आंतराराष्ट्रीय राजकारणांत मोठमोठ्या विकसित किंवा विकसनशील राष्ट्रांमधील अग्रेसर व्यक्तींना श्री. यशवंतराव चव्हाण यांचे सात्त्विक व गंभीर व्यक्तिमत्त्व ताबडतोब पटतें. संरक्षण, अर्थ व विदेश-व्यवहार या विषयांत मंत्रिपदावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करतांना जगांतील मुत्सद्दी, राजकीय प्रज्ञावंत, अर्थशास्त्रज्ञ, राजकीय सत्ताधारी इत्यादिकांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसतें. त्यांच्यांतील समतोल विचारवंत व व्यवहारी प्रज्ञावंत झळकल्याशिवाय राहत नाही.
या ग्रंथाचे लेखक श्री. रामभाऊ जोशी यांनी या चरित्र-ग्रंथामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनाचा फार मोठा सविस्तर परामर्श घेतला आहे. ग्रंथासाठी त्यांनी फार परिश्रमपूर्वक माहिती जमा केलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्य दृष्टीने या माहितीचा वर्तमान महाराष्ट्राच्या इतिहासकाराला फार मोठा उपयोग होईल यांत शंका नाही. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनाचा हा जो सविस्तर परामर्श आहे तो वर्तमान महाराष्ट्राच्या इतिहासाचाच केंद्रीभूत भाग आहे. अशा या चरित्रलेखनाबद्दल माझे मित्र श्री. रामभाऊ जोशी यांना मी मन:पूर्वक धन्यवाद देतों.
मराठी वाचक या ग्रंथाचा आदरच करतील असा मला विश्वास आहे.
-लक्ष्मणशास्त्री जोशी
वाई
अक्षय्यतृतीय, शके १८९८
दि. २ मे १९७६.