व्याख्यानमाला-१९७६-३

विचाराच्या साह्याने समाजाचं परिवर्तन करायचं असतं अशा प्रकारची प्रक्रिया या देशामध्ये सुदैवाने पारतंत्र्याच्या काळापासून सुरू झाली. ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असलेल्या प्रचंड असा खंडप्राय देश, त्या वेळचा ३३ कोटी लोकांचा, जुलमाने गांजलेला, दुर्धर परिस्थितीने ग्रस्त असलेला, बुरसट रुढी व प्रथा-खोट्या धर्मकल्पना, खोटया समजुती, नानाप्रकारची विषमता यांच्या मध्ये विभागलेला व निश्चल आणि निष्प्राण होऊन पडलेला हा देश. त्याचं भविष्य काय ? यासंबंधीचा विचार या देशात पारतंत्र्याच्या काळातच जन्मलेल्या विचारवंतांनी केला होता ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आजच्या जगातील अनेक विकसनशील देशामध्ये (Developing Countries) विकासाच्या दिशेने मार्गस्थ झालेला भारत देश अग्रदूत मानला जातो. कारण स्वातंत्र्याची चळवळ करीत असताना केवळ स्वातंत्र्यप्राप्ती एवढीच कल्पना आमच्या विचारवंत नेत्यांच्या डोळ्यांसमोर नव्हती. स्वातंत्र्यांच्या चळवळीचे नेतृत्व करणारी जी जी मंडळी या देशामध्ये होऊन गेली त्यामध्ये विशेषत: महात्मा गांधी, त्यांचं शिष्यत्व करणारे पंडितजी आणि त्यांच्या बरोबरीनं काम करणारी इतर मंडळी व महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर लो. टिळक, आगरकर, ज्योतिराव फुले, दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, गोखले अशी कितीतरी माणसे की ज्या माणसांचे विचार इंग्रजी ज्ञानाच्या परिशीलनातून आलेल्या नव्या दृष्टि कोनांनी, नव्या कल्पनांनी भारावलेले होतो. या नेत्यांच्या डोळ्यांसमोर केवळ राजकिय स्वातंत्र्याचे ध्येय असते तर कोणत्याही एकाच भावनेवरती आधारलेल्या राष्ट्रीय सांस्कृतिक पारंपारिक अशा प्रकारच्या अगर कुठल्या तरी एखादया तत्वज्ञानाचा आधार घेऊन स्वातंत्र्य मिळवणं फारस कठीण गेलं नसतं. अशा प्रकारच्या चळवळी जगभर कुठल्याही राष्ट्राच्या इतिहासामध्ये नेहमीच होत असतात. परंतु केवळ कुठल्याही एका विशिष्ट धर्माचा, सांस्कृतीचा वा संकुचित अशा प्रकारच्या कुठल्याही उत्कट भावनेचा आधार न घेता सर्व समावेशक जनसमान्यांना बरोबर घेऊन जाईल आणि स्वातंत्र्यानंतरदेखील  स्वातंत्र्याचा अर्थ परिपूर्ण करण्याला मदत करील अशा प्रकारच्या विचारांची शिदोरी त्यांनी त्याचवेळी बरोबर घेतली होती. या साठी आगरकरांनी आम्हाला विवेकनिष्ठा शिकविली, बुध्दिवाद शिकवला, बुध्दिप्रामाण्य शिकवलं. जी गोष्ट बुद्धीला पटेल तीच गोष्ट मी स्वीकारीन आणि म्हणून समाजातल्या सगळ्या रूढी – विधवाविवाहाच्या – बालविवाहाच्या इ. ज्यांमध्ये समाजाचे मन त्याचा आत्मा गुदमरला जातो असे प्रत्येक अमंगल बंधन बुध्दीच्या कसोटीवरती घासून ती उतरत नसेल तर टाकून दिले पाहिजे. आशा प्रकारची बुध्दिवादाची निष्ठा आगरकरांनी त्या वेळेला आम्हांला शिकविली. समाजातला रंजला गांजलेला दुबळा घटक केवळ जातीय विषमतेमुळे जर दु:खाचे अधिष्ठान बनला असेल, कुणाच्या तरी गुलामीत बांधला गेलाला असेल तर त्याला आधार देणारे व समतेचे सत्यधर्माचे तत्त्वज्ञान सांगणारे म. ज्योतीराव फूले होत. आणि या देशातील अर्थव्यवस्था एकादया ऑक्टोपसच्या कचाटयात सापडावी त्याप्रमाणे ब्रिटिश अर्थव्यवस्थेच्या शोषणाला बळी पडलेली आहे. या देशाचं रक्त शोषण केलं जात आहे अशा प्रकारचा अर्थविचार मांडणारे दादाभाई नौरोजी होते, न्या. रानडे होते. याच वेळी राष्ट्रीयत्वाची प्रखर भावना इतिहासाच्या संस्कृतीच्या आधारे मनात पेटवून आणि तत्कालीन युरोपामध्ये उद्य पावलेल्या लोकशाहीच्या नव्या संकल्पनेवर आधारलेली अशी ज्वलंत भावना निर्माण करणारे टिळक होते. आणि त्यांच्या नंतरच्या काळामध्ये या सगळ्या विचारांना समावून घेईल -  आगरकरांची बुध्दिनिष्ठा, टिळक – दादाभाईंनी शिकवलेलं अर्थशास्त्र, टिळकांचा ज्वलंत अशा प्रकारचा राष्ट्रवाद, ज्योतिबा फुले यांची बहुजन समाजासंबंधीची आत्यंतिक करुणा, लोकहितवादींचा आणि दादाभाईंचा नव्या लोकशाही जीवनपध्दतीसंबंधीचा आलेला विचार -  या सगळ्यांना सामावून घेईल. आणि तरीही त्याच्यापलीकडे जाईल असे सर्वांगीण सर्वंकष जीवनाचा विचार करणारे म. गांधींचे सर्वस्पर्शी तत्त्वज्ञान या सगळ्याची पार्श्वभूमी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला लाभली होती.