आजही साडेतीन कोटी एकर जमीन महाराष्ट्रात अशी आहे की, जी गळक्या भांडयासारखी आहे. मथुरेची गवळण पाणी भरून डोक्यावर हंडा घेऊन निघाली; आणि घरी येऊन पाहते तो आपल्या डोक्यावरच्या हंडयामध्ये पाणी नाही. तसेच आपल्या शेतीचे झाले आहे. दरवर्षी मृग नक्षत्रापासून हस्त नक्षत्रापर्यंत भरलेल्या नक्षत्रांच्या बाजारामध्ये आपल्या डोक्यावर भांडे घेऊन जाते बिचारी आमची शेती; पण त्यात शेवटी काही शिल्लक राहत नाही. आमच्या महाराष्ट्राच्या शेतीचा हा मथुरेचा बाजार झालेला आहे.
पंढरीच्या विठ्ठलाच्या या परिसरात, त्याच्या या पंचक्रोशीत आज मोठया आनंदाने आलो आहे. येताना मी मनात विठ्ठलाला म्हणालो, चंद्रभागा तुझ्या अंगणात पोहोचण्यापूर्वीच आज आम्ही तिला अडवली आहे, तिला आम्ही आज साकडे घातले आहे. तुझ्या चरणांजवळ ही चंद्रभागा अठ्ठावीस युगे वाहात आली. या चंद्रभागेला उजनीजवळ आज आम्ही थांबवितो आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी दरसाल आषाढी-कार्तिकी एकादशीला खांद्यावर पडशी टाकून ‘ग्यानबा तुकाराम’ म्हणत म्हणत तुझ्या दाराशी येत असतो.
जनाबाईच्या मदतीला तू धावून गेलास; आणि तुझी मनापासून भक्ती करणा-या तुझ्या सगळया भक्तांच्या मदतीलाही तू धावून गेलास. तशीच तुझी भक्ती करणा-या आणि महाराष्ट्राच्या झोपडीत राहणा-या गरीब शेतक-याने आज तुझी चंद्रभागा अडविली आहे. त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मदतीसाठी विठ्ठला, तू त्यांच्या शेतीत जा. तू आता पंढपूरच्या मंदिरात राहू नकोस! विठ्ठलाला मी ही मनोभावे प्रार्थना केली आहे. तुकारामाची, ज्ञानेश्वराची, एकनाथाची आठवण करून मी ही प्रार्थना केली आहे.
कुठलाही महाकवी किंवा कुठलाही कवी निव्वळ शब्दांचा जुळारी होऊन कवी होऊ शकत नाही. नादमाधुर्य म्हणजेच काव्य असे आपणाला म्हणता येणार नाही. आपल्या मराठी वाड्.मयामध्ये असा एक काळ होता की, ज्या वेळी शब्दलालित्य म्हणजेच साहित्य असे समजून अशा साहित्यामागे लोक धाव घेत; परंतु निव्वळ नादमाधुर्यातूनच निर्माण होणा-या काव्यात जनतेचे मन काबीज करण्याचे सामर्थ्य निर्माण होऊ शकत नाही. त्या जुळणा-या सुंदर नादमधुर शब्दांच्या पाठीमागे एक नवा सामर्थ्यवान संदेश देणारे मन आणि विचार असल्याशिवाय कवी किंवा महाकवी निर्माण होऊ शकत नाही.
कधी साहित्यिक राजकारण्यांना मार्गदर्शन करतात, तर कधी राजकारणी साहित्यिकांना मार्गदर्शन करतात, असे हे सर्वत्र चालत आलेले आहे. तेव्हा माझ्या दृष्टीने मला जो महत्त्वाचा विचार आपल्याला सांगावयाचा आहे तो हा की, एक अनुभूती आणि एक विचार राबविण्याचे हे जे काम आहे ते अविभाज्य आहे. जीवनाच्या निनिराळया क्षेत्रांशी अधिक निकटचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय आणि जीवनामध्ये असलेले श्लेष आणि काव्य यांच्याशी अधिक जवळीक केल्याशिवाय साहित्यात फारशी मोलाची भर कोणी घालू शकेल असे मला वाटत नाही.
माझ्या मते भाषांतरी भाषा फारशी चांगली नसते. जमिनीतले पाणी, जमिनीतली सत्त्वे आणि जमिनीत इतर जी काही शक्ती असेल ती घेऊन पिऊन जमिनीतून ऊस जसा वाढत जातो; तशी भाषा ही जिवंत असली पाहिजे. मराठी भाषेने मराठी मनाचा कस घेऊनच वाढले पाहिजे. तरच ख-या अर्थाने मराठी भाषा वाढेल, अधिकाधिक उत्कर्ष पावेल.
ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक झाल्याशिवाय समाजाचे जीवन समर्थ होत नाही, उन्नत होत नाही, विकसित होत नाही. ज्ञानभाषा एक आणि लोकभाषा दुसरी अशी हिंदुस्थानच्या जीवनाची परंपरागत कहाणी आहे. ऋषीमुनींची आणि पंडितांची ज्ञानभाषा होती संस्कृत; कारण ती देवभाषा होती; आणि जनसामान्यांची भाषा होती प्राकृत! हे फार पूर्वी; पण नंतरही तेच झाले.मुसलमानी अमलात ज्ञानभाषा उर्दू, फारसी, अरबी जी काही असेल ती झाली.
आम्ही आमच्यामध्ये नाना त-हेच्या सामाजिक भेदाभेदांची मोठी थोरली उतरंड रचली म्हणून हिंदुस्थान दुबळा झाला. आम्ही खटपट करतो आहोत आर्थिक क्रांती करावयाची, औद्योगिक क्रांती करावयाची. हातात आलेल्या मोठया थोरल्या स्वातंत्र्याच्या शक्तीचा, लोकशाहीच्या सत्तेचा वापर करावयाचा प्रयत्न चालला आहे, पण गाडा अजूनही काही पुढे जात नाही.याचे कारण समाजातील ही उतरंड आहे. उतरंड हा शब्द मी मुद्दामच वापरीत आहे; कारण आम्ही सर्व एकमेकांच्या डोक्यावर बसलो आहोत आणि वरचा जो खालच्याच्या डोक्यावर बसला आहे, त्याचे तोंड बेद करून बसला आहे.
ब्राम्हण ब्राम्हणांपुरता विचार करतो, माळी माळयांपुरता विचार करतो. हे मासले मी केवळ नमुन्यादाखल सांगितले. जातीयवादाच्या या विषारी विचारापासून आपण महाराष्ट्राला मुक्त केले पाहिजे. जातीयवादाचा हा विचारच समूळ नष्ट केला पाहिजे, तेव्हाच महाराष्ट्राचे सामाजिक मन एकजिनसी होईल; परंतु हे कार्य आपण एका दिवसात, एका रात्रीत करू शकणार नाही. त्यासाठी विचारी माणसांनी विचारपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय हे घडून येणार नाही.
‘मराठा’ हा शब्द जातीवाचक नाही. आचार्य अत्र्यांनी आपल्या वर्तमानपत्राला ‘मराठा’ हे नाव दिले ते काय तो शब्द जातीवाचक आहे म्हणून दिले? ‘मराठा’ शब्दामागे महाराष्ट्राच्या एकजिनसी जीवनाची भावना आहे. ‘ मराठा’ शब्दाचा हाच अर्थ आम्हाला अभिप्रेत आहे आणि म्हणून मराठी राज्य हे कोणा एका जमातीचे राज्य मुळीच होता कामा नये, या गोष्टीवर माझा जरूर विश्वास आहे.
पंढरीच्या वारक-याला जागा करून चंद्रभागेच्या वाळवंटावर जातभेद काही नाही असेच जणू घोषित करीत भागवत धर्माचा झेंडा उभा राहिला. माझ्या कल्पनेत तो सुधारणेचा झेंडा होता. आजही मी पंढरपूरच्या मंदिरात जातो तेव्हा याच भावनेने जातो. चंद्रभागेच्या वाळवंटावर महाराष्ट्रातल्या खेडयापाडयातला ब्राम्हण, मराठा, माळी, न्हावी, भंगी, कुंभार, सुतार, महार- मी हे वेगवेगळे जातीवाचक शब्द वापरतो; त्यांचा उल्लेख केला पाहिजे म्हणून वापरतो
पण आजही आम्ही असे पाहतो; की सावता माळी फक्त माळयांचा संत आहे, नामदेव फक्त शिंप्यांचा संत आहे, चोखा मेळा फक्त महारांचा संत आहे, गोरा कुंभार फक्त कुंभारांचा संत आहे. अशीच वाटणी का आम्ही नेहमी करणार आहोत? शिंपी समाजाला नाव देताना नामदेव शिंपी समाज असे म्हणतात. नामदेवांचे एवढे मोठे विश्वव्यापी काम! परंतु आज आम्ही काय त्यांना एका शिंपी समाजाचे प्रतीक मानणार? मी शिंपी समाजाला दोष देत नाही, पण आमची प्रवृत्ती कशी आहे पहा! जोतिबा फुल्यांनी सामाजिक क्रांतीचा संदेश दिला.
आपण ज्ञानीही व्हा व शहाणेही व्हा. ज्ञानात आणि शहाणपणात फरक आहे असे सुचविलेले आहे. शास्त्रांचे ज्ञान तत्त्वाच्या दृष्टीने करून घेणे अत्यंत आवश्यक असते; परंतु त्या ज्ञानाचा समाजजीवनात उपयोग करून घेण्याचे जे शास्त्र आहे त्याचे नाव शहणपण असे मी समजतो. विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर ज्ञानाबरोबरच हे शहाणपण मिळवावे लागणार आहे; कारण या शहाणपणाची देशाला आज फार गरज आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org