व्याख्यानमाला-१९७८-७

विनंत्या, अर्ज, शिष्टमंडळे यांच्या साहाय्याने गमावलेली स्वातंत्र्ये व दडपलेले हक्क मिळणे शक्य असते तर नेमस्त पक्षाचे लोक आतापर्यंत हिन्दुस्थानचे राजे बनले असते व हिंदूची धर्मसत्ता अस्पृश्यांच्या घरी पाणी भरू लागली असती. उद्यामपणाची आम्हाला सवय आहे अगर चढेलपणाचे चाळे करण्याची हौस आहें, असे थोडेच आहे? दिवसभर काबाडकष्ट करुन पोटासाठी दोन घास कसे मिळविता येतील ही विवंचना आमची सोबतीण पण भाकरीपेक्षा माणुसकी श्रेष्ठ म्हणून आम्ही या यांतायातीत पडलो, कारण ठोठावल्याशिवाय दरवाजे उघडत नाहीत आणि हिसकावून घेतल्याशिवाय माणुसकीचे साधे हक्कही तुमच्या हातून सुटत नाहीत अशा संघर्षाच्या मार्गानेच समाजक्रान्ती जवळ येणार.

म्हणून कोकण जिल्हा अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष या नात्याने २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्यावर आपल्या सहका-याबरोबर जाऊन तेथील पाणी प्राशन करुन बाबासाहेबांनी दलितांच्या मुक्तिसंग्रामासाठी पहिले पाऊल टाकले. या पवित्र्यामुळे स्पृश्य समाज खळवून उठला. तळे बाटले अशी हाकाटी करीत स्पृश्यांनी अस्पृश्यावर निर्दय हल्ले केले. जेवत असलेल्या अस्पृश्य जनतेवर लाठ्या-काठ्यांचे हल्ले झाले. स्पृश्य लोक इतके मूर्ख की त्यांनी दुसरे दिवशी गोमूत्र शिपडून तळे शुद्ध केले असे म्हणतात बाबासाहेबांनी हा 'धर्मसंगर' का केला ? कारण चवदार तळ्याच पाणी प्याल्याने आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नव्हता असे ते म्हणाले. इतराप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी हा सत्याग्रह होता. अस्पृश्यता नष्ट करुन समता प्रस्थापित करण्याचा हा कार्यक्रम जो त्यांनी स्वीकारला होता याचे कारण आपल्याशिवाय इतर लोक अस्पृश्यातानिवारण आणि समतेची स्थापना करु शकणार नाहीत अशी त्यांची पक्की खात्री होती. आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार झालो पाहिजे अशी त्यांची श्रद्धा होती.

ते एका भाषणांत म्हणाले होते, "जपानातील सामुराई वर्गाचे राष्ट्रप्रेम ब्राह्मणवर्गात नाही. सामुराई वर्गाने आपले विशिष्ट सामाजिक हक्क सोडून देऊन राष्ट्रैक्य साधण्यासाठी समतेच्या पायावर राष्ट्राचा एकोपा करण्यासाठी जो स्वार्थत्याग केला तितका स्वार्थत्याग करणे आमच्या ब्राह्मणवर्गाच्या हातून होईल अशी आशा करणे नको. ब्राह्मणेतर वर्गाच्यानेही ही कामगिरी होईलसे दिसत नाही." समाजक्रान्तीच्या कामी जो समाज लुळा असतो त्याच्या मदतीची इच्छा धरुन चालणार नाही. लावी पक्षीण आणि तिची पिले या धड्यात सांगितलेल्या पिकाच्या कापणी करता शेजा-यावर अवलंबून राहणा-या शेतक-याची जी गत झाली तीच गत आपली होईल असा इशारा त्यांनी दिला होता. जो दुस-यावर विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला हेच खरे. म्हणून बाबासाहेबांचा आग्रह होता की दलितांचा मुक्तिलढा आपण आपल्या सामर्थ्यानेच लढविला पाहिजे.

चातुर्वर्ण्यांतर्गत अस्पृश्यता नाहीशी व्हायला हवी हे त्यांच्या विचाराचे मुख्य सूत्र होते. ते म्हणत की चातुर्वर्ण्यव्यवस्था ही लोकविग्रहकारी व्यवस्था आहे व एक वर्णी व्यवस्था लोकसंग्रहकारी व्यवस्था आहे हे उघड्याडोळ्यांनी दिसत असता जिने विग्रह होतो अशा व्यवस्थेचा उदो उदो करणा-या हिन्दू समाजाला वारंवार हार खावी लागणे अटळ आहे. म्हणून चातुर्वर्ण्याची चौकट मोडून तोडून टाकली पाहिजे. एवढेच नव्हे तर आजच्या समाजव्यस्थेतील असमानता नष्ट केली पाहिजे. कारण एका हाताने हिंदू समाजातील असमानता व्यक्तीचा विकास खुंटवून तिला व पर्यायाने समाजाला खुरटा करते तर दुस-या हाताने हीच असमानता व्यक्तीत साठवून ठेवलेल्या कार्यशक्तीचा, बुद्धीचा समाजास उपयोग करुन देत नाही. समाभीधिष्ठित समाज हे बाबासाहेबांचे स्वप्न होते त्याचसाठी समाजक्रान्ती त्यांना हवी होती. समाजक्रान्ती अत्याचारी मार्गाने होऊ नये असे त्यांना वाटे पण ती अत्याचारी होईल की अनत्याचारी होईल हे सर्वस्वी स्पृश्य लोकांच्या वागणुकीवर अवलंबून आहे.