व्याख्यानमाला-१९७६-१६

आजच दुसरं व्याख्यान सुरू करण्यापूर्वी एक दोन महत्वाच्या गोष्टी, केवळ उपचार म्हणून नव्हे, तर मनापासून करणार आहे त्याच्यापैकी एक गोष्ट म्हणजे पुस्तक प्रकाशनाची. या व्याख्यानमालेमध्ये आतापर्यंत जे जे नामवंत वक्ते भाषणे करून गेले त्यांच्या विचारांचे संकलित अशाप्रकारचे रूप पुस्तकरूपान प्रकाशित करण्याची एक उत्तम प्रथा या व्याख्यानमालेच्या आयोजकांनी सुरू केली आहे याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे मन:पूवक अभिनंदन करतो. कारण ब-याच वेळेला असे घडते की आमच्या सारखी माणसं बोललो की त्याचे शब्द वा-यावरती उडून जातात. विरून जातात. मागे काही शिल्लक रहात नाही. पुष्कळांना सवड नसल्यामुळे सगळीच माणसे या ठिकाणी येऊ शकत नाहीत. मुद्दाम कष्ट करून, अभ्यास करून काही निश्चित अशा प्रकारचा विचार घेऊन येणारी माणसं, त्यांचे विचार जर असे वा-यावरती उडून गेले, तर त्यांनाही त्यात फारस समाधान वाटत नाही. तेव्हा यावर एक उत्तम तोडगा म्हणजे त्यांचे विचार वा-यावरती न सोडता ते शब्द – बध्द करून अक्षरबद्द करून त्याला पुस्तकाचे रूप देणे व नंतर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचतील याची दक्षता घेणे. या वाचनालयाने ही अत्यंत महत्वाची गोष्ट साधलेली आहे.

 आज दुसरा योग असा आहे की तुमच्या या परिसरातले महाराष्ट्राचेच असे नव्हे तर संबंध देशाचे मा. नेते श्री. यशवंतरावजी चण्हाण यांचा आज वाढदिवस आहे. यशवंतरावांच्या संदर्भामध्ये सांगण्यासारखं खूप आहे. आजच्या राजकारणांमध्ये जशी केवळ कृतीच्या राजकारणाला  वाहून घेणारी माणसं असतात तशीच आपल्या कृतीला विचारांची जोड देणारी, आणि कृतीबरोबरच विचारांचे सुध्दा एक महत्त्वाचं देणे समाजाला प्रदान करणारी अशी माणसे आवश्यक असतात. अशी जी फार थोडी माणसं आपल्या देशामध्ये आहेत त्यांच्यामध्ये यशवंतरावांचं स्थान फार मोठे व वरचे आहे. हे मी अत्यंत जवळून पाहिलेले आहे. सतत चिंतन करणारा, सामाजिक प्रश्नांची अत्यंत उत्तम  जाण असणारा त्या समस्यांची उत्तरे कशी शोधून काढता येतील याच्या शोधामध्ये व्यग्र असलेला आणि जनसामान्याविषयी जी अपार करूणा, त्या द्वारे जीवनाचे सम्यक् दर्शन घेऊ इच्छिणारा एक दार्शनिक अशा प्रकारचं चिंतनशील रूप मा. यशवंतरावांमध्ये असल्यामुळे त्यांच्या नावाला केवळ कुठल्यातरी एका इमारतीचं, कुठल्यातरी एखाद्या शोभेच्या कार्यक्रमाचं, असं रूप देण्याच्या ऐवजी तुम्ही विचाराचं मंथन होईल, विचाराचं जिथे आदान प्रदान होईल अशा प्रकारच्या व्याख्यानमालेशी त्यांचं नाव जोडून एक उत्तम प्रकारची कृतज्ञता त्यांच्या संबंधात व्यक्त केली आहे असं मला वाटतं.
   
मला या ठिकाणी आठवतं, की मा. यशवंतराव कराडच्या साहित्य संमेलनात एक महत्वाचा विचार सांगून गेले. जी पुस्तके, जे विचार समाजामध्ये निर्माण होत असतात ते ज्यास्तीत ज्यास्त लोकांच्या घरापर्यंत व मानापर्यंत पोहोचले पाह्जेत. पुस्तके आपल्याकडे खूप प्रसिध्द होतात परंतु प्रसिध्द झालेली पुस्तके विकत घेण्याची ताकद सामन्य माणसामध्ये नसल्यामुळे ते विचार पुन्हा पुस्तकामध्येंच राहतात म्हणून हे विचार जनसामान्यापर्यंत  पोहोचण्याच्या दृष्टीनं स्वस्त प्रकाशने आणि त्या प्रकाशनाची सर्वत्र उपलब्धी होणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. समाजवादाला  योग्य व आवश्यक अशाप्रकारांचा हा विचार सहजरीत्या त्यांनी कालच्या साहित्य संमेलनामध्ये सांगितला आणि प्रकाशकांची, पर्यायाने शासनाची आणि त्या क्षेत्रामध्ये काम करणा-या वेगवेगळ्या संस्थांची जबाबदारी काय याचीही जाणीव करून दिली.

आज या ठिकाणी गेल्या वर्षीच्या ज्या वक्त्यांनी या व्याख्यानमालेत भाषणे दिली त्यांची व्याख्याने पुस्तकरूपाने छापून आणलेली आहेत. त्या पुस्तकाचे प्रकाशन मी आज करणार आहे. आपल्या सगळ्याच्या साक्षीने त्या पुस्तकाचे प्रकाशन झाले असे मी जाहीर करीत आहे. या प्रसंगी मा. यशवंतरावांना उदंड आयुरारोग्य लाभो. या देशाच्य़ा सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने थोर आशी पावले अलीकडच्या काळात उचलली जाताहेत त्यातला त्यांचा वाटा अत्यंत प्रकर्षाने उचलण्यासाठी त्यांना शक्ती लाभो. आतापर्यंत हाती घेतलेलं व्रत पूर्ण करण्याच्या त्यांच्या कामामध्ये आपण आपला सहभाग देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. अशा प्रकारच्या एका आत्मविश्वासाने, कृतज्ञ भावनेने, मला असं वाटतं की त्यांच्या वाढदिवसाच्य़ा निमित्ताने आपण आपल्या भावना व्यक्त करू या.