हा विरोधाभास निर्माण झाला त्याचं कारण, समाजप्रगतीची काही तत्त्वं फक्त कागदावरतीच राहिली. प्रत्यक्ष आचरणात आली नाहीत. उदाहरण देतो : कर आकरणी करणे हे प्रत्येक राज्याचे कर्तव्य असते. करआकारणीशिवाय राज्यांच उत्पन्न वाढू शकत नाही. म्हणून कर आकारणी करावी लागते. परंतु करआकारणी केल्यानंतर ज्यांच्यावरती कर आकारणी करावी लागते. परंतू करआकारणी केल्यानंतर ज्यांच्यावरती कर आकारणी होते. त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना नसेल, त्यांच्यामध्ये सामाजिक नीतिमत्ता नसेल, त्यांच्यामध्ये व्यक्तिमात्राविषयी प्रेम नसेल, तर जे प्रामाणिक असतात ते कर भरत राहतात आणि जे अप्रामाणिक असतात ते पळवाटा काढून कर चुकवेगिरी करतात. जगात ज्यास्तीत ज्यास्त टॅक्सिंग करणारा देश म्हणून भारत आळखला जातो. पण सगळ्यांत कमीत कमी कर कुठे गोळा होतो तर तो भारतातच होतो. याचं कारण टॅक्स न देणारे बुध्दिवान लोक आमच्या देशामध्ये जास्त आहेत. त्यामुळे पैश्याचा ओघ देशाच्या तिजोरीकडे न लागता प्रामाणिक माणसाकडून अप्रामाणिक माणसाच्या खिशात जाण्याकडे होतो. हे जर आपण लक्षात घेतलं तर एवढी सगळी प्रगती होऊनसुध्दा, एवढं सगळं संपत्तिमान वाढूनसुध्दा, दरडोई उत्पन्न का वाढलं नाही याचं उत्तर आपणाला बरोबर सापडत. एरव्ही काळाबाजार, कर चुकवेगिरी, स्मगलिंग करणारे लोक केवळ प्रदर्शनासाठी ज्या वेळेला राष्ट्रप्रेमाच नाटक करतात त्या वेळेला ते खोटं असतं हे आपणाला दिसून येतं. ज्याच्या बाथरूमध्ये कोट्यावधी रुपयांची संपत्ती दडवून ठेवलेली सापडली अशा बातम्या आपण वाचलेल्या असतात; ती माणसं पदर पसरून आपल्या भोवती ज्या वेळेला एखाद्या राष्ट्रप्रेमाचं नाटक करून मदत गोळा करायला येतात त्यावेळी त्यातल्या विरोधाभासाची कीव येते, किळस येते. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देशद्रोह करणारी अशा प्रकारची माणसं वरकरणी केव्हा केव्हा नाटक करतात. त्यावेळीला फसून जाण्यामध्ये स्वारस्य नाही. हे जर आपण लक्षात घेतलंत तर या देशातील संपत्ती वाढूनसुध्दा गरिबांच्या खिशात अजून पैसा गेलेला नाही हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही.
आणि कदाचित या सत्याचा साक्षात्कार झाल्यामुळे गेल्या सहामहिन्याच्या काळामध्ये आणिबाणीचा असा एक झगझगीत झोत आपल्या राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक सगळ्याच जीवनामध्ये प्रकाशासारखा आलेला आहे. त्याच्या मागची कारणमीमांसा आपल्याला समजू शकेल. कुठेतरी काहीतरी प्रचंड प्रमाणात गमावतो आहोत; याला खीळ कुठेतरी घातली पाहिजे. विकासाचा गाडा चालल्याचा नुसता आवाज होतोय. तो चाललेलाच नाही. त्याची चाकं फक्तं एकाच जागेवरती फिरत आहेत. दोन चार माणसांच्या दारांतच ती फिरताहेत. चाके फिरल्यामुळे आपल्याला वाटते की रथ पुढे चाललेला आहे. रथ पुढे चाललेलाच नाही. आणि म्हणून हा रथ त्या चार चौघांच्या दारांतला काढून आता तो समाजाच्या प्रांगणामध्ये आणून ठेवण्याचं काम या काळामध्ये चाललं आहे, असं जर मी म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं होणार नाही. आणि म्हणून वेग आणि शक्ती हा शब्द वापरलेला आहे सामाजिक परिवर्तनाचा वेग मंदावलेली गती सगळ्यांनाच जाणवलेली आहे. मला जाणवलेली आहे तुम्हांला जाणवलेली आहे. गरिबाला ती ब-याच वेळेला गरिबीमुळे जाणवलेली नसते. भूक लागून लागून भूक मेली की भूक कळत नाही. ही अत्यंत विपन्नावस्था आपल्या देशामध्ये येण्याइतपण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जर त्याला गती दिली नाहीतर हा गाडा कोलमडून पडेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हा एक नवा प्रयोग चालला आहे. असं निदान माझ्या दृष्टीला वाटतं. त्यासाठी काही किंमतही मोजावी लागेल. सर्व अधिकार, सुखोपभोग भोगणारे, परंपरेने, संस्कृतीने ज्याला सगळेच अधिकार, सुखोपभोग भोगणारे, परंपरेने, संस्कृतीने ज्याला सगळेच अधिकार (Previlages) म्हणतात. उपभोगता आले. त्यांना आपल्या हक्कावरती गदा आल्यामुळे कदाचित हे काय चाललंय, काहीतरी विपरीत चाललंय आमच्या स्वातंत्र्यावरती किंवा आमच्या उत्कर्षावरती गदा येतेय असं वाटले तरी ज्या समाजवादाचं कंकण या देशाने बांधले त्या समाजवादाच्या दिशेने प्रगतीकरण्यामध्ये हे जर अडथळे म्हणून येत असतील तर ते अडथळे दूर केले पाहिजेत. समाजाच्या अंतिम हिताच्या दृष्टीने हा विचार समजावून घेण्याची वेळ आज आलेली आहे. या राजकीय परीवर्तनाबरोबर ज्या चांगल्या गोष्टी आम्ही आज जगापुढे मांडतो आहोत. त्या राजकीय परिवर्तनाबरोबरच जे आर्थिक परिवर्तन व्हायला हवे होते, जे सामजिक परिवर्तन व्हायले हवं होतं ते न झाल्यामुळे ती दिशा मात्र आपण चुकलो आणि म्हणून सुकाणू फिरवून कुठल्यातरी ध्रुवाकडे लक्ष ठेवून थोडसं मार्गस्थ होण्याचा प्रयोग आपण करतो आहोत आणि म्हणून वेठ बिगारी नष्ट होत आहे; म्हणून कर्जमुक्ती कायदा कार्जामध्ये बुडालेल्या लोकांची गुलामगिरीतून त्यांना मुक्त करण्याचा प्रयोग चालू आहे; म्हणून भूमिहिनांना भूमी देण्याचा प्रयोग चालू आहे; म्हणून गृहहीनांना घर देण्याचा प्रयोग चालू आहे; उद्योग नसलेल्यांना पोटापुरते मिळेल अशा प्रकारचा उद्योग देण्याचा प्रयोग चालू आहे. प्रचंड प्रयोग ! वाटतं तितकं सोपं नाही. जादूच्या कांडीने करता येण्यासारख हे काम नव्हे. पण याची तीव्र जाणीव होण्या इतकी परिस्थिती आज झाली असल्यामुळे आज त्या लोकांचा – त्या दलितांचा दूरगामी विचार करण्याची गरज असल्यामुळे, मला असं वाटतं की समाजामध्ये याचदृष्टीने अधिक जागृती व्हायला हवी.