व्याख्यानमाला-१९७६-१४

सामाजिक परिवर्तनामध्ये जर सगळ्यात मोठा अडथळा कोणता निर्माण झालेला असेल तर आमच्या मानसिक स्थितीमध्ये जो बदल मधल्या काळामध्ये होऊ घातलेला होता तो स्वार्थाची वृत्ती बोकाळल्या मुळे, अर्थार्जनाकडे ज्यास्त लक्ष दिल्यामुळे, नैतिक जाणिवा दुर्बळ झाल्यामुळे, सामाजिक जबाबदारीची जाणीव कमी झाल्यामुळे हळूहळू गळून पडायला लागला आणि त्याचा संपूर्ण संदर्भ आज बहुतांशाने तुटलेला आपल्याला दिसतो. हा आपला मोठा पराभव आहे. म्हणून सगळे विधायक घडते त्याचे परिणाम दिसत नाहीत. सगळं उगवतं पण त्याचं फळ पदरांत पडत नाही. अशी जी परिस्थिती आपणाला दिसते. नव्या मूल्यांना सामावून घेणारी जी एक नवी विचारधारा प्रत्येक व्यक्तिमात्रामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, ती अजून झालेली नाही, अजून धर्माधर्मावरती जाती जातीवरती, पंथापंथावरती, देवदेवतावरती, गावागावामध्ये तंटे होतात. होळीचा मान कोणी घ्यायचा याच्यावरती आमच्या कोकणामध्ये मारामा-या होतात. दोन तट पडतात. खून करण्यापर्यंत मजल जाते केवढा दैवदुर्विलास हा ? या वर्षी दंडाधिका-यांना हुकुम काढावा लागला, की अशाप्रकारचं वर्तन करणा-या माणसाला मिसा खाली अटक करण्यात येईल. देशद्रोहा सारखंच हे काम आहे. असा विचार त्या हुकुमाद्वारे माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी ही खटपट करावी लागते. त्या पातळीवरती  खाली उतरावं लागतं. या देशातील पंतप्रधानांना हुंड्याच्या विरूध्द मधून मधून बोलावं लागतं. किती क्षुद्र विषय आहे हा, वास्तविक पंतप्रधानांच्या दृष्टीनं ? पण त्यांना बोलावं लागतं. ही शोकांतिका आहे या समाजाची, आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांची, आपल्या सामाजिक पुढा-यांची ! हे आपण आपल्या समाजात रुजवू शकलो नाही. पंतप्रधानांना सगळ्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे, देशाचे राजकारणाचे विषय सोडून स्त्री स्वातंत्र्यावरती, हुंडा मुक्ततेवरती आजही बोलावं लागतं ही मोठी भूषणात्मक गोष्ट नाही !

नव्या विचारांना फलद्रूप करणारी अशा प्रकारची जी नवी मानसिक विचारसरणी आपल्यामध्ये आली पाहिजे ती आलेली नाही. धर्माच्या खोटया कल्पना आपल्या मनामध्ये असतात. धर्म हा खोटया कल्पनेच्या पलिकडे असतो. खरा धर्म हा कुठल्याही विधिलिखितामध्ये मानलेला नसतो. खरा धर्म हा निरर्थक आचारांचा नसतो. तुम्ही सकाळी उठल्यावर संध्याकाळी झोपेपर्यंत देवाला किती वेळ नमस्कार करता याच्यावरती धर्म अवलंबून नसतो. तुम्ही किती वेळा स्नान संध्या करता याच्यावरती धर्म अवलंबून नसतो. तुम्ही कोणाला अस्पृश्य लेखता याच्यावरती धर्म अवलंबून नसतो. तुमच्या मनावरची बंधने किती मुक्त झाली आणि त्यामुळे तुमचे कल्याण आणि त्याच बरोबर इतरांचे कल्याण साधण्याची क्षमता तुम्ही किती प्राप्त करून घेतली याच्या वरती धर्म अवलंबून असतो. आपली धर्माची आभिमान वाटण्यासारखी व्याख्या ही अशी आहे.  “धारणात् धर्ममित्याहु धर्मात् धारयते प्रजा”  जो  समाजाची धारणा करतो तो धर्म समाज विस्कळीत होऊ लागला, समाज अध:पतित होऊ लागला, समाज दिशाहिन झाला की त्याला नवीन मूल्ये देऊन जुन्या मूल्यांची पुनर्रचना करून उत्थापनाला जो प्रेरणा देतो त्याला धर्मं म्हणतात अशी आपली व्याख्या आहे. त्याला अनुसरुनच भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, “स्वधर्मे निधनम् श्रेय: परधर्मो भयावह:! “ त्यातला धर्म हा हिंदुधर्म नसतो त्यातला धर्म ख्रिश्चन धर्म नसतो. त्यातला धर्म हा सतधर्म असतो. हा सतधर्माचा विवेक आपल्या या नव्या मूल्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी वापरला नाही तर आजची जी परिस्थिती आपल्याला दिसते तीच परिस्थिती सदैव काळ आपल्याला भोगावी लागेल. म्हणून या मूलभूत कल्पना पुन्हा नव्याने शिकविण्याची गरज निर्माण झालेली आहे. वास्तविक या सामाजिक पुनर्रचनेचा, सामाजिक परिवर्तनाचा विचार हा नवीन नाही!  “संगच्छध्वं संवदध्वं संयो मनांसि जानताम् |” सगळ्यांनी बरोबर गेले पाहिजे, सगळ्यानी एकसाथ व्यवहार केला पाहिजे. सगळ्यांचे मन एकात्म झाले पाहिजे असं ज्या वेळी आमचे ऋषी ऋग्वेदात सांगतात तेव्हा ते समाजवादाचीच कल्पना मांडत असतात. ‘समाना आकृती व समानानि हृद्यानि व:|’ असं ज्यावेळी आपण म्हणतो, आकारांनी आणि मनाने आम्ही समान आहोत, असं ज्यावेळी ऋषी हात उभारून सांगतात त्यावेळी ते समतेची लोकशाहीच सांगत असतात.  “जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले; तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा” असे तुकाराम महाराज ज्या वेळी म्हणतात, त्यावेळी लोकशाही व समाजवादाच्या ठायी असलेली मूलभूत माणुसकीची प्रेरणाच सांगत असतात. “दुरिताचे तिमिर जावो| विश्व स्वधर्म सूर्य़े पाहो| जो जे वांछिल तो ते लाहो | प्राणिजात ||” असं ज्या वेळी ज्ञानेश्वर सांगतात त्यावेळी ते खरा धर्म सांगत असतात. या सगळ्यांची नावं घेऊन ज्ञानेश्वराचं नाव घेऊन, तुकारामाचं नाव घेऊन ऋषींचं नाव घेऊन आम्ही मात्र जो धर्म पाळतो तो नेमका याच्या विरूध्द असतो. तो खुळ्या आचाराचा धर्म, पूजा अर्चेचा धर्म, तो खोट्या कल्पनेचा धर्म असतो. तो समाजातली विषमता वाढविणारा धर्म असतो. तो चातुर्वण्याची घातक कल्पना मनामध्ये रूजवणारा धर्म असतो. या धर्माला आपल्या धर्मामध्ये खरोखर थारा नाही. आपलाच धर्म पुन्हा नव्याने सांगण्याची वेळ आज आलेली आहे. तो धर्म सांगण्याचा प्रयोग महात्माजींनी एके काळी केला. तो प्रयोग विनोबाजी आज करीत आहेत. पण आज त्यांच्याकडे लक्ष द्यायला आपणाला वेळ नाही! हा किती दारूण विरोधाभास ! विनोबासारख्या ऋषितुल्य माणसाला धर्म सांगण्याला भरपूर वेळ आहे. त्यांच्याकडे जाऊन ऐकायला आम्हांला वेळ कोठे आहे? आम्हांला पैसे कमवायचे आहेत, आम्हाला स्वार्थ साधायचा आहे, आम्हाला अन्याय करायचे आहेत; आम्हाला विषमता पाळायची आहे. हे सगळं करीत असताना धर्म आहे की नाही हे पहायला वेळ कुठे आहे. आणि वर त्यांची आम्ही टिंगल करणार! त्यांच्या सर्वोद्याची आम्ही टिंगल करणार!  त्यांच्या भूमिदानाच्या चळवळीची आम्ही टिंगल करणार! कारण आम्ही स्वत:ला पुढारलेले, विद्वान, बुध्दिनिष्ठ, व्यक्तिस्वातंत्र्यवादी वगैरे वगैरे मानून घेण्यात मग्न झालेले आहोत !