यशवंत विचार
लोकशाही यंत्रणा तयार करणा-या तज्ज्ञ मंडळींनी राजकीय सत्तेवर कायद्याची आणि इतर बंधने घालून ती सत्ता समतोल करून ठेवली आहे; परंतु आर्थिक सत्ता ही राजकीय सत्तेपेक्षाही अधिक शक्तिमान आहे. सत्ता हे शेवटी सर्वात मोठे सामर्थ्य आहे. मग ती सत्ता राजकीय असो अगर आर्थिक असो; आणि म्हणून सत्तेचे स्थान हे लोकांच्या कल्याणासाठी उभारलेली एक वेदी आहे, एक यंत्रणा आहे. ते एक मोठे जोखमीचे काम आहे, ही जाणीव सतत आपल्या मनात असली पाहिजे. यासाठी एकच मार्ग आहे; आणि तो हा की, आपले हे काम लोकशाहीच्या पध्दतीने चालले आहे की नाही याचे कठोर आत्मनिरीक्षण नित्य झाले पाहिजे.