कांही लोक म्हणतात कीं, अहो, आपल्या मालकीच्या जमिनींत मालक काटाकाळजीने काम करतो; त्याची आत्मीयता आहे, नफ्याचा तोच पूर्ण वाटेकरी असल्यामुळे तो मोठ्या उत्साहाने व जिद्दीने शेती चांगली करील पण सहकारी शेती – म्हणजे बारभाई खेती. मालकीशिवाय व विलोभनाशिवाय कोण काम करणार? या मुद्यांत तथ्य नाही असें नाही. पण एकटा मालक अत्मीयतेने पहात असून व त्याला विलोभन असूनहि जमिनीचें क्षेत्रच जेथे अपुरें आहे तेथे हा युक्तिवाद टिकत नाही. शिवाय केवळ मालकी किंवा आपला ताबा हें विलोभन होऊं शकत नाही. सहमजूरहि काम करतात. मालकी आणि हुकमी ताबा हेंच जर विलोभन असेल तर मजुरांना तें नाहीच, मग त्यांनी काम कां करावें याचें उत्तर देतां येत नाही. शिवाय स्वत:च्या मालकीचे जमिनीचे तुकडे सोडून कांही लोक दुस-याच्या गिरणींत कामाला करं आले याचाहि उलगडा या युक्तिवादाने होत नाही. उत्पन्न हें विलोभनाचें मुख्य आकर्षण आहे. जेणेकरून आपलें उत्पन्न वाढेल अशा गोष्टीमध्ये माणसाला विलोमन वाटतें. सहकारी शेती त्यासाठीच असल्याने वैयक्तिक विलोभनाबरोबरच सामुदायिक विलोभनालाहि त्यांत स्थान आहे. कारण आपल्या श्रमाचा व नफ्याचा पूर्ण मोबदला आपल्यांतच वाटला जाईल ही हमी त्यांत आहे.
कांही लोक एका गावांतील चांगल्या शेतक-याची चांगली शेती पहातात आणि तिची तुलना सहकारी शेतीशी करतात. समजा, रामराव पाटलाची जमीन सरासरी जास्त उत्पादन करते तेवढें सहकारी शेतींत होत नाही. याचा निष्कर्ष हा निघेल की सहकारी सोसायटीपेक्षा रामरावाची शेती चांगली आहे, पण त्यावरून वैयक्तिक शेती चांगली आहे असें शाबीत होणार नाही, कारण गावांत अनेक व्यक्ति शेती करतात. त्या वैयक्तिक शेतीची सरासरी काढून मग सहकारी शेतीशीं तुलना केली पाहिजे. शिवाय सहकारी शेतीचें मूल्यमापन करतांना जी शेती सहकारी क्षेत्रांत आणण्यंत आली आहे ती आली नसती तर ती किती उत्पादनक्षम झाली असती याच्या तुलनेने पहावयास हवें. मोठ्या खातेदारांची जी शेती आहे व साधनांच्या अनुकूलतेमुळे जे ती चांगली करतात त्यांचा प्रश्न अलाहिदा आहे. परंतु जमीन तोकडी आहे, पत कमी आहे, साधनसामुग्री अपुरी आहे, क्षेत्र अपुरें आहे अशा जमिनींची व्यवस्था शेतक-यांना आपल्या तुटपुंज्या बळावर स्वत:च्या जबाबदारीवर करता येणार नाही. त्यासाठी जमिनीची व शेतक-यांची शक्ति एकत्रित करून शेतीचें उत्पादन व शेतक-यांचे उत्पन्न वाढवावें लागेल हाच सहकारी शेतीचा मूळ हेतु आहे.
सहकारी शेती फायदेशीर असूनहि शेतक-यांना त्याचें आकलन होऊन सहकरी शेतीचा वेग वाढण्यास अवधि लागेल हें सर्व विचारी लोक जाणतात. पण विचार अंमलांत येण्यास वेळ लागेल म्हणून अविचाराला विचार मानतां येणार नाही. एकदा तोकड्या साधनांच्या तुकडे-जमिनींचा विकास सहकारी शेतीनेच होणार हें स्पष्ट झाल्यावर त्याचे फायदे लोकांना पटवून लवकरांत लवकर सहकारी शेतीचा वेग वाढविणें हाच विवेकी मार्ग असून तसें न करतां लोकांच्या पारंपारिक समजुतीचा गैरफायदा घेऊन त्यांत अडथळे आणणें ही अविवेकाची कमाल होय. आत्मिक एकतेच्या व भारतीय एकात्मकतेच्या भारतीय संस्कृतीचे नांव घेणारे शेतक-यांच्या सहभावनेने निर्माण झालेल्या जमिनीच्या व हृदयाच्या एकात्मतेस विरोध करतांना पाहिले म्हणजे संस्कृतीच्या नांवावर विकृति कशी व्यक्त होते याची साक्ष पटते. एकात्मता ही संस्कृति तर अलग तुकडे ही विकृति होय. सहकारी शेती म्हणजे प्रगत शेती आणि प्रगत नीति यांचा समन्वय होय !