यशवंत विचार
शेतीच्या प्रश्नांशी लढावयाचे म्हणजे शंभर तोंडे असलेल्या रावणाशी आपणाला लढावे लागणार आहे. आपल्या शेतीचे प्रश्न अनेकविध आहेत. लहान मुदतीच्या कर्जाचा प्रश्न आहे, दीर्घ मुदतीच्या कर्जाचा प्रश्न आहे, बागायतीचा प्रश्न आहे, बियाणांचा प्रश्न आहे, खतांचा प्रश्न आहे, तुकडेबंदीचा प्रश्न आहे, असे अनेकविध शेतीचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्नही नेहमी बदलत राहणार आहेत. दुदैवाने शेतीचा विकास अनेक शतके थांबला होता. दहा-पाच वर्षे तो थांबला असता तर ती मोठी काळजी करण्यासारखी गोष्ट ठरली नसती; परंतु शेकडो वर्षे खितपत पडलेला असा हा प्रश्न असल्यामुळे त्यावर पुष्कळच विचार झाला पाहिजे.