सहकारी शेतीच का ?
- त्र्यं. शि. भारदे
दूये कान्ताकरं वीक्ष्य मणि-कंकण-वर्जितम् ।
अत: परं परं दूये मणिकं कणवर्जितम् ।।
( कवि म्हणतो - रत्न आणि कंकण नसलेला असा माझ्या बायकोचा हात पाहून मला वाईट वाटतें. परंतु त्याहिपेक्षा धान्याचा कण नसलेला रांजण (मणिकं) पाहून तर मला जास्त दु:ख होतें. )
आज सर्वत्र सहकारी शेतीची चर्चा चालू आहे. एवढा कुतूहलजनक आणि चर्चेचा विषय ब-याच दुसरा कोणताहि झालेला नसेल, कांही लोकांना सहकारी शेतीशिवाय तरणोपाय नाही असें वाटतें, तर कांही लोकांना सहकारी शेती म्हणजे प्रलयकाल असें वाटतें. आस्था आणि अपेक्षा, अनास्था आणि उपेक्षा, जिज्ञासा आणि आशंका इत्यादि अनेक भावनांचे काहूर सहकारी शेती या शब्दाने निर्माण केलें आहे. प्रस्तुत लेखांत सहकारी शेतीशिवाय गत्यंतर नसून सहकारी शेतीबद्दल घेतले जाणारे आक्षेप किती फोल आहेत, हें थोडक्यांत सादर करण्याचा नम्र प्रयत्न करण्यांत येत आहे.
भारतांतील शेती कशी आहे याबद्दल अनेकवार आकेडवारी प्रसिद्ध झाली आहे. ही आकडेवारी येते मी विस्तारभयास्तव देऊं इच्छीत नाही. कारण हा आकडेवारीवरून शाबीत होणारा ढोबळ मुद्दा सर्वमान्य आहे आणि तो म्हणजे आपली शेती बहुतांशाने लहानलहान खात्यांची (Holdings) म्हणजे लहानलहान तुकड्यांची शेती आहे. शेतकरी जी जमीन धारण करतो त्याला त्याचें खातें असें म्हणतात. अशी निम्माहून अधिक खातीं पांच एकरांच्या आंत असून जवळ जवळ ऐशी टक्क्यावर अशी खाती वीस एकरांच्या आंत आहेत. शिवाय सर्वांना हें विदित आहे की बहुतेक सर्व जमिनी या कोरडवाहू जिरायती जमिनी असून केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. महाराष्ट्रांत तर बागायती जमिनी अवघ्या पांच टक्के आहेत, सारांश, एक एकरस दोन एकर, पांच एकर अशाच बहुसंख्य जमिनी आहेत आणि त्याहि बहुतेक सर्व कोरडवाहू आहेत ही वस्तुस्थिती आहे. या वस्तुस्थितीकडे कोणालाहि डोळेझाक करतां येणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षांत घेऊनच सहकारी शेतीचा विचार केला पाहिजे हें सांगणें नकोच.
सहकारी शेतीबाबत आज कांही लोकांचा मतभेद असला तरी गेल्या कित्येक वर्षांपासून इकॉनॉमिक होल्डिंगची कल्पना सर्वमान्य झालेली आहे. जमिनीची शेती किफायतशीर व्हावयाची असेल तर अमुक अमुक जातीची जमीन कमींत कमी अमुक एकरांची असलीच पाहिजे हा विचार म्हणजे अर्थक्षम क्षेत्रविचार होय. अनेक ठिकाणीं कोरडवाहू जमिनीच्या बाबतींत पंधरावीस एकर हें किमान धारणक्षेत्र असल्याशिवाय ती शेती किफायतशीर होऊं शकत नाही, असे निष्कर्ष शेतीतज्ञांनी काढले आहेत. सहकारी शेतीबद्दल आक्षेप घेणारांचाहि या अर्थक्षम क्षेत्रसिद्धांताला विरोध नाही हें लक्षांत घेण्यासारखें आहे.
अगदी लहानसाच तुकडा (Fragment) वर अलग असेल तर त्याची उत्पादनक्षमता रहात नाही, म्हणून शेजारच्या अलग जमिनींत तो विलिन करून टाकावा हे एकत्रीकरणाचें तत्त्व आहे. त्यालाच तुकडेजोड असें म्हणतात. ही कल्पनाहि सर्वमान्य आहे. तुकडेजोड कायदेहि झाले आहेत. त्याला आज सहकारी शेतीवर आक्षेप घेणारांनीहि विरोध केल्याचें ऐकिवांत नाही. छोट्या तुकड्यामुळे जर उत्पादनक्षमताच रहात नसेल तर तो शेजारच्या जमिनींत विलिन करावा हा मुद्दा सर्वमान्य आहे. या पार्श्वभूमीवर सहकारी शेती विशेष नजरेंत भरुं शकेल. लहान तुकडा (Fragment) जरूर तर सक्तीने जोडावा याला मान्यता देणारे लोक असे तुकडे लोकांनी सहकाराने एकत्र आणण्यास मात्र विरोध करतील तर तें हास्यास्पदच ठरणार आहे.
कमी एकरांची, छोट्या क्षेत्राची बहुसंख्य जमीन किफायतशीर व्हावयाची असेल तर किमान धारणक्षेत्राची आवश्यकता, उत्पादनास अक्षम अशा तुकड्यांच्या एकत्रीकरणाची आवश्यकता, आणि छोट्या जमिनीचें एकत्रीकरण झाल्याशिवाय उत्पादनक्षम व अर्थक्षम शेती होऊं शकत नाही ही वस्तुस्थिती, या सर्व पार्श्वभूमीच्या आधारावर सहकारी शेतीचा विचार करावा लागेल. सहकारी शेती श्रेयस्कर आहे की नाही हा विचार बाजूला ठेवला तरी शेती अधिक उत्पादनक्षम, 'अर्थक्षम आणि कार्यक्षम झाली पाहिजे याबद्दल तर वाद नाही. ही गोष्ट एकेकट्याच्या मशागतीने सुलभ व सुकर होईल की सहकारी शेतीनें सुलभ व सुकर होईल याचा शास्त्रोक्त विचार म्हणजेच सहकारी शेतीचा विचार आहे. बाकीचे अनेक अवांतर मुद्दे उपस्थित करून सहकारी शेतीवर आक्षेप घेण्याने या मूलभूत प्रश्नाचा उलगडा होणार नाही.