जातीयतेच्या संदर्भात यशवंतराव म्हणतात ''निवडणुकीच्या काळात विविध स्वरूपातल्या जातीयवादाचा आश्रय घेतला जातोच., पण याबाबतीत कुठल्याच पक्षाचा अपवाद सांगता येत नाही.'' शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी मराठी शिक्षण तज्ज्ञांशी तेव्हा(१९६०) यशवंतरावांनी चर्चा केली तेव्हा त्यांचे जे मत झाले ते आजच्या परिस्थितीतही लक्षात घेण्यासारखे आहे.

''आपले ठराविक वैचारिक वर्तुळ वा चाकोरी सोडून बाहेरच्या नव्या कल्पनांचा विचार करणे त्यांना फारसे मानवत नाही.'' हे त्यांनी निर्भीडपणे नोंदलेले मत आजही चिंतनीय ठरते. कारण अनेक शिक्षणविषयक आयोग आणि अहवाल निर्माण होऊनही तीस वर्षांत महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीत काहीच मूलगामी बदल झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामधील परस्पर संबंधात ''महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर कम्युनिस्टासह सर्व पक्षांशी विचारविनिमय करून सहकार्य मिळविण्याचा माझा सतत प्रयत्‍न राहील. खरे म्हणजे तसा अनौपचारिक विचारविनिमय मी नेहमी करत आलो आहे'' असे यशवंतराव म्हणतात. त्याकाळच्या काही नाजूक प्रश्नांबाबतही आपली स्पष्ट मते यशवंतरावांनी नोंदलेली आहेत. उदा. 'विद्यापीठासारख्या स्वायत्त संस्थांच्या कारभारात सरकारने हस्तक्षेप करू नये हे आपणास तत्त्वत: मान्य आहे. सरकारने सांस्कृतिक कार्याला मदतगार व्हावे, त्याचे नियंत्रण करू नये असेच मी म्हणेन. भाषाविषयक धोरणासंबंधी मत व्यक्त करताना व मराठी माध्यमाचा पुरस्कार करताना डॉ. रघुवीर यांच्या कोशाच्या साहाय्याने लिहिल्या जाणार्‍या कृत्रिम भाषेबद्दल त्यांनी व्यक्त केलेले मत आणि एल्फिंस्टन साहेबाने शिक्षण कारभार इत्यादी बाबतीत मराठीचा वापर सुरू करताना एक भाषाविषयक धोरण स्वीकारले होते. त्याचा आपण आजही विचार केला पाहिजे (१९६०) असे यशवंतराव म्हणतात.

हा लढा एकाधिकारशाहीविरुद्ध आहे' मुलाखतकार - मो. ग. तपस्वी. ना. यशवंतरावांची ही मुलाखत अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे. सातारा मतदारसंघात प्रचारदौर्‍यावर असताना २२ ते २६ डिसेंबर १९७९ या काळात ही मुलाखत त्यांनी दिली आहे.

स्व. इंदिरा गांधींच्या पक्ष चालविण्याच्या पद्धतीविषयी त्यांचा रोष येथे सहजतेने प्रकट झाला आहे. काँग्रेस पक्षामध्ये यापूर्वीही अनेक मतभेद झाले., परंतु कोणीही व्यक्तिगत नावाने पक्ष काढला नाही. 'इंदिरा काँग्रेस' हे नावच व्यक्तिस्तोमावर आधारले आहे असे त्या पक्षाची प्रवृत्ती दाखविते. याच मुलाखतीच्या शेवटी यशवंतराव म्हणतात, 'श्रीमती इंदिरा गांधी हुकूमशाहीच्या प्रतीक आहेत, तेव्हा सर्व मतदारांनी लोकशाही शक्तीच्या बाजूने मतदान करून, या देशातील लोकशाहीचे रक्षण करावे असे कळकळीचे आवाहन मी त्यांना करू इच्छितो.' पुढे काळाची पावले अशी पडली की, मतदारांनी दिलेला कौल मान्य करून त्याच इंदिरा काँग्रेसमध्ये तो पक्ष 'राष्ट्रीय - प्रवाह' असल्याचे मान्य करून यशवंतरावांना प्रवेश करावा लागला. पुढे जरी आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली तरी ही जखम ते अखेरपर्यंत विसरू शकले नाहीत.

आज जवळजवळ एक तपानंतर या संपूर्ण घटनेकडे पाहिल्यानंतर असे दिसून येते की, काँग्रेस पक्ष हीच त्यांची मुख्य जीवननिष्ठा होती. त्यामुळे उपेक्षेचे वारे अंगावर घेत, लोकशाही आणि काँग्रेस पक्ष यांच्या संरक्षणासाठीच आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात पुन:प्रवेशाचा हा कटू निर्णय त्यांनी घेतलेला दिसतो.

* आजच्या जगाची वाटचाल (गतिमानचे खोचक प्रश्न - परराष्ट्रमंत्र्याची वेचक उत्तरे) पुणे : 'गतिमान' दिवाळी अंक - १९७५ मधील मुलाखत

या मुलाखतीत चीन व रशिया यांच्यामधील तेढीचा भारतावर अनिष्ट परिणाम होईल काय, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तो प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता. त्याला उत्तर देताना यशवंतरावांनी म्हटले की, 'हेलसिंकी करार हा कोणा राष्ट्राविरुद्ध केलेला करार नव्हे. त्यामुळे त्यातून जे समजूतीचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे ते चीन व रशिया या दोन्ही राष्ट्रांना मान्य होईल. याच मुलाखतीत अमेरिका ही Solationed  राहील की काय,’ ही भीती यशवंतरावांनी दूर केलेली आहे. भारत व अरब राष्ट्रे आणि आफ्रिकन राष्ट्रे यांच्याबद्दल भारताची भूमिका नेहमीच सहकार्याची राहील हे सकारण यशवंतरावांनी प्रकट केले आहे.