१७. प्रखर भाषा केवळ कळकळीपोटी
दादासाहेब रूपवते
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, डॉ. आंबेडकरांच्या वैचारिक वारशाचे राष्ट्रीय नेते
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आभार प्रदर्शन
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ग्रामीण विचारवंतांनी शेतकर्याची दुर्दशा पाहून, महात्मा फुल्यांच्या आसुडाची आठवण ठेवून, प्रखर भाषा वापरून पाणी प्रश्नांवर तत्काळ फळदायी उपाययोजनेची मागणी केली आहे.
'दुष्काळ आणि पाणी' ह्या महत्त्वाच्या विषयावर प्रतिष्ठानतर्फे ही बैठक बोलावलेली आहे. ह्या बैठकीत महाराष्ट्राचे शेतीनिष्ठ राज्यकर्ते श्री. वसंतरावदादा पाटील आणि श्री शरदराव पवार सामील आहेत. येथे शेतकर्यांच्या पाणी प्रश्नावर श्री. अण्णासाहेब शिंदे ह्यांनी सर्वांचे अंजन घालून डोळे उघडण्याचा पाणीदार प्रयोग केला आहे.
महाराष्ट्राच्या भविष्याची स्वप्ने कै. यशवंतरावांनी पाहिली होती. त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, शेती आणि उद्योग ह्या क्षेत्रात संपन्न झालेला त्यांना दिसला होता. मोठ्या आशेने मी सुद्धा आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाची स्वप्ने पाहत असतो. त्यातूनच पुढील कर्तव्याची दिशा दिसते. अमेरिकेतील संयुक्त संस्थानांचे थोर निग्रो नेते डॉ. मार्टीन ल्यूथर किंग ह्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णियांच्या समान अधिकाराच्या लढ्यासाठी 'लाँग मार्च' काढला. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच अशी केली होती 'माझे एक स्वप्न आहे ....' सर्व मोठ्या माणसांचे एक स्वप्न असते, तसेच यशवंतराव संपन्न शेतकरी असलेल्या महाराष्ट्राचे स्वप्न बघत असत.
येथे श्री. शंकरराव कोल्हे ह्यांनी पाण्याच्या वापराबाबत महत्वाची उपाययोजना सांगितली. कोकणातले पाणी देशावर कसे आणावे हा त्यांचा विचार जसा अंगिकारण्यासारखा आहे, तसाच देशावरचे पाणी कोकणात वाहून नेण्याच्या योजना बंद कराव्या हा आग्रहही अमलात आणावा अशाच प्रकारचा आहे. त्यांनी केलेली टिका जिव्हारी लागणारी होती. परंतु कधी कधी अशी टिका आवश्यक असते.
महाराष्ट्रात सध्या धरणाच्या पाण्यावरून तीव्र भांडणे सुरू आहेत. माझ्या अकोला तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकरी रस्त्यावर एकमेकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. देव-दैत्यांनी अमृत कुंभासाठी जसे रणकंदन केले होते तसे रणकंदन उभे ठाकलेले पाहावयास मिळू लागले आहे. विशेष म्हणजे ह्या रणकंदनात एक तात्त्वि मुद्दा गुंतलेला आहे.
ब्रिटिशांच्या काळापासून धरणाच्या पाण्याबाबत एक तत्त्व अंगिकारलेले आहे व ते म्हणजे 'कमिटेड वॉटर' तत्त्व. पाणी हे वापरणार्या शेतकर्यांच्याबाबत 'कमिटेड' असते. पाणी हे बांधलेले असते. आतापर्यंत हेच तत्त्व अंगिकारून पाणी वाटप होत असे. तथापि ह्या तत्त्वाला अनुसरून पाणी वाटपामुळे जेथे धरण बांधलेले आहे त्यापासून काही विशिष्ट अंतरापर्यंत पाणी शेतीसाठी किंवा अन्य उत्पादन कार्यासाठी वापरता येत नाही. ह्यामुळे धरण परिसरातील डोंगरी व आदिवासी परिसरातील जनतेला संचित पाणी व वाहते पाणी नुसते पाहत राहावे लागते.