चव्हाण आणि देवगिरीकर यांनी राजीनाम्याला मोडता घातला, पण त्यामुळे महाराष्ट्र-काँग्रेसची ताकद वाढण्याऐवजी ती खचली, अशी देव यांनी टीका केली. दरम्यान ठरावावर बोलूं द्यावं आणि मतहि नोंदवूं द्यावं यासाठी दिल्लींत काकासाहेब गाडगीळ यांचे प्रयत्न सुरु पाहिलेच होते. पं.नेहरुंना हें पटवण्यांत त्यांना अकेर यश मिळालं असावं. कारण दिल्लीहून मोरारजींना तसा आदेश मिळाला. मोरारजी हेहि पक्क्या गुरुचे चेले, त्यांनी काँग्रेसमधील फूट टाळण्याचं निमित्त पुढे करुन ठरावावरील चर्चाच पुढे ढकलावी असं ठरवलं.
मोरारजींनी हा निर्णय करतांच २० नोव्हेंबरला पुन्हा हिरे यांच्या घरीं बैठक बसली. या बैठकीला मोजके लोकच हजर होते. बेमुदत तहकुबीचा पर्याय सर्वांनाच मान्य होता. पण ही तहकुबी मागतांना मोरारजींनी मुंबईच्या प्रश्नाचा फेरविचार करण्याकरिता तहकुबी मागावी असं देव यांचं म्हणणं होतं. दिल्लींत पुन्हा या प्रश्नाची चर्चा घडवण्याच्या दृष्टीनं त्यांना तें सोयिस्कर ठरणार होतं. हा पेंच समजण्याइतके मोरारजी शहाणे राजकारणी असल्यानं देव यांची सूचना ते मान्य करणं शक्यच नव्हतं. तरी पण देवगिरीकर, हिरे व चव्हाण यांनी मोरारजींशीं याबाबत चर्चा केलीच. याच वेळीं दिल्लीहून मोरारजींना कळवण्यांत आलं की, काँग्रेस सभासदांना विरोधी भाषणं करण्यास परवानगी द्यावी, मतदान मात्र विरोधी करुं देऊं नये. चर्चा तहकुबीची मोरारजींची सूचना दिल्लीने नाकारली, हाच त्याचा अर्थ होता.
महाराष्ट्र काँग्रेस-पक्षाचे आमदार आणि नेते यांच्यांत हीं खलबतं सुरु असतांनाच सायंकाळीं चौपाटीवर एक जाहीर सभा इकडे आयोजित केली. राज्य पुनर्रचना समितीच्या अहवालाबाबत काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे हें जनतेला समजावून सांगणं हा या सभेचा उद्देश ठरवण्यांत आला. वस्तुतः या अहवालाबद्दल जनतेंत अगोदरच आग भडकलेली होती. पाटील-मोरारजींनी त्यामध्ये आणखी तेल ओतण्यांचं कारण नव्हतं. या दोघांचा राजकीय क्षेत्रांतील अनुभव पहातां त्यांना या सभेचा धोका उमजला नसेल, असं मानतां येत नाही. जो विषय कायदेमंडळापुढे असून अनिर्णीत स्थितींत पाहिलेला आहे आणि ज्याबाबत भावना तीव्र बनल्या आहेत अशा विषयावर स्वतः मुख्य मंत्र्यानंच जाहीरपणांनं बोलावं हें खचितच शोभादायक नव्हतं. पण तरीहि मोरारजी-पाटील यांनी तो अट्टाहास केला, त्याचा परिणाम मात्र त्यांना भोगावा लागला.
मुंबईंतलं वातावरण १८ नोव्हेंबरच्या सत्याग्रहापासून तापलेलंच होतं. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली त्या दिवशी निघालेला मोर्चा संपूर्ण शांततामय होता, पण एकूण वातावरण मात्र तंग होतं. कौन्सिलहाँलकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी रोखले होते. जागोजाग हत्यारी पोलीस सज्ज होते. कौन्सिलहाँलचं आवारहि पोलिसांनीच भरलं होतं. मोरारजींच्या आदेशानुसार सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला गेला. कौन्सिलहाँलमध्येहि पोलिसांचं राज्य पाहिल्यानंतर सभापति नानासाहेब कुंटे यांना सभासदांची क्षमा मागावी लागली. मोर्चाचे म्होरके सेनापति बापट होते त्यांना व आचार्य अत्रे, मिरजकार यांना मिरवणूक-बंदीचा भंग केल्याबद्दल पोलिसांनी अटक करतांच एस.एम,जोशी, एस.जी.पाटकर आदीनी कडाडून टीका केली. एवढं घडतांच अटकेच्या निषेधार्थ २१ तारखेचा संपूर्ण हरताळ पाळण्याचं संयुक्त महाराष्ट्र कृती समितीनं आवाहनं केलं.
शहरांत असं वातावरण निर्माण झालेलं असतांनाहि पाटील-मोरारजींनी चौपाटीवर जाहीर सभेचा घाट घातलांच, लोकांनी या सभेंतच त्यांना उत्तर देण्यांचं ठरवलं सभा सुरु होतांच लोकांनी प्रश्नांचा मारा सुरु केला. वक्त्याला बोलणंहि मुष्किल ठरलं. तरीहि भाषणं चालूच राहिल्यांनं लोकांनी दगडफेक सुरु केली. सभेवर सर्व बाजूंनी दगड, चपला येत राहिल्या. त्यांतला एक दगड मोरारजींना लागल्यांनं ते किरकोळ जखमी झाले. गडबड आणि अशांतता निर्माण करुन गुंडगिरीनं महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाहीस असं मोरारजींनी या सभेंत सांगितलं, तर स.का.पाटील यांनी याहीपुढे जाऊन लोकांना खिजवण्याचा आणि भडकवण्याचा उद्योग केला. पुढच्या पांच हजार वर्षांत महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही अशी त्यांची भविष्यवाणी होती. आपल्या दमदाटीनं सारे हबकतील अशी पाटलांची कल्पना असावी, पण आपण आपल्या चावडींत बसून ही दमबाजी करत नसून, चौपाटीवर हजारो लोकांना दटावत आहोंत याचं भान त्यांना राहिलं नाही. सभेला हजर असलेल्या गुजराती नेत्यांना आणि त्यांच्या बगलबच्चांना पाटलांच्या अशा धिटाईबद्दल आनंदहि वाटला असेल, पण सा-या महाराष्ट्राचं मन मात्र या मुजोरीनं बिथरलं. मराठी भाषकांच्या मनाला झालेल्या जखमेवर पाटलांनी मीठ चोळलं होतं. त्यामुळे कमालीचा प्रक्षोभ माजला.पाटील यांनी जाणूनबुजून मराठी मनाच्या स्वाभिमानाचा अपमान केला होता. मोरारजी आणि पाटील यांनी या सभेच्या आणि भाषणाच्या रुपानं सा-या महाराष्ट्राला आव्हान देऊन दोन हात करण्यास आमंत्रणच दिलं होतं.