'रामायण' व 'महाभारत' हे भारतीय जीवनशैलीचे दोन ग्रंथ आहेत. या दोन्ही ग्रंथांमध्ये काही उपेक्षित व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यांना या ग्रंथांनी न्याय देण्याचं नाकारलेलं मला दिसतं. त्या उपेक्षितांत रामायणामधील लक्ष्मणाची पत्नी ऊर्मिला आहे. लक्ष्मणाचं बंधूप्रेम, आज्ञाधारकपणा आपणास दिसतो. त्याचं आपण उदात्तीकरण करतो, गुणगान करतो; पण या बदल्यात ऊर्मिलाच्या भावनेचा झालेला कोंडमारा, तिला जगावं लागणारं क्लेशकारक जीवन, तिच्या मनाचा विचार या ग्रंथात कुठे व्यक्त होताना दिसत नाही. रामायणानं स्त्री जातीवर केलेला हा घोर अन्याय आहे असं मला वाटतं. १९४२ ते १९५२ या दहा वर्षांत मलाही ऊर्मिलेसारखं जीवन व्यतीत करावं लागलं. लौकिकार्थानं त्याग, देशकार्य याची दखल समाजानं घेतली; पण झालेला मनस्ताप मला कुठंही व्यक्त करता आला नाही. तो स्त्री जातीला करता येऊ नये म्हणूनच रामायणात ऊर्मिलेला जन्माला घातली असावी. तिचीच मी प्रतिनिधी आहे असं मला वाटतं. आम्ही दोघींमध्ये फरक तो काय असेल तर मला दहा वर्षे हे जीवन जगावं लागलं तर ऊर्मिलेला चौदा वर्षे.
मला व आईला मुंबईला घेऊन जाण्यासाठी डोंगरे कराडला गाडी घेऊन आले. सोनूताईचं आज कामात लक्ष नव्हतं.
त्या सारख्या आईला म्हणू लागल्या, ''आई, तुम्ही मला व मुलांना सोडून मुंबईला जाऊ नका. मला एकटीला या सर्व मुलांचा सांभाळ करता येईल का ? माझ्याकडून चुकून भागीरथीच्या मुलाकडं दुर्लक्ष झालं तर माझ्यावर नाही नाही ते आरोप समाज करेल. वेणूला एकटीला जाऊ द्या.''
''नाही सोनूताई, मी आईला सोडून एकटी तिकडे राहूच शकत नाही. आई तिथे मी. हे बघा सोनूताई, तुम्ही असं मनात तरी कसं आणता की, भागीरथीच्या मुलांकडं तुमचं दुर्लक्ष होईल म्हणून ? आपण मुलांची अशी कधी वाटणी केलीच नाही. काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. लवकरच त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था आपल्याला करावी लागणार आहे. राजाला मात्र मी माझ्यासोबत घेऊन जाते.'' मी.
''हे बघ वेणू, तू या घराकरिता खूप काही केलं. तुझी तब्येत ही अशी तोळामासा. आता तू तुझ्या तब्येतीला जप. तुझ्यासाठी नाही, पण यशवंताकरिता तरी तुला धडधाकट व्हावं लागेल.'' आई.
आईचं म्हणणं मला पटलं. राजाला माझ्यासोबत घेऊन जाण्याचा बेत मी रहित केला. आईच्या बाबतीत मात्र मी आग्रही होते.
सोनूताई रडकुंडीला येऊन म्हणाल्या, ''हे बघ वेणू, तू या वेळेस माझं ऐक. मुलं शाळेत जाऊ लागली की, तू राजाला आणि आईला घेऊन जा. मग मी तुला आडकाठी निर्माण करणार नाही.''
''मला वाटतं, वेणू, तू एकटीच या वेळेस मुंबईला जा. तू आणि यशवंता काही दिवस एकत्र राहून एकदा रुळले म्हणजे मी आणि राजा मुंबईला येऊ.''
आई असं बोलल्यानंतर सोनूताईचा चेहरा खुलला. सोनूताई आणि आईचं एकमत झाल्यानं मी एकाकी पडले. मलाही आईचं म्हणणं पटलं. चव्हाण घराण्याचा वारसा व आईला सोनूताईच्या हवाली करून मी मुंबईच्या वाटेनं निघाले.