यशवंत विचार
मला अभिप्रेत असलेला ‘समाजवाद’ हा केवळ एक आर्थिक सिध्दान्त नाही. तो मूल्यावरही आधारलेला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा आपल्या विचाराची व आचाराची आधारशिळा असली पाहिजे. पिढयानपिढया हरिजन आणि गिरिजन यांची अवहेलना होत आहे, त्यांच्यावर अन्याय होत आहेत, सामाजिक दृष्टया नि आर्थिक दृष्टया त्यांचे शोषण चालू आहे. राष्ट्रीय जीवनाच्या मंजधारेपासून त्यांना अलग करण्यात आले आहे. आपल्या राष्ट्रीय जीवनातील हे वैगुण्य आपण किती लवकर नाहीसे करणार आहोत यावरच आपल्याला समाजवादाचा कोणता आशय अभिप्रेत आहे हे ठरणार आहे. जोपर्यंत हे वैगुण्य दूर होत नाही तोपर्यंत सामाजिक उद्दिष्टांची चर्चा करणे निरर्थक आहे. ते काम सोपे नाही. समाजाचे महावस्त्र नव्याने विणावयाचे आहे. त्यासाठी गरज आहे ती समर्पणशीलतेची आणि ध्येयवादी आवेशाची.