सामाजिक वा राष्ट्रीय जीवनांत नेहमींच कांही तरी अत्यंत मूलगामी समस्या निर्माण झालेल्या असतात. जेव्हा अशा समस्या सोडविण्याचा प्रयत्न शिथिल होतो, मंद होतो किंवा प्रयत्नच होत नसतो, तेव्हा समाज किंवा राष्ट्र हें अगतिकतेच्या पाशांत बद्ध होऊन कुंठित स्थितींत अडकून पडलेलें असतें. भारताचा इतिहास पाहिला तर, अशी कुंठित अवस्था अनेक शतकें आणि अनेक युगें चालली होती. गतानुगतिक परंपरेंत अवरुद्ध होऊन भारत व भारताची संस्कृति पडली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटल्याप्रमाणे निर्विकल्प योगसमाधींत गढलेला अस्थिपंजरावशेष असा हा योगी होता. या योग्याच्या योगनिद्रेचा भंग नवयौवनसंपन्न अशा पश्चिमी संस्कृतीच्या गो-या, बूट घातलेल्या पुरुषाने एका लाथेच्या तडाख्याने केला. कठीण समस्यांचें पाश योग्याला एकदम डोळे उघडल्याबरोबर दिसले. अशा समस्या सोडविण्याकरिता हा योगी उभा राहून कटिबद्ध झाला. समस्या सोडविण्यानेच किंवा समस्यांचा मुकाबला केल्यानेच इतिहास घडूं लागतो. राजकीय, आर्थिक आणि सांस्कृति अनवस्था व दुरवस्था यांचे खरेखुरें, विषादकारक व निराशजनक चित्र हें भारतीय ग्रामीण जीवनामध्ये अधिक खोल व स्पष्ट दिसत होतें. ग्रामीण जीवन खुरटलेलें; त्यांतील माणसांची मनें जन्मभर मुकुलित स्थितींत कायम राहिलेलीं, इतिहास घडत नव्हता म्हणून विकासाचा स्पर्श कोठेहि नव्हता; अशाच ग्रामीण जीवनांत श्री. यशवंतराव चव्हाण यांचे कुटुंब पिढ्यान पिढ्या कठीण जीवन कंठीत होतें.
समस्यांचे आव्हान स्वीकारणें व त्या समस्या सोडविणें यांचा अव्याहत क्रम म्हणजेच जीवनविकास होय. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनामध्ये जन्मापासून एकापाठीमागून एक अशा कठीण समस्यांची मालिका लागलेली दिसते व त्या समस्यांचे बंध सुटण्याचीहि मालिका सापडते. प्रस्तुत पुस्तकांत लेखकमहाशयांनी यशवंतरावांच्या जन्माची कथा दिली आहे. यशवंतरावांच्या मातुश्री विठाबाई यांच्या जीवनमरणाचा झगडा म्हणजेच यशवंतरावांच्या जन्माची कथा होय. विठाबाईंची सुटका लवकर झाली नाही. कारण माहीत नाही. माझा कयास असा; बालकाचें डोकें फार मोठें होते. हें असें मोठें डोकेंच मातेच्या व स्वत:च्या जिवाला कित्येकदा जन्मकाळी धोका पोंचवितें. त्या धोक्यांतून योगायोगाने सुटका झाली. हें डोकें मोठें असल्यामुळेच आतापर्यंतच्या विलक्षण कठीण समस्यांचा मुकाबला यशवंतराव करूं शकले. दुसरी मोठी समस्या; ती म्हणजे साठ वर्षांपूर्वीच्या नागरी जीवनापासून दुरावलेलें यशवंतरावांचे जन्मगाव होय. कै. बळवंतराव यांना परिस्थितीने नागरी जीवनाचा आश्रय अपरिहार्य रीतीने करावा लागला. कराड येथे बेलिफाची नोकरी कै. बळवंतरावांनी पतकरली. अगणित ग्रामीण व्यक्तींना खेडें सोडून शहरांत पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्याकरिता यावें लगतें; परंतु नागरी संस्कृतीचा लाभ बहुधा घेतां येत नाही. आधुनिक नागरीक संस्कृतीचा वरदहस्त प्राप्त झाला म्हणजे जीवनविकासाच्या वाटा दिसूं लागतात. भारती ग्रामीण जीवनाला नागर बनविणें, संपूर्णपणें नागरी संस्कृतीचा लाभ करून देणें, हें स्वतंत्र भारताचें एक उच्च उद्दिष्ट होय हें केल्यानेच आधुनिक भारत आधुनिक विकसित राष्ट्रांच्या मालिकेंत विराजमान होऊं शकेल. त्याचें मर्यादित स्वरूपांतील प्रत्यंतर श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या आयुष्यक्रमांत मिळतें. आधुनिक इंग्रजी शिक्षणाचा लाभ यशवंतरावांना त्यांच्या बंधूंच्या-कै. गणपतरावांच्या आधुनिक जीवनदृष्टीमुळे झाला. हें मात्र योगायोगाने घडलें नाही. त्यांचे बंधू ज्योतिराव फुल्यांच्या सामाजिक क्रांतीच्या ध्येयवादाने भारले होते. त्यांच्या बंधूंना नव्या इंग्रजी शिक्षणाचें रहस्य उमगले होतें. अठरां विश्वें दारिद्र्याने कुटुंब जर्जर झालेलें असतांनाहि यशवंतरावांच्या बंधूंनी यशवंतरावांना नव्या शिक्षणाचा मार्ग दाखविला. यशवंतरावांनीहि या उपकाराची फेड नंतर मोठ्या कृतज्ञतेने केली.