व्याख्यानमाला-१९७६-४४

छत्रपतींचे दुसरे एक निरीक्षण लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यांचे म्हणणे असे की, आपल्या ग्रामपंचायती, नगरपालिका व जिल्हा लोकल बोर्ड ह्या संस्था जातिभेदाच्या भावनेपासून मुक्त नाहीत. त्यामुळे त्यांचे कार्य व्हावे तसे परिणामकारक होत नाही आणि गरिबांना त्या साहाय्यक होत नाहीत. त्यांचे म्हणणे काही खोटे नाही. स्वातंत्र्याच्या काळात काही जिल्हा परिषदांनी social welfare करता दिलेली रक्कम सरकारकडे परत केल्याची बातमी प्रसिध्द झालेली आहे त्याचे कारण ही जातीय पक्षपाती बुध्दि व दलित वर्गाकडे पाहाण्याची बेपर्वाईची वृत्ती हेच होय. शाहू छत्रपती आधुनिक भारतातले एक महापुरुष होत. जो समाजाला योग्य मार्गदर्शन व कालमानाबरोबर धैर्याने पुढे नेतो तो महापुरुष. शाहू भारतीय समाजक्रांतीचे एक नेते होते. The peace and progress of the nation depends upon the elevation of the Backward and Depressed  हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यांनी हिंदी राष्ट्रवादाला विस्तृत नि व्यापक तत्त्वाचे अधिष्ठान दिले. ते लोकशाहीचे व सामाजिक न्यायाचे मोठे कैवारी होते. त्यांचे नाव मागास वर्गीय व दलित वर्ग ह्यांची उन्नती सूचित करते.

मागासवर्गीयांना व अस्पृश्य वर्गाला त्यांचे मानवी हक्क, मानवी स्वातंत्र्य व मानवी समानता मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले तत्त्व व प्राण पणास लावले. हरिजन, अस्पृश्य, बुरुड यांच्या पंगतीस जेवणारा राजा दोन हजार वर्षांत निर्माण झालेला नाही. येशू ख्रिस्त व बुध्द कुणाच्याही हातचे अन्न खात असत. शाहू आपले अन्न गरिबांना देऊन त्यांचे अन्न त्यांच्या पंगतीस बसून जेवत असत. आपल्या राजवाड्यावरही त्यांचेबरोबर अन्न ग्रहण करीत असत. जेव्हा भारताचा सामाजिक क्रांतीचा इतिहास सत्यनिष्ठेने लिहिले जाईल. तेव्हा शाहू छत्रपतीचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल.

मी जे काही आता टिळकांसंबंधी बोललो त्यामुळे माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नका. ते पवित्र नाव आहे. चरित्रकार ह्या नात्याने मला सत्यकथन केलेच पाहिजे म्हणून काही गोष्टी मी सांगितल्या. जो निर्भय नाही तो नेता नाही; तसेच जो निर्भय नाही तो चरित्रकार नाही. चरित्रे खुशामतीसाठी लिहावयाची नसतात. चरित्रलेखन हे पवित्र काम आहे. ते एक पवित्र ध्येय आहे. कलेसाठी कला ह्या ध्येयापेक्षा ते श्रेष्ठ ध्येय आहे. मग कलेकरता कला म्हणणारे लेखक काहीही म्हणोत.