यशवंतराव ज्या मृदू आणि संयमित शब्दातून समतोल राखून ज्वलंत प्रश्नांची उकल करून बोलत असत त्याच पद्धतीने आपणही बोलू लागलो आहोत म्हणून आज उध्वस्त झालो आहोत. कारण आज शांत, संयमित व समतोल भाषा व्यवहारात चालत नाही. परंतु आज श्री अण्णासाहेब शिंदे ज्या प्रखरतेने बोलले, ती भाषा मात्र सर्वांना उतारा म्हणून कळू शकेल. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की अण्णासाहेब अशा रीतीने बोलतील. परंतु गोष्टी ह्या थराला आल्या की शेती उध्वस्त होऊ लागलेली बघवेना. संयमी माणसांलाही प्रखर बोलावे लागते.
महात्मा फुले फारच कडक लिहीत. त्यांचे शिष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील फारच कडक लिहीत आणि बोलत. त्यांच्या बोलण्यातून त्यांचे गुरु-वाक्य ऐकू येत असे. त्यात महात्मा फुले यांचाच विचार असे. एकदा डॉ. बाबासाहेबांना मी म्हटले, ''बाबा तुम्ही फारच कडक आणि कडवट बोलता. झोंबेल असे तीव्र बोलता. तुमचे बोलणे म्हणजे घणाचे घाव. जणू महात्मा फुले यांनी ओढलेला शेतकर्यांचा आसूड. जरा मऊ बोलावे....''
मी बोललो खरा पण बोलल्यावर असे वाटले की मी जादाच बोललो, आता बाबासाहेब माझी गय करणार नाहीत. बिन पाण्यानेच आमची शेती करणार. पण डॉ. बाबासाहेबांनी एक दृष्टांत देऊन सामाजिक प्रश्न सोडवताना काळवेळेप्रमाणे ऑपरेशनची पद्धत अंगिकारावी असे सांगितली. ते म्हणाले, ''तू दाढी करतोस की नाही ?'' मी मान डोलावली. ''रोज करतो !''
''कुठले ब्लेड वापरतोस ?''
''सेव्हन ओ क्लॉक वापरतो, डॉ बाबासाहेब !'' त्यावेळी सेव्हन ओ क्लॉक एक दर्जेदार ब्लेड होते. मला वाटले बाबासाहेबांना बरे वाटेल ऐकून की मी हलके काही वापरत नाही !
डॉ. बाबासाहेब म्हणाले, ''तू आता असे कर, तुझ्या त्या सेव्हन ओ क्लॉकच्या ब्लेडने एखादे जुने बाभळाने खोड कापून दाखव बघू !'' मी क्लीन बोल्ड. दाढी साफ.
सांगायचा मुद्दा असा की ज्याप्रमाणे दाढी करण्याच्या पात्याने जुनाट खोडाला कापता येत नाही त्याप्रमाणे नाजुक साजुक उपायांनी जुन्या सवयी आणि साठलेल्या कुप्रथा उखडून काढता येत नाहीत. तेथे ब्लेड ऐवजी कुर्हाडीचा तीव्र, जबरदस्त, घणाचा घाव असा प्रखर प्रहारच केला पाहिजे. गुलाबराव पाटील आणि शंकरराव कोल्ह्यांनी प्रखर उपाययोजना का आवश्यक आहे हे सांगितले. त्यामागे वक्तयांची रचनात्मकच भूमिका आहे.
विकासाचा वेग एक टक्क्यांनी कमी झाला तरी बंड पुकारले जाईल अशी शक्यता आज निर्माण झाली आहे. शेतकरी हा सुद्धा बंड पुकरण्याच्या पवित्र्यात आहे. दुष्काळ आणि पाणी हा प्रश्न समर्थपणे सोडविण्यासाठी जर दृढ निश्चयाने हात घातला नाही तर शेतकरी बंडाळी केल्याशिवाय राहणार नाहीत असे वातावरण आहे. आपण शेतकर्यांची मुले आहोत. आपण विविध गावोगावी फिरतो. त्यामुळे शेतकर्यांच्या मनाचा ठोका आपल्याला ओळखता येतो.