आपल्या राष्ट्रीय जीवनाला एक निश्चित दिशा लावण्याचा प्रयत्न करणारे नेतृत्व या देशाला प्रारंभीच लाभले होते. हे तर लक्षात घेतलं तर, हा देश २७-२८ वर्षे आज प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतो आहे; आणि निश्चित तत्त्व मनाशी बाळगून पुढे जातो आहे; याचं मग आश्चर्य वाटणार नाही. तुलनेसाठी युरोपात वा नव्याने आफ्रिकेत स्वतंत्र झालेले किंवा वसाहतवादाच्या कचाट्यातून मुक्त झालेले देश घ्या. त्यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळी कितीही उत्कट असल्या तरी त्यांच्या पाठीशी राजकिय नेतृत्व करणारा विचारवंत तत्त्वज्ञ नेता नसल्यामुळे त्यांची पुढे काय परिस्थिती झाली हे बघण्यासारखे आहे. शेजारचं पाकिस्तान राष्ट्र जरी उदाहरणासाठी घेतलं तर लक्षात येईल की कुठलंच राजकिय असं तत्त्वज्ञान नसल्यामुळे या देशाचे धिंडवडे निघाले आहेत. किती रक्तपात, किती बदल झाले, किती नेते बदलले कितींचे खून झाले. या देशामध्ये असे काही झाले नाही. याचे सगळे श्रेय पंडितजींना जाते. आणि इतर समानशील व समविचाराच्या नेत्यांच्या सहकार्याकडे येते. पंडितजी यांत प्रमुख होते याचं कारण पंतप्रधान म्हणून नेतृत्व स्वीकारण्याची जबाबदारी त्यांच्यावरती प्रारंभीच पडलेली होती. या देशाला जी एक निश्चित दिशा त्यांनी आपल्या कारकीर्दीत लावून दिली, जी चौकट घालून दिली, त्या चौकटीमध्ये हा देश, हा समाज म्हणूनच सुरक्षित राहिला.
अराजक अलीकडे थोडेसे वाढलेले आहे, आपण दुबळे ठरलो काही बाबतीत, आपल्यामध्ये काही उणीवा असतील. आपला जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा झाला नसेल. परंतू आपण ज्या काही मूलभूत कल्पना स्वीकारल्या त्या कल्पनांचं कवच आपल्या भोवती असल्यामुळे आपण या जगामध्ये नष्ट होऊ शकलो नाही. उलट आज आपण एका पायरीवर येऊन ठेपलेलो आहोत की, जगातल्या पुढारलेल्या राष्ट्रांनाही दर क्षणाला हा देश काय म्हणतो हे ऐकावं लागतं. समर्थ राष्ट्र या आपल्या देशाला निर्माण करण्याचं श्रेय हे या विचारपरंपरेला आहे. आज अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशाला या देशात काय चाललं आहे याकडे सतत लक्ष ठेवावं लागतं. तो असं म्हणत नाही, “भारत मागासलेला देश आहे, त्याचं काय व्हायच असेल ते होऊ द्या, आम्हाला त्याचा विचार करायचं काय कारण आहे?” ब्रिटन असं म्हणत नाही, फ्रांन्स असं म्हणत नाही, चीन असं म्हणत नाही, रशिया असं म्हणत नाही. सगळेजण भारतामध्ये काय चालेले आहे याकडे कान लावून, डोळे लावून बसलेले आहेत. याचा अर्थ या देशामध्ये चाललेल्या या महान प्रयोगाला, विकासाच्या दिशेने चाललेल्या इतर कुठल्याही देशामध्ये तुलना नसल्यामुळे एक प्रयोग म्हणून, एक कसोटी म्हणून, या सर्व तत्त्वांची सत्यता या दगडावरती तपासली जात आहे. म्हणून, या देशाकडे सगळे देश पहात आहेत. मोठी अभिमानाची गोष्ट आहे ही! या परिवर्तनाची निश्चित दिशा ठरविण्याचे वैचारिक काम या आपल्या पहिल्या नेतृत्वाने केले.
ही निश्चित दिशा होती? आपण म्हणतो की लोकशाही संसदीय पध्दती आपणाला मिळाली. समाजवादी समाजरचनेचं – १९५५ च्या आवडी येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मान्य झालेलं तत्त्व – आर्थिक सामजिक पुनर्रचनेसाठी आम्ही स्वीकारलं, व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेल्या मूलभूत हक्कांची देणगी आम्ही समाजाला दिली. अशा अनेक गोष्टी मार्गदर्शक तत्त्वे म्हणून परिवर्तनाच्या कुठल्या दिशेने आम्ही जाणार आहोत हे ठरविण्यासाठी आम्हांला मिळाल्या. नियोजनासारखे मागासलेल्या देशाला व समाज घटकांना विकासाच्या दृष्टीने प्रेरित करील अशा प्रकारचे एक साधन याच काळामध्ये आपल्याला मिळाले. अशी जी तत्त्वे आपल्या जीवनामध्ये अंतर्भूत झाली ती तत्त्वे जगातील वेगवेगळ्या राष्ट्रांच्या प्रयोगातून निर्माण झालेली आहेत. मी त्यांचा ओझरता उल्लेख या ठिकाणी करणार आहे. ही समाजवादाची कल्पना उद्भूतच कशी झाली? कारण समाजिक परिवर्तनाचा विचार करीत असताना तो काही एका राजकीय दृष्टिकोनातून करता येतो असं नाही. किंबहुना या देशाचा जो चिवटपणा आहे. तो कशातून निर्माण झाला असेल ? तर येथील संस्कृतीच्या मूलभूत सिध्दांतावरती, त्रिकालबाधित सिध्दांतावरती तो उभा आहे, आणि म्हणून कुठलेही तत्त्व आम्हाला नवीन वाटत नाही. समतेचे तत्त्व आम्हांला पूर्वीपासून ठाऊक आहे. समतेचं तत्व आमच्या प्राचीन ऋषीमुनींपासून आतापर्यंत सगळ्यांनीच पुरस्कारलेले आहे. स्वातंत्र्याचं तत्त्व तेही आम्हाला नवीन नाही. कारण आत्ममुक्तीचा आमचा धर्म असल्यामुळे, आत्मसाक्षात्काराचा मार्ग असल्यामुळे सगळ्या बंधनांतून मुक्त होणं हीच आमची धार्मिक परंपरा आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचं तत्त्वसुध्दा आम्हाला नवीन नाही.