शेतकरी विचारवंतांचे क्रांतिदर्शन
शेतकरी जरी असलो तरी आपण पांढरपेशा वर्गात मोडू लागलो आहोत. पांढरपेशा म्हणजे जात्याच हुशार ! जात्याच हुशार असल्याने त्याला लवकर बोचते व कळते. त्यामुळे तो क्रांतीसाठी तयार होतो. युरोपखंडात क्रांतीचा नेता सदैव मध्यमवर्ग मिडल क्लास असतो. हा मध्यम वर्ग म्हणजे पांढारपेशा वर्ग, म्हणजेच क्रांतीचा प्रणेता. परंतु महाराष्ट्राचा शेतकरी क्रांती करण्याची जरी भाषा बोलू लागला तरी येथील पांढरपेशी लोकांना शेतकर्यांची क्रांतीची भाषा खरी वाटत नाही. शेतकरी शिकलेला नाही, मग तो पांढरपेशा होऊ शकत नाही. म्हणजे शेतकर्यांची क्रांती काही खरी क्रांती नाही. महात्मा फुल्यांच्या अनेक मागण्यापैकी एक मागणी होती की शेतकर्याला शिकवा, म्हणजे त्याला आजुबाजूच्या घटनांचे विश्लेषण केलेले समजेल. इकडे शेतकर्याचे शिकून काय उपयोग, अशी हवा निर्माण केलेली आहे. ही हवा बदलावी म्हणून कै. यशवंतरावांनी गावोगावी शेतकर्यांची मुले शिकतील म्हणून शिक्षणसंस्था काढण्यास पोषक वातावरण निर्माण केले. सनातनी समाजाने बंदिस्त केलेले शिक्षण भगवान बुद्धाने, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण ह्यांच्या अविरत प्रयत्नामुळे बहुजनांसाठी खुले झाले. त्याचा परिणाम ह्या सभाचर्चेच्या निमत्ताने दिसत आहे. आज येथे जमलेले विधायक कार्यकर्ते : अण्णासाहेब शिंदे, शंकरराव कोल्हे, कवी महानोर, विनायकराव पाटील, लक्ष्मण माने - आदींच्या रुपाने ग्रामीण कष्टकरी विचारवंत व प्रज्ञावंत हे आपल्याला टोचणार्या व बोचणार्या समस्यांचे प्रश्न धसाला लावताना दिसत आहेत.
'दुष्काळ आणि पाणी' ह्या परिसंवादामध्ये शिकलेला शेतकरी आपल्या जीवन-मरणाची समस्या दैवावर न सोडता, स्वबळाने तो त्या समस्यांवर उपाययोजना काढू इच्छितो. हा निर्धार अमलात यावा म्हणून मार्ग शोधला जात आहे.
अनेक नामवंत शेतकर्यांनी येथे हजेरी लावून आपली मते व विचार व्यक्त केले आहेत. विविध मार्ग सांगितले. ह्या परिसंवादात ग्रामीण समाजातील मेधावी प्रतिभावंत सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने हे आग्रहाने उपस्थित राहिले. हे मी उल्लेखनीय मानतो. लक्ष्मणरावांनी दलित व भटक्याविमुक्त जनतेच्या पाण्यातल्या वाट्याचा उल्लेख केला. तो काही अंशी बरोबर आहे. परंतु शेतीमध्ये, शेतीव्यवसाय म्हणून मराठे, माळी आगरी, वंजारी आणि आदिवासी भागातील आदिवासी ह्या जमाती व्यवसायपरत्वे शेतकरी असल्याने, ते शेतीमध्ये आधाडीवर दिसणार. ह्या चित्रातही बदल होणार नाही असे नाही. काळ बदलत असल्यामुळे आणि समानतेचा आग्रह सर्वच बाळगत असल्यामुळेही ज्यांना पारंपारिक जमीन नाही, त्यांना जमिनीवर उभारण्यासाठी जागा मिळू लागल्या आहेत. त्यांचीही शेती, फळशेती बहर धरू शकेल. परंतु सध्या जे शेतीत आघाडीवर आहेत त्यांचीही जीवनमरणाची लढाई चालू आहे. खेड्यातील शेतकर्याचे खळे हे ग्रामीण अर्थ व्यवस्थेत मध्यबिंदू आहे. त्याच्याबद्दल दुस्वास किंवा मतभेद ठेवून चालणार नाही.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे योजलेल्या ह्या विचार विनिमय शिबिरात आपण मांडलेले प्रश्न व निराकरणाचे उपाय ह्यांचे संकलन करून ते विविध स्तरावर माहिती, प्रकाशन प्रसारण आणि धोरणात्मक फेर आखणीसाठी उपलब्ध करण्यात येईल.
आपल्या सहकार्याबद्दल मी आभार मानतो.
महाराष्ट्र राज्य - भूगर्भातील जल क्षमता
नकाशा नं ४ (नकाशा पाहण्यासाठी बाजूला क्लिक करा.)