखती वेगवेगळया प्रसंगी वेगवेगळया कारणाने वेगवेगळया क्षेत्रातील, भिन्नभिन्न प्रवृत्तीच्या जाणकार लोकांनी घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे पाहण्याचा यशवंतरावांचा दृष्टिकोन जसा स्पष्ट होता तसाच या जाणकारांचा यशवंतरावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता होता हेही या मुलाखतींच्या वाचनाने वाचकांना कळून येईल. हा ऐतिहासिक संदर्भ अबाधित राहावा म्हणून मुलाखतीतील काही संदर्भ आता अप्रस्तुत किंवा कालबाह्य वाटले तरी त्या त्या वेळची परिस्थिती व संबंधित प्रश्नांकडे विशिष्ट परिस्थितीत पाहण्याचा त्यांचा विशिष्ट दृष्टिकोन कळावा हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.