देशांत पसरलेली अस्वस्थाता शांत व्हावी, असे सरकारलाही वाटत होते. त्यामुळें श्री. सप्रू, श्री. जयकर या देशांतील प्रसिद्ध कायदेपंडीतांनी सरकारकडे जो पत्रव्यवहार सुरूं केला होता, त्यास अनुसरून पं. मोतीलाल नेहरू व पं. जावाहरलाल नेहरू यांना अलाहाबाद तुरुंगातून म. गांधींशी विचारविनिमय करण्यासाठीं येरवडा जेलमध्यें पाठविण्यास सरकारकडून मान्याता मिळाली. त्याप्रमाणें म. गांधीचा नेहरू पितापुत्राशी विचार विनीमय झाला. परंतु सरकार व काँग्रेस या दोन्ही बाजूच्या विचारांची भूमिका मुळातच परस्पर विरोधी असल्यामुळें तडजोड निघणे अशक्य झाले. शेवटी श्री. सप्रू-जयकर निराश होऊन स्वस्थानी गेले. आणि नेहरू पिता पुत्रांना अलाहाबाद तुरुंगांत सरकारनें परत पोहोचविले. परंतु काँग्रेसच्या समझोत्याची तीव्र जाणीव विलायतेतील सरकारलाही झाली होती. आणि म्हणूनच काँग्रेसनें गोलमेज परिषदेंत भाग घ्यावा, यासाठी तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्याकरवी सन १९३१ च्या मार्च महिन्यांत महात्मा गांधीशी वाटाघाटी केल्या त्यांत उभयपक्षी समझोता होऊन सरकारनें ४ मार्च रोजीं समेट केला. यासच गांधी आयर्विन करार म्हणतात.
या काराराप्रमाणें महात्मा गांधी व त्यांचे निकटचे अनुयायी आणि हजारोच्या संख्येनें तुरुंगात असलेल्या सामान्य सत्याग्रही स्त्री पुरुषांची सरकारने बिनशर्त सुटका कारावी. चालू असलेले खटले सरकारनें बिनशर्त काढून घ्यावेत व महात्मा गांधीनी गोलमेज परिषदेकरितां विलायतेस जावे असे ठरले. कराराप्रमाणें सर्व सत्त्याग्रही सुटले. महात्मा गांधीहि सुटले व त्यांनी अलाहाबादेस प्रयाण करून नेहरू पितापुत्राशी विचारविनीमय करून सरकारशी करावयाच्या समेटाची दिशा ठरविली. दिल्लीस जाऊन व्हॉईसरॉय साहेबाशी बोलणी करून कबूल केलेप्रमाणें गोलमेज परिषदेसाठीं विलायतेस जाण्याचे प्रस्थान ठेवले. यावेळीं त्यांचेबरोबर पं. मदनमोहन मालवीय यांना घेतले होते. ही गोलमेज परिषद म्हणजे एक टोलेजंग तमाशाच आहे. असें त्या उभयतांना वाटत होते.
ही दुसरी गोलमेज परिषद भरण्याच्या मध्यंतरीच्या कालांत ब्रिटीश प्रधानमंडळांत बदल होऊन मजून मंत्रीमंडळांच्या जागी रॅम्सेमॅग्डोनल्ड यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रीय प्रधानमंडळ स्थापित झाले. त्यांत सर सॅम्युअल दोअर हे नवीन भारतमंत्री अधिकारारूढ झाले. या परिस्थितीमुळें भारतीय संस्थानिकांच्याकडून पहिल्या गोलमेज परिषदेंत झालेल्या निकालास फाटे फोडण्याचा बराच प्रयत्न झाला. फेडरल गव्हर्मेंटमध्यें सामील होण्याची त्यांची पूर्वीची उत्कंठा कमी झाली होती. अशा स्थितींत दुस-या गोलमेज परिषदेंत झालेल्या फलश्रुतीवरून नवीन कांही न मिळता पहिल्या गोलमेज परिषदेंत मिळालेले, मिळते किंवा नाहीं यासंबंधी पहिल्या गोलमेज परिषदेस उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना काळजी वाटू लागली. तत्त्वे अबाधित राखण्याचा नव्या राष्ट्रीय सरकारचा निर्धार कायम आहे. मजूर मंत्रीमंडळाच्या कारकिर्दित मिळवलेली व पहिल्या गोलमेज परिषदेतील अखेरची वचनें राष्ट्रीय मंत्रीमंडळानें पाळण्याचे ठरविले आहे.
महात्मा गांधी लंडनला गेले. तेंव्हां त्यांना भारतीय जनतेचा संपूर्ण पाठिंबा व चळवळीमुळें त्यांचा झालेला बोलबाला यामुळें इंग्लंडच्या राजकर्त्त्यांनी त्यांचा सन्मान केला. ते ज्या रस्त्याने जात, त्या रस्त्यावर त्यांच्या मोटारीपुढें तेथील राजकीय पद्धतीप्रमाणें सन्मानदर्शक मोटारी खणखणत धावत असल्यामुळें इंग्लंडच्या जनतेचे लक्ष भारताकडे वेधून घेण्याचे कार्य महात्मा गांधींच्या विलायतवारींनें चांगलेंच साधले. इंग्लंडच्या राजेसाहेबांची भेट घेतांना ठराविक पद्धतीचे कपडे घालून भेटावयास जावयाचे असते असा नियम होता. परंतु महात्मा गांधींच्या निर्धारान्वयें भेटीच्या वेंळीं सदर बंधन घालणेंत आले नाहीं. आपल्या नेहमीच्या कपडयांत या दरिद्री नारायणाचे सेवकांने बदल केला नाहीं. केवळ पंचा उपरणें या कपडयानिशी महात्मा गांधींनी राजेसाहेबाची भेट घेतली.