व्याख्यानमाला-१९७८-६

ज्ञानाची कठोर व उग्र साधना करीत ते १९१९ पर्यंत समाजाचा अभ्यास करीत होते. टिळकांप्रमाणे तेही म्हणत होते की मला न्याय हवा, भीक नको. आपल्या दलित बांधवांना सामाजिक न्याय व माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळविण्यासाठी १९१९ च्या शेडयूल्ड कास्टस कॉन्फरन्सचे अध्यक्षपद स्वीकारले आणि लढ्याला आरंभ केला. आपल्या 'मूक' जमातीचे 'नायकत्व' स्वीकारून त्यांनी आपल्या जाती जमातींच्या दु:खांना वाचा फोडली. सामाजिक गुलामगिरी, दरिद्रय, अज्ञान यांच्या विळख्यांतून दलितांना मुक्त करावयाचे होते. बाबासाहेबांचा लढा केवळ दलितांच्या मुक्तीचा नव्हता तर तो मानवमुक्तीचा लढा होता. ग्रीक पुराणातील डिमेटर या देवतेने आपल्या बाळाला दररोज अग्नीवर धरुन त्याच्या अंगी अलौकिक शक्ती निर्माण केली त्याप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्या समाजाला खंबीर बनवले. स्वावलंबन, स्वाभिमान व स्व-ज्ञान ज्या समाजाजवळ असते तोच समाज वाढतो.

आपला उद्धार आपणच केला पाहिजे म्हणून २० जुलै १९२४ रोजी त्यांनी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' या संस्थेची स्थापना केली. शिक्षणसंस्था, वसतिगृहे व इतर साधनांचा अवलंब करुन त्यांनी जगजागरण सुरु केले. 'मूकनायक' आणि त्यानंतर 'बहिष्कृत भारत' ही नियतकालिके त्यांनी पदरमोड करुन चालविली ती जन-जागरणासाठी अस्पृश्यता नाकारणे - ती नष्ट करुन कायमची गाडून टाकणे हीच त्यांच्या लेखनामागची प्रेरणा होती. बहिष्कृत हितकारिणी सभेचे ब्रीद होते की शिका, आंदोलन करा आणि संघटित व्हा एका अर्थाने क्रांतीचा हा महामंत्र होता. आपण म्हणतो की रक्तपाताशिवाय क्रांती नाही आणि क्रांती शिवाय शांती नाही. क्रांतीचा जन्म ज्यांना अन्याय जाणवतो त्यांच्या मनात होतो. म्हणून आत्मस्थितीचे भान करुन द्यावे लागते. ज्यांना ते भान असते तेच अन्यायाविरुद्ध पेटून उठतात. क्रांतीला जे रक्ताचे अर्घ्य हवे असतात ते कुणी सहजासहजी देत नाही. तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो असं सुभाषबाबू म्हणाले होते. पण खरंच या देशाच्या स्वातंत्र्यासाठी किती जणांनी रक्त दिलं? रक्त देण्यासाठी स्वातंत्र्यांच्या आकांक्षेनं लोकांची मनं भारुन टाकावी लागतात.

संघर्षाची वाट तशी सोपी नाही. त्यासाठी खंबीर मन हवे. लोकमान्य टिळक म्हणत की मेलेली मने सचेतन करणे ही संघटनेची पहिली पायरी आहे. डॉ. आंबेडकरांनी वेगवेगळे उपाय योजून आपल्या समाजाचे मन सचेतन केले. ते म्हणाले होते. " आजवर महात्मा गांधीप्रमाणे अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील मोठा कलंक आहे असे आम्ही मानीत होतो पण आता आमची दृष्टी फिरली आहे व तो आमच्या नरदेहावरील कलंक आहे असे आम्ही समजतो, तुम्ही हिंदू धर्माला लावलेला कलंक आम्ही आपल्या रक्ताने धुऊन टाकावा असा जर ईश्वरी नेमानेम असेल, तर आम्ही स्वत:स अत्यंत भाग्यवान समजतो व अशा पवित्र कार्याचे दूत आपण होणार आहोत." हे आवाहन करण्यामागे त्यांची स्पष्ट भूमिका संघर्षाची होती. ते म्हणत असत की वनपर्वात धर्मराजास भीमाने सांगितले आहे की स्वत:चे राज्य नष्ट झाले असता ते 'देग बाई जोगवा' म्हणून मिळत नसते. भिक्षा मागणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे, क्षत्रियांचा नव्हे याकरिता भिक्षा मागणे सोडून दे. तेजाचा आश्रय कर म्हणजे तुझे हेतू साध्य होतील. नुसत्या धर्मबुद्धीने काही होणार नाही आमच्या मते हीच नीती, अस्पृश्य वर्गास इतरांच्या धर्मबुद्धीवर अवलंबून राहणे ह्याने हरण केलेले सत्त्व परत येत नसते. ज्याने त्याने आपल्या तेजानेच साध्य केले पाहिजे.

स्वजातीत तेज निर्माण करण्याचा उद्योग सातत्याने चालवावा लागतो म्हणून त्यांनी विविध आंदोलने सुरु केली. आंदोलनामुळे चळवळ वाढते आणि तिची शक्ती वृद्धिगत होते. प्रत्येक संघर्षाबरोबर शक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो. म्हणून ते म्हणाले होते की आमचे धोरण चढाईचे आहे. आम्ही विनम्रभावाने व अधोवदनाने जे काही मागवयाचे ते मागत नाही. यामुळे अस्पृश्यता निवारणाला अनुकूल असलेले लोकसुद्धा प्रतिकूल बनतात असा आक्षेप आमच्याविरुद्ध आहे. मला वाटते अस्पृश्या इतका नम्र व लाचार अलम दुनियेत कोण आहे? आज शतकानुशतके आम्ही नम्र राहिलो नाही काय? पाषाणालाही पाझर फोडणा-या दीनावस्थेत व नम्रावस्थेत आम्ही दिवस काढले ना? आता तरी कृपा करुन नम्रतेचे व विनयाचे पाठ आम्हाला देऊ नका. ते आता उच्च वर्णीयांनाच शिकवा.