व्याख्यानमाला-१९७६-१०

राजकीय परिवर्तनाच्या दृष्टीने, जे परिवर्तन आपल्या समाजाच्या आताच्या काळात अनुषंगाने यायला हवं ते कितपत आलं किंवा ते कोणतं या विचाराकडे आपण वळतो. आणि मग नाही म्हटलं तरी थोडीशी निराशा येते. पंडितजींनी ज्या दूरदृष्टीने, ज्या ध्येय धोरणांनी समाजवादाचा अंगीकार केला. त्याचवेळी लोकशाहीची संसदीय प्रणालीसुध्दा त्यांनी स्वीकारली. हे सगळं एकत्र आणीत असताना काही गणितं चुकली असं मी म्हणतो कारण त्यांच्या बरोबरीने राज्य करीत असताना हे सगळे अंमलात आणण्याचे काम त्यांना करायचं होतं. ते कारणं स्वजनांतीलच परस्पर विरोधी विचारधारांमुळे अत्यंत कठीण गेलं. तुम्हांला माहित असेल राज्यकर्त्या पक्षामध्ये, त्या वेळच्या काँग्रेस पक्षामध्ये विविध मतप्रणाली असणारी माणसं होती. भांडवलशाहीवर विश्वास असणारी, जमीनदारीवर विश्वास असणारी होती, राजेशाहीवर विश्वास असणारी होती. म्हणजे राष्ट्रीय उध्दारावरती श्रध्दा असताना सुध्दा तो उध्दार करण्याचे जेवढे मार्ग असतील तेवढे मार्ग दाखविणारा – मानणारी अशी माणसं या देशामध्ये होती आणि त्या मुळे या सगळ्यांना सांभाळून घेता घेता कधी कधी फार मोलाची अशा प्रकारची तत्त्वं आपण गमावून बसलो. आणि म्हणून सार्वंजनिक क्षेत्रामध्ये महान उद्योग निर्माण झाले. समाजवादाचे जर पहिले मुख्य लक्षण कोणते असेल तर ज्याला Strategic  किंवा बेसिक इंडस्ट्रिज म्हणतात (अवघड उद्योगधंदे) किंवा राष्ट्राच्या उत्कर्षासाठी लागणा-या मूलभूत गरजा निर्माण करणारे अशा प्रकारचे उद्योगधंदे, राष्ट्राच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे उद्योगधंदे – शस्त्र  निर्मितीचे, विमान निर्मितीचे, लोखंड पोलाद इत्यादी निर्माण करणारे उद्योगधंदे, रस्त्याचे जाळे विणून त्या वरची वाहतूक ताब्यात ठेवणारी यंत्रणा इ०, राष्ट्राच्या रक्षणासाठी, राष्ट्राच्या अभ्युद्यासाठी आणि राष्ट्राच्या नाड्या हातांत ठेवण्यासाठी आवश्यक असणारे जेवढे घटक होते ते आम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये आणले. राष्ट्रीयीकरणाचा एक विशिष्ट दृष्टिकोन स्वीकारून बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. कोळशाच्या, सोन्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण केले, विम्याचे राष्ट्रीयीकरण केले. काही ठिकाणी आपण वाहतुकीचे राष्ट्रीयकरण केले. आणि अशा रीतीने समाजिक नियंत्रण समाजवादच्या दृष्टिकोनाने, राजकिय विचारांच्या आधाराने सामाजिक क्षेत्रामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण त्याच वेळेला जो खाजगी क्षेत्राचा बराच मोठा अशा प्रकारचा टापू आम्ही मुक्त ठेवला, काही एका विशिष्ट मतांच्या लोकांचा विरोध होऊ नये म्हणून त्यामुळे सुध्दा या देशाची प्रगती झाली.

तुम्ही या देशाची उत्पादनाची आकडेवारी जर पाहिली तर ती घटलेली नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये, सार्वजनिक क्षेत्रांमध्ये देशाचे उत्पन्न १९४७ सालापासून आज १९७५ पर्यंत सतत वाढत गेलेले आहे आणि इतके सगळे होऊन सुध्दा या देशात दर डोई उत्पन्न किती असा प्रश्न विचारला की त्यांच उत्तर असं मिळतं २५० रुपये किंवा ४५० रुपयाचेवर आम्ही अजून गेलेलो नाही. दरडोई उत्पन्न वार्षिक ४००\- रुपये ! तर काही लोक दिवसाला चार आणे कमवणारे आहेत! ! हा विरोधाभास आपण जर नीट लक्षात घेतला तर मन व्याकूळ झाल्याशिवाय राहत नाही, देशाची संपत्ती वाढते आहे. असे दृश्य एकीकडे दिसत असताना, देशातील कारखानदारी वाढते आहे, देशातील उद्यमशीलता वाढते आहे देशातील बुध्दीची भरारी चौफेर क्षेत्रांमध्ये भरा-या मारताना दिसते आहे. हे सगळं दिसत असताना सुध्दा याच्यातून निर्माण झालेली सगळी समृध्दी गेली कुठे ? इथे समाजवादाला पहिला हादरा बसलेला तुमच्या लक्षात येईल. या बाबतीत कुणाचेही दुमत नाही. या देशामध्ये या सगळ्या क्षेत्रांतून निर्माण झालेले उत्पादन संपत्ती ज्या प्रमाणात राष्ट्राच्या हाती गेली त्या पेक्षा कितीतरी पटीने ती मूठभर लोकांच्या हातांत गेली. आणि त्यामुळे समाजवादाच्या या सर्वसमावेशक तत्त्वांचा अवलंब करताना आपण फार मोठी गोष्ट गमावली. या देशामध्ये दारिद्र्यरेषेखाली जगणारा समाज ५०% हून अधिक आहे. त्याला दुपारचे पोटभर खायला कसे मिळेल, काम कसे मिळेल याची चिंता आहे. अशा प्रकारची लक्षावधी माणसे या देशामध्ये आहेत. आज प्रगतीची भरारी दिसते. आर्यभट्ट आकाशामध्ये फिरताना आपल्याला दिसतो. पोलादाच्या प्रचंड अशा अवजड उद्योगाचे एक मनोहर दृश्य आपल्याला दिसते. हिंदुस्थान मशिन टूल सारखा अद्ययावत मशिन्स निर्माण करणारा अशा प्रकारचा कारखाना दिसतो. नव्हे, तर आपल्या तंत्रज्ञानाच्या आधारावर इराकसारख्या राष्ट्रात आपले शास्त्रज्ञ जाऊन तशा प्रकारचा कारखाना त्यांना घालून देताना आपण पहातो. आपली लढाऊ विमानं आकाशामध्ये भरारी मारून आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विमानाशी टक्कर देताना आपण युध्दामध्ये पाहिली. काही राज्यांमध्ये अन्नधान्याच्या दृष्टीने प्रचंड अशा प्रकारची क्रांती झाली तिला आपण हरितक्रांती म्हटलं. असे सगळं असतानासुध्दा काही माणसं अजून चार आणे दरडोई उत्पन्नाखाली जगत आहेत.