व्याख्यानमाला-१९७८-५

या जातीच्या समाजसुधारकांना कीर्ती नको असते, धन नको असते, सत्तास्थाने नको असतात त्यांनी जो लढा उभा केलेला असतो त्यासाठी त्यांनी सर्वस्व झोकून दिलेले असते. पण दुर्दैव असं की जोतिरावांचा जयजयकार करुन सत्तास्थाने काबीज करीत राहणा-यांनी जोतिबांचा विचार बासनात गुंडाळून ठेवला. आज त्यांच्या तत्त्वज्ञानाचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. जोतिरावांच्या विचारातील क्रांतिकारकत्व ओळखून त्यांचे तत्त्वज्ञान सामाजिक परिवर्तनासाठी वापरले पाहिजे. महात्मा गांधीचं तत्त्वज्ञान देखील गांधीजींचा जयजयकार करणा-या आंधळ्या अनुयायांनी पराभूत करुन टाकलं. गांधीजी की जय ! अशा घोषणा देत निवडणुका जिंकल्या, सत्ता भोगली पण सत्य व अहिंसा ही दोन महान तत्त्वे या अनुयायांनी पार पायदळी तुडविली. गांधीजींची जीवनदृष्टी या अनुयायांना समजलीच नाही. नेहरुंच्या तत्त्वज्ञानाचा पराभवही आपण डोळ्यादेखत पाहिला केवढा मोठा गुरु असू द्या शिष्यांच्या तावडीत सापडला की त्याच्या तत्त्वज्ञानाचा निकाल लागला. डॉ. बाबासाहेबांच्या प्रभावी क्रांतिकारक तत्त्वज्ञानाची दुर्दशा होऊ नये असे मला सारखे वाटते. कारण सामाजिक परिवर्तनाला वेग देण्याचे सामाजिक क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य बाबासाहेबांच्या विचारात आहे.

समतेचा मार्ग ममतेतून जातो पण ज्या समाजात उच्चनीच भाव आहे त्या समाजात ममत्व कसे असणार ? डॉ. आंबेडकरांनी एकदा गांधीजींना त्यांच्यासमोर हात पालथा ठेवून विचारले होते की हिंदूंचे चार्तुर्वर्ण्य असे आहे का ? कारण अशी सर्व बोटे एकाच पातळीत असतात. पण हिंदूंचे चातुर्वर्ण्य जिथे बोटे समपातळीत नसून एकावर एक अशी आहेत अशा अवस्थेतील हातासारखे आहे. डॉ. आंबेडकरांना हिंदुधर्मात एकापेक्षा एक कडवट अनुभव आले. प्रत्येक अनुभव त्यांचे माणूसपण नाकारणारा होता. सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते शिकत तेव्हा त्यांना कुणी प्यायला पाणी दिलं नाही. गावातल्या पाणवठ्यावर जनावरं पाणी पिऊ शकतात पणं माणसासारख्या माणसाला साधं पाणी पिऊ न देणारा हिंदुर्धम किती अमानुष ! लहानपणी शाळेत गणित करायला फळ्याजवळ बाबासाहेब गेले की सवर्णांची पोरं एकच गिल्ला करीत त्याला फळ्याजवळ जाऊ देऊ नका त्याच्याखाली आमचे डबे आहेत. १९३४ साली डॉ. बाबासाहेब दलितांचे नामवंत नेते झाले होते पण दौलताबादच्या किल्ल्यावर तहान लागली तर पाण्याला स्पर्श करु दिला नाही. असे आणि यापेक्षा कितीतरी कडवट अनुभव बाबासाहेबांना सोसावे लागले. सोसाव्या लागलेल्या मानहानीमुळे, अवहेलनेमुळे, अन्यायामुळे त्यांचे मन सतत बंडाचा झेंडा घेऊन धावत होते. ह्या पृथ्वीतलावर 'अस्पृश्य' म्हणून माणसांना कुत्र्यामांजरापेक्षाही हीन वागविण्यात येते असा भारत हा देश आहे. समाजाचा कसलाही अपराध न करता वर्षानुवर्षे अस्पुश्यतेची राक्षसी शिक्षा भोगत बसलेल्या दुर्दैवी जमातीत बाबासाहेबांच्या वाट्याला आला तो निर्दय, अमानुष छळ ! उच्चवर्णीय समजणा-यांनी त्यांना जन्मभर लाथाडले. पांडिल्याबद्दल, कर्तृत्वाबद्दल कुणी कौतुक केलं नाही. परदेशात अध्ययन करीत असता साधा स्लाइसचा तुकडा खाऊन त्यांनी दिवस काढले. त्यांचे ज्ञानावर प्रेम होते. ज्ञान मिळविण्यासाठी अक्षरश: त्यांनी हाडाची काडे केली. धार्मिक व सामाजिक पारतंत्र्याच्या नरकात पाच हजार वर्षे सडत पडलेल्या सात कोटी गुलामांना स्वतंत्र करण्यासाठी तळहातावर शिर घेऊन जो नरवीर सा-या हिंदुसमाजाशी लढला त्या बाबासाहेबांचे नाव कोण विसरेल ?

अस्पृश्यता हा हिंदुधर्मावरील कलंक आहे आणि तो धुऊन काढला पाहिजे हा विचार एकोणिसाव्या शतकात उदयास आला आणि हळूहळू वाढीस लागला. समाजाच्या विलक्षण राहाटीमुळे उच्चनीचत्व अस्तित्वात येऊन तदनुसार जो व्यवसाय विभाग सहजगत्या झालेला आहे त्यास ईश्वरकृत व सनातन मानून उच्च वर्गात जन्मास आलेल्या लोकांनीच या वर्गात जन्मास आलेल्या लोकांस अपवित्र व अस्पृश्य मानणे यापेक्षा मनुष्याच्या विकारीपणास लांछनास्पद अशी दुसरी गोष्ट नाही असं आगरकर म्हणाले होते. अस्पृश्यांचा उद्धार स्पृश्यांनी केला पाहिजे यात मोठेपणा नाही. उलट स्पृश्यांनी करावयाचे ते एक प्रायश्चित आहे बाबासाहेबांचे म्हणणे होते की अशा उद्धाराच्या भाषेची गरजच काय मुळी ? अस्पृश्यतेच्या प्रश्नाचे स्वरुप केवळ धार्मिक नसून ते एकंदर हिंदू समाजव्यवस्थेशी निगडित आहे. मनुष्य म्हणून मानाने जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. म्हणून समाजाच्या राजकीय व आर्थिक क्षेत्रात अस्पृश्यात इतराबरोबरचे सर्व हक्क मिळावेत म्हणून त्यांनी स्वतंत्र लढा उभारला व त्याचे अखेरचा श्वास सोडीपर्यंत झुंजार नेतृत्व केले.