व्याख्यानमाला-१९७८-१

व्याख्यान - दिनांक १२ मार्च १९७८

विषय - "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक क्रांती"

व्याख्याते - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे.

व्याख्याता परिचय -

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ महान व्यक्ती नव्हती, तर ती एक सर्वंकष क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणारी व त्यासाठी लढणारी एक शक्ती होती, नवसमाज निमित्तीचे स्वप्न पाहाणारी प्रवृत्ती होती. 'मनुष्यत्वाची प्रतिष्ठा' हे सर्वश्रेष्ठ मूल्य मानणा-या महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, आगरकर आदी महापुरुषांच्या परंपरेतील बाबासाहेबांनी व्यक्तिपूजेपेक्षा विचारांची पूजा श्रेष्ठ मानली. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून बाबासाहेबांनी जो दलितांचा मुक्तिसंग्राम सुरु केला तो एका अर्थाने मानव मुक्तीचा लढा होता. "शिका, संघटित व्हा आणि लढा " असा आदेश देत त्यांनी समाज क्रांतीची गती वाढवली. त्यांनी 'धर्मांतरा' चा निर्णय घेतला तो कवळ राजकीय स्टंट म्हणून नव्हे तर ते धर्मांतर सांस्कृतिक पुनरुत्यानासाठी होते. त्यांनी दलितांची 'अस्मिता' जागी केली. प्रतिगामी प्रवृत्तीशी संघर्ष करुनच क्रांती यशस्वी होईल पण त्यांनी 'हिसे' चा मार्ग अवलंबिला नाही. कारण त्यांची श्रद्धा होती की विचाराचा पराभव विचारच करु शकतो. मात्र जरुर असेल तर सर्वंकष क्रांतीसाठी रक्ताचे अर्ध्य द्यायला ते सिद्ध होते.

नांव - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, एम्. ए., बी. टी., पीएच्. डी.

जन्म - १९२५

सध्या पुणे विद्यापीठात मराठीचे व्याख्याते म्हणून काम करतात.

नोकरी करीत करीत शिक्षण, जवळ जवळ ३६ वर्षे शिक्षक म्हणून सेवा.


'महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे' माजी संपादक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सदस्य व मराठी भाषा अभ्यास मंडळाचे निमंत्रक, मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद, शासकीय शिक्षण सेवांतर्गत विदर्भ महाविद्यालय अमरावती येथे प्राध्यापक, महाराष्ट्रात अनेक व्याख्यानमाला गुंफल्या, पुणे विद्यापीठाची कै. केळकर व्याख्यानमाला, नाथमाधव व्याख्यानमाला कै. गजेंद्रगडकर व्याख्यानमाला, गडकरी व्याख्यानमाला शिवाय आकाशवाणी, दूरदर्शनवर व्याख्याने.

मराठीतील प्रतिष्ठान नवभारात, सत्यकथा, युगवाणी, केसरी, सकाळ, स्वराज्य, ललित-साहित्य पत्रिका इ. मधून समीक्षा लेखन.

पीएच्. डी. चा प्रबंध मराठी कथेची वाटचाल ( १८००-१९५०) मराठवाडा विद्यापीठाने १९६७ मध्ये स्वीकृत.

दलित साहित्य : वेदना व विद्रोह हे पुस्तक १९७७ मध्ये प्रसिद्ध झाले. याशिवाय काव्यसरिता, विचारधन, सहा कथाकार, संगीत शारदा, अरविंद गोखले यांची कथा, धग इ. संपादित पुस्तके; शिवाय संशोधनपर लेख.

पुणे विद्यापीठाच्या सिनेट, विद्वत् सभा, पदव्युत्तर संशोधन मंडळ, मराठी अभ्यास मंडळ, विद्याशाखा इ. अनेक मंडळांचे सभासद, पाठ्य पुस्तक निर्मिती व संशोधन मंडळाच्या ( बालभारती) मराठी अभ्यास समितीचे सदस्य