सन १९३२ नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयांत तिस-या पण छोटया गोलमेज परिषदेस सुरवात होऊन पहिल्या दोन्ही गोलमेज परिषदांनी नेमलेल्या कमिट्यांचे रिपोर्ट विचारांत घेऊन शेवटचा निर्णय पक्का करण्याचे काम सुरू झाले. सन १९३२ च्या २७ डिसेंबरच्या सुमारास तिसरी गोलमेज परिषद समाप्त झाली. सन १९३३ च्या मार्च महिन्यांत तिन्ही गोलमेज परिषदांतील सूचना लक्षांत घेऊन सरकारनें आपल्या शिफारशी सरकारी खलित्यांत मांडल्या, तोच प्रसिद्ध ‘व्हाईट पेपर’ होय. या शिफारशी पार्लमेंटपुढे बिलरुपानें मांडण्यापूर्वी पार्लमेंटच्या संयुक्त कमिटीने छाननी करावी म्हणून जाईंट पार्लमेंटरी कमिटीची नेमणूक करण्यांत आली. तिच्याशी सहकार्य करण्यासाठीं कांही हिंदी सभासदांचीहि नेमणूक झाली होती. या कमिटीनें ता. २२ नोव्हेंबर सन १९३४ रोजीं आपला रिपोर्ट प्रसिद्ध केला.
सन १९३३ च्या जून महिन्याच्या सुमारास काँग्रेसचे बहुतेक पुढारी कायदेभंगांत झालेल्या शिक्षांची मुदत संपल्यामुळे मोकळे झाले होते. त्यांनी जुलै महिन्यांत पुणें येथें पुढील धोरण आखण्यासाठीं एक परिषद बोलावली. तेथें महात्मा गांधींच्या प्रेरणेनें सामुदायिक कायदेभंग बंद करण्याचे ठरवून वैयक्तिक कायदेभंगाचे धोरण निश्चित ठरले. या धोरणाचा ९ महिने प्रयोग झाल्यावर ता. ६ एप्रिल १९३४ रोजीं वैयक्तिक कायदेभंगहि तहकूब करण्यांत आला. नंतर हरिजनासंबंधी काँग्रेसतर्फे चळवळ सुरू झाली. तेव्हां महात्मा गांधींच्या आदेशाप्रमाणें अस्पृश्यता निवारणाचा व त्याच्या विकासाचा कार्यक्रम आखण्यात आला. त्याप्रमाणें लोकांनीहि निरनिराळे कार्यक्रम सुरू केले. गांवोगांवी सहभोजने, मंदिर प्रवेश असे कार्यक्रम सुरू झाले. त्याप्रमाणें कराडातहि आमच्या मंडळामार्फत श्री. यशवंतराव प्रामुख्यानें सहभोजनाचे कार्यक्रम यशस्वी करीत. धर्मवीर बटाणे यांनी आपले मालकीचे शिवमंदिर हरिजनांना खुले केले. हरीजन सेवा समितीची स्थापना दे. भ. पांडुआण्णा शिराळकर यांच्या अध्यक्षतेखाली केली. कार्यवाह म्हणून माझी निवड झाली. स्पृश्य जनतेंतून फंड जमवून हरीजन विदयार्थ्यांना आर्थिक सहाय्य केले. उदाहरणार्थ अशा हरिजन विदयार्थ्यापैकीं येथील श्री. पाटसुपे हे हरिजन फंडाने शिक्षणक्रम करून ऑफिसर झाले होते. तसेंच हरिजन मुलाकरितां हरिजन वाड्यांत शाळा सुरू केली. श्री. यशवंतराव स्वत: वर्गशिक्षक म्हणून नियमित काम करीत होते, पण ते शक्यातो कुठल्याहि कमिटीत पदाधिकारी नसत. त्याचे मर्म हे कीं, आपल्याबरोबर इतरांनीहि आपले आत्मे आपुलकिनें कार्यान्वित करावे, हेच होते.
सन १९३८ चे नोव्हेंबरमध्यें कराड म्युनिसिपालिटिची त्रैवार्षिक निवडणूक होती. ती राष्ट्रीय कार्यकर्त्यातर्फे लढविण्याचे ठरले. पार्लमेंटरी बोर्ड निवडले. त्यानें राष्ट्रीय विचाराचे उमेदवार निवडले व उभे केले. परंतु श्री. यशवंतरावांचे बंधू व कुटुंबप्रमुख श्री. गणपतराव चव्हाण हे या उमेदवाराविरुद्ध उभे राहिले. येथें कर्तव्यपालन श्रेष्ठ कीं, बंधुप्रेम श्रेष्ठ हा प्रश्न उभा ठाकला. त्यांच्या विचारसरणीप्रमाणें कर्तव्यपालनार्थ आपल्या वडिल भावाविरुद्ध प्रचार केला व आपला उमेदवार निवडून आणला. कर्तव्यसिद्धीचे समाधान झाले. पण बंधुप्रेमहि जागृत झाले. विषेश हे कीं, श्री. गणपतरावांना आपल्याविरुद्ध आपल्या भावाने प्रचार केला असताहि कर्तव्यपालनाबद्दल अभिमान वाटला. श्री. यशवंतराव व त्यांच्या आम्हां मित्रांना मुळीच दोष दिला नाही. एकाच कुटुंबांत थोरले बंधू सरकारी नोकर, दुसरे बंधू ब्राम्हणेत्तर पक्षाचे व श्री. यशवंतराव काँग्रेसनिष्ठ. पण यासंबंधी घरांत बोलण्याची व मतभेदाची बाब कसली ती माहीत नव्हती. श्री. यशवंतराव अधिक बुद्धिमान व हुशार म्हणून जास्त शिकणार यामुळें त्यांच्या मातोश्री व कुटुंबियांच्या आशा आकांक्षा त्याचेवरच केंद्रित झाल्या होत्या. अन्य लोकांच्या दृष्टीनें श्री. यशवंतरावांचे हे चाळे अव्यवहार्य होते. आमच्या सहवासांत असणा-या तरुणांच्या कुटुंबातील मंडळींच्या दृष्टीनें इतरांनी त्याग व देशभक्ती करावी. त्याची झळ आमच्या कुटुंबास लागू नये. या विचारसरणीमुळें आम्हांस त्यांच्या शिव्याशाप ऐकावे लागत. परंतु श्री. यशवंतरावांच्या कुटुंबांतील कोणीहि कांही कुरकुर केली नाहीं व आमच्यामुळें कुटुंबावर आलेली राजकीय आपत्ती आमच्यापेक्षां आनंदानें स्वीकारली. हा या सर्व कुटुंबाच्या देशभक्तीचा महान पुरावा माझे स्मरणांतून कधीच नाहीसा होणार नाहीं.